

Parliament Video: संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान 4 फेब्रुवारी रोजी लोकसभेत झालेल्या अभूतपूर्व गोंधळाचा एक नवा व्हिडिओ केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मंगळवारी (10 फेब्रुवारी) सोशल मीडियावर शेअर केला. यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी सभागृहात येण्यापूर्वीच विरोधी पक्षाच्या अनेक महिला खासदारांनी पंतप्रधानांच्या खुर्चीला घेराव घातल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
हातात फलक आणि बॅनर घेऊन या खासदार जोरदार निदर्शने करत होत्या. विशेष म्हणजे, यादरम्यान केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी हात जोडून या महिला खासदारांना पंतप्रधानांच्या आसनापासून दूर जाण्याची विनंती केली, मात्र आंदोलक खासदार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे या व्हिडिओतून समोर आले.
या संपूर्ण प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून भारतीय जनता पक्षाच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र लिहून या घटनेचा तीव्र निषेध केला. विरोधी खासदारांचं हे वागणं लोकशाही संस्थांची प्रतिमा मलीन करणारे आणि 'घृणास्पद' असल्याचे भाजपने म्हटले. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केवळ पंतप्रधानांच्या आसनालाच घेराव घातला नाही, तर त्यांनी सत्ताधारी बाकांवर जिथे ज्येष्ठ मंत्री बसतात, तिथेही प्रवेश केल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला. संसदेच्या (Parliament) नियमावलीनुसार अशा खासदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून, त्या दिवशी सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यासाठी अध्यक्षांनी घेतलेल्या भूमिकेचे सत्ताधारी खासदारांनी कौतुकही केले.
संसदेच्या 22 वर्षांच्या इतिहासात गेल्या आठवड्यात 4 फेब्रुवारी रोजी प्रथमच एक धक्कादायक घटना घडली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावावर चर्चा पूर्ण झाली, मात्र पंतप्रधानांच्या उत्तराशिवाय हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. स्वतः लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पंतप्रधानांना सभागृहात न येण्याची विनंती केली. अध्यक्ष बिर्ला यांनी यामागचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, "मला विश्वसनीय माहिती मिळाली होती की काँग्रेसचे काही सदस्य पंतप्रधानांच्या आसनापर्यंत धावून जाऊन एखादी अघटित घटना घडवू शकतात. जर तसे झाले असते, तर देशाच्या लोकशाही परंपरेला मोठा तडा गेला असता. त्यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा आणि पंतप्रधानांची सुरक्षा लक्षात घेता, मी त्यांना सभागृहात न येण्याची विनंती केली."
सभागृहाच्या नेत्याने अभिभाषणाला उत्तर न देणे हे नियमानुसार योग्य नसले, तरी त्या दिवशीची परिस्थिती अत्यंत स्फोटक होती, असे अध्यक्षांनी मान्य केले. मात्र, पंतप्रधान मोदींनी अध्यक्षांच्या विनंतीचा मान राखून सभागृहात न येण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे संसदेत निर्माण होऊ शकणारी एक अत्यंत अप्रिय आणि लज्जास्पद स्थिती टाळता आली, असेही बिर्ला यांनी नमूद केले. आता रिजिजू यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे विरोधकांनी केलेल्या नियोजित 'घेरावा'चा पुरावा समोर आल्याचा दावा भाजपकडून (BJP) केला जात आहे, तर विरोधकांनी हा व्हिडिओ म्हणजे आपली मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न असल्याची टीका केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.