
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राला भारतीय सैन्यात मोठी जबाबदारी मिळाली. दोन वेळचा ऑलिंपिक पदक विजेता नीरजला सैन्यात लेफ्टनंट कर्नलची ऑनररी रॅंक देण्यात आली. संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत सांगण्यात आले की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नीरज चोप्राला (Neeraj Chopra) या पदाने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. नीरज आधीच भारतीय सैन्यात सुभेदार मेजर म्हणून तैनात आहे.
संरक्षण मंत्रालयाने बुधवारी (14 मे) रोजी एका अधिसूचनेद्वारे यासंबंधी घोषणा केली. राष्ट्रपतींनी 9 मे रोजी या अधिसूचनेत याची घोषणा केली होती. संरक्षण मंत्रालयाच्या या अधिसूचनेनुसार, राष्ट्रपतींनी टेरिटोरियल आर्मी नियमांनुसार आपल्या अधिकारांचा वापर करुन नीरज चोप्राला मानद लेफ्टनंट कर्नल पद बहाल केले. नीरजची ही रँक 16 एप्रिल 2025 पासून लागू झाली.
भारतीय सैन्याच्या राजपुताना रायफल्समध्ये पहिल्यांदा सुभेदार आणि नंतर सुभेदार मेजर असलेल्या नीरजने जगभरात आपल्या उत्कृष्ट कामगिरीने देश आणि सैन्याचे नाव उंचावले. नीरजने 2016 मध्ये सैन्यात असताना ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. त्याचवर्षी तो सैन्यात भरती झाला आणि नंतर त्याला सुभेदार पद देण्यात आले. त्यानंतर टोकियो ऑलिंपिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक जिंकून, तो अॅथलेटिक्समध्ये ऑलिंपिक चॅम्पियन बनणारा पहिला भारतीय बनला. त्यानंतरच त्याला पदोन्नती मिळाली आणि तो सुभेदार मेजर झाला. या काळात त्याने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि नंतर डायमंड लीगचे विजेतेपदही जिंकले. गेल्या वर्षीच नीरजने पॅरिस ऑलिंपिकमध्येही रौप्य पदक जिंकले होते.
टेरिटोरियल सैन्यात राष्ट्रपतींनी एखाद्या खेळाडूला या पदाने सन्मानित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांना लेफ्टनंट कर्नल बनवण्यात आले. त्यानंतर 2011 मध्ये एमएस धोनी आणि अभिनव बिंद्रा यांनाही हा सन्मान मिळाला. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने (India) विश्वचषक जिंकला, तर बिंद्रा ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. तर महान फलंदाज सचिन तेंडुलकरला भारतीय हवाई दलाने मानद ग्रुप कॅप्टन बनवले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.