
Bengaluru-Varanasi Air India Flight: बंगळूरुहून वाराणसीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX-1086 या विमानातील एका प्रवाशाने चक्क कॉकपिटचा दरवाजा जबरदस्तीने उघडण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे विमानात तात्काळ ‘हायजॅक’चा अलार्म वाजला आणि सगळ्यांचा जीव टांगणीला लागला. मात्र क्रू मेंबर्सच्या सतर्कतेमुळे आणि वैमानिकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला. विमान सुरक्षितपणे वाराणसी विमानतळावर उतरल्यानंतर संबंधित प्रवाशाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) जवानांनी ताब्यात घेतले.
दरम्यान, ही घटना सोमवारी (22 सप्टेंबर) घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळूरुहून वाराणसीला निघालेले विमान आकाशात असताना एका प्रवाशाने (Passenger) कॉकपिटच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला क्रू मेंबर्संनी त्याला अडवले आणि त्याला त्याच्या जागेवर परत जाण्याची विनंती केली. मात्र, त्याने क्रूच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले आणि कॉकपिटमध्ये जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला. यामुळे विमानात एकच गोंधळ उडाला आणि काही काळासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले.
प्रवाशाचा संशयास्पद व्यवहार पाहता आणि त्याचा जबरदस्तीने कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न लक्षात घेता वैमानिकाने कोणताही धोका न पत्करता तात्काळ सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले. वैमानिकाने विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा इशारा देऊन तातडीने जमिनीवरील सुरक्षा दलांना माहिती दिली. वैमानिकाच्या या कृतीमुळे सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आणि त्यांनी वाराणसी विमानतळावर तयारी केली.
दरम्यान, विमान कर्मचाऱ्यांनी (कॅबिन क्रू) मोठ्या धाडसाने आणि प्रसंगावधान राखून त्या प्रवाशाला रोखले. अनेक प्रयत्न करुनही तो ऐकत नसल्याने क्रू मेंबर्संनी त्याला तात्काळ जागेवर बसवले आणि विमानाच्या सुरक्षित लँडिंगपर्यंत त्याला ताब्यात ठेवले. कॅबिन क्रूमधील सदस्यांनी परिस्थिती अतिशय शांतपणे आणि कुशलतेने हाताळली, ज्यामुळे प्रवाशांमध्ये जास्त भीती पसरली नाही.
वाराणसी विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरताच आधीच सतर्क असलेल्या CISF च्या जवानांनी त्या प्रवाशाला तात्काळ ताब्यात घेतले. त्याला लगेचच पुढील चौकशीसाठी अज्ञात ठिकाणी नेण्यात आले.
या प्रकरणावर एअर इंडिया (Air India) एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया दिली. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात प्रवक्ते म्हणाले, “वाराणसीला जाणाऱ्या आमच्या एका विमानातील घटनेबाबत आम्हाला माध्यमांमधून माहिती मिळाली. एक प्रवासी कॉकपिटच्या प्रवेशद्वाराजवळ शौचालयाच्या शोधात गेला होता. आम्ही हे स्पष्ट करतो की, आमच्याकडे सुरक्षा आणि संरक्षणाचे मजबूत प्रोटोकॉल आहेत आणि त्यात कोणताही अडथळा आला नाही. विमान उतरल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली असून सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.”
या घटनेने विमान प्रवासातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एखाद्या छोट्याशा चुकीमुळे किंवा गैरसमजामुळेही विमान प्रवासात किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो, हे या घटनेतून सिद्ध होते. वैमानिक, एअरलाईनचे कर्मचारी आणि सुरक्षा दल यांच्या समन्वयामुळेच ही गंभीर परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली गेली, ज्यामुळे सर्व प्रवाशांचा जीव वाचला. आता या प्रकरणाची पुढील चौकशी पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागील सत्य समोर येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.