

दिवाळी म्हटली की फटाक्यांची आतषबाजी आणि रोषणाई आलीच. मात्र, यंदाच्या दिवाळीत सोशल मीडियावर एका वेगळ्याच प्रयोगाची जोरदार चर्चा रंगली आहे. प्रसिद्ध यूट्यूबर Mr. Indian Hacker याने एकाच वेळी तब्बल 1000 रॉकेट उडवण्याचा प्रयोग केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आकाशात उडणाऱ्या आगीच्या ज्वाळा आणि रंगीबेरंगी ठिणग्यांचा प्रचंड वर्षाव पाहायला मिळतो. हा व्हिडीओ पाहून काही नेटकरी थक्क झाले आहेत, तर काहींनी या प्रयोगावर पर्यावरणाच्या दृष्टीने प्रश्न उपस्थित केले आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये सुरुवातीला काही लोक लाल रंगाच्या रॉकेटचे बॉक्स उघडताना दिसतात. त्यानंतर शेकडो रॉकेट एकत्र बांधून त्यांचे मोठे गुच्छ तयार केले जातात. दिवसा सुरू असलेली ही तयारी संध्याकाळपर्यंत पूर्ण होते. त्यानंतर हे रॉकेटचे गुच्छ एका मोठ्या भांड्यात ठेवले जातात आणि त्यांना एकाच वेळी आग लावली जाते.
रॉकेट पेटवल्यानंतर काही क्षणांतच आकाशात मोठ्या प्रमाणात आतषबाजी सुरू होते. नारंगी रंगाच्या मोठमोठ्या ज्वाळा वर उसळताना दिसतात. त्याचबरोबर हिरव्या आणि पांढऱ्या रंगाच्या ठिणग्यांचा वर्षाव होतो. काही क्षणांत संपूर्ण परिसर धुराने व्यापल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. या अनोख्या प्रयोगामुळे सोशल मीडियावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. काही जणांनी या प्रयोगाचे कौतुक केले आहे. 'अप्रतिम दृश्य', 'काय जबरदस्त आतषबाजी आहे', अशा प्रतिक्रिया देत अनेकांनी व्हिडीओला पसंती दर्शवली आहे.
मात्र, दुसरीकडे अनेकांनी या प्रयोगावर टीका केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यामुळे प्रदूषण वाढते, तसेच यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो, असे काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. काहींनी हा पैसा गरजू मुलांना मदत करण्यासाठी वापरता आला असता, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर काही जुन्या चाहत्यांनी चॅनेलवरील विज्ञान प्रयोगांपेक्षा आता मोठे स्टंट आणि दिखावा अधिक दिसत असल्याची नाराजी व्यक्त केली आहे.
व्हिडीओमध्ये हा प्रयोग पुन्हा कुठेही करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही देण्यात आला आहे. अशा प्रकारचे प्रयोग व्यावसायिक देखरेखीखाली आणि सुरक्षिततेची योग्य व्यवस्था असलेल्या मोकळ्या जागेतच केले जातात. मोठ्या प्रमाणात फटाके एकत्र पेटवणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे घराच्या छतावर, गल्लीत किंवा सार्वजनिक ठिकाणी असा प्रयोग करण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. व्हिडीओ पाहून अनुकरण करण्याऐवजी सुरक्षिततेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे.
या व्हिडीओमुळे चर्चेत आलेल्या Mr. Indian Hacker याचे खरे नाव दिलराज सिंह रावत आहे. तो राजस्थानमधील अजमेर येथील रहिवासी आहे. त्याने 2012 मध्ये स्वतःच्या खोलीतून यूट्यूबचा प्रवास सुरू केला. सुरुवातीच्या काळात त्याच्याकडे महागडा कॅमेरा किंवा अत्याधुनिक प्रयोगशाळा नव्हती. तो मोबाइलच्या मदतीने व्हिडीओ तयार करत असत.
सुरुवातीला त्याच्या व्हिडीओंना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, त्याने सातत्याने वेगवेगळे प्रयोग आणि विज्ञानाशी संबंधित व्हिडीओ तयार करणे सुरू ठेवले. कुलूप उघडण्याच्या युक्त्या, विविध वैज्ञानिक प्रयोग आणि मोठ्या प्रमाणावरील स्टंट यांमुळे त्याला हळूहळू लोकप्रियता मिळाली. आज त्याच्या मुख्य यूट्यूब चॅनेलवर 50 मिलियनहून अधिक सबस्क्राइबर्स असल्याचा दावा करण्यात येतो. त्याच्या चाहत्यांना 'Titanium Army' या नावाने ओळखले जाते.
मोठ्या प्रमाणावरील प्रयोगांमुळे Mr. Indian Hacker ला मोठी लोकप्रियता मिळाली असली, तरी त्यांच्या काही स्टंटवर विज्ञान आणि मनोरंजन यांच्यातील सीमारेषेबाबत चर्चा होत असते. आता 1000 रॉकेटच्या या व्हिडीओमुळेही त्यांच्या प्रयोगांची सुरक्षितता, खर्च आणि पर्यावरणावरील परिणाम यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.