

‘इस सरकार मे इस्तीफे नही होते,’ संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचे हे विधान... आठवतेय? गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकछत्री अंमल असलेल्या भाजपने मागील बारा वर्षांत साम-दाम-दंड-भेदाचा वापर करत भल्याभल्या विरोधकांना गुडघ्यावर आणले. अनेक बड्या नेत्यांनी त्यामुळे एक तर सत्तेला शरण जाणे पसंत केले तर काहींनी सोईस्कर मौन पाळले.
पण या दडपशाहीला सहन करतील ते जेन-झी कसले? पेपरफुटीच्या मुद्यावरून देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये खूप आधीपासून असंतोष खदखदत होता. त्याच्या उद्रेकाला निमित्त ठरले ते सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी बेरोजगार तरुणांची झुरळांशी केलेली कथित तुलना... त्यांच्या एका वाक्याने अमेरिकेत ‘कॉक्रोच जनता पक्षाला’ जन्म दिला. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून तरुणाई बोलू लागली, आपले दुखणे सांगू लागली पण काही केल्या मायबाप सरकारला पाझर फुटेना.
अखेरीस पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी अमेरिकेतून थेट दिल्लीमध्ये येऊन सरकारशी दोन हात केले. परीक्षा व्यवस्थेतील गोंधळास जबाबदार असलेले शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, भाजप आणि मित्र पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत. ‘नीट’ पेपरफुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई द्यावी... आदी मागण्यांसाठी आंदोलनाचे रणशिंग फुंकले.
देशभरातील तरुणाई त्यात सहभागी झाली. ज्याप्रमाणे ‘सीएए’विरोधी शाहीनबागेतील आंदोलन मोडीत काढले, शेतकरी आणि कुस्तीपटूंना झुंजवले त्याप्रमाणेच हे आंदोलनही निकालात काढता येईल, असा सरकारचा इरादा होता पण ‘जेन-झीं’समोर तो निष्फळ ठरला. कारण या तरुणाईचे व्यक्त होणेच मुळात चौकटीबाहेरचे होते. मिम्स, रिल्सपासून ते क्रिएटिव्ह पोस्टरपर्यंत सगळ्या शस्त्रांचा त्यांनी मोठ्या खुबीने वापर केला.
अनेकांनी मरेपर्यंत मार खाऊनही गांधीगिरी सोडली नाही, हे विशेष. डॉ आंबेडकर, अन् चे गव्हेरांपासून प्रेरणा घेत तरुणाईने स्वतःला तर सांभाळलेच पण इतरांनाही आधार दिला. दिल्लीतील आंदोलनामध्ये म्हणूनच द्वेष नाही तर एक आपलेपणा दिसला. मुले उपरोधाच्या भाषेत बोलत होती, प्रसंगी त्याला विनोदाचीही जोड देत होती.
अखेर या जनरेट्यासमोर सरकार नमले. त्यांनी आंदोलकांच्या तीन महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्या आहेत. हे फक्त अन् फक्त तरुणाईचे यश आहे. काँग्रेस असो अथवा अन्य विरोधकांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काही कारण नाही. खरेतर या समस्या खूप आधीपासून दिसत असतानाही त्यावर कुणी बोलले नाही पण अभिजित दीपके नावाच्या एका सर्वसामान्य तरुणाने व्यवस्थेला आरसा दाखवून दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.