

गेल्या अनेक महिन्यांपासून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आगामी आयपीएल २०२६ मध्ये आपल्या घरच्या मैदानावर खेळणार की नाही, याबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. कर्नाटक सरकारने एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएल सामने आयोजित करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने (KSCA) या निर्णयाचे स्वागत केले असून, यामुळे आरसीबीच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
चिन्नास्वामी स्टेडियमवर ही बंदी येण्यामागे एक अत्यंत दुःखद पार्श्वभूमी होती. ४ जून २०२५ रोजी, जेव्हा आरसीबीने आपल्या इतिहासातील पहिलेवहिले आयपीएल जेतेपद पटकावले, तेव्हा बेंगळुरूच्या रस्त्यांवर आणि स्टेडियमबाहेर लाखो चाहत्यांनी गर्दी केली होती.
या जल्लोषाच्या वेळी व्यवस्थापनातील त्रुटींमुळे मोठी चेंगराचेंगरी झाली होती. या दुर्दैवी घटनेत ११ निष्पाप चाहत्यांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने स्टेडियममध्ये मोठ्या सामन्यांच्या आयोजनावर कडक बंदी घातली होती.
कर्नाटक सरकारने ही परवानगी देताना सुरक्षेचे अतिशय कडक नियम लागू केले आहेत. केएससीएने स्पष्ट केले आहे की, त्यांनी तज्ज्ञ समितीसमोर सुरक्षा, गर्दीचे नियोजन आणि आपत्कालीन उपाययोजनांबाबत एक सविस्तर आराखडा सादर केला आहे.
भविष्यात अशा कोणत्याही दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी असोसिएशन सर्व तांत्रिक आणि सुरक्षा अटी पूर्ण करण्यास वचनबद्ध आहे. "आम्ही सरकारला दिलेल्या सर्व आश्वासनांची पूर्तता करू आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊ," असे केएससीएने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव बंदी असल्याने, चिन्नास्वामी स्टेडियमला टी-२० विश्वचषक २०२६ च्या यजमानपदाची संधी गमवावी लागली आहे. विश्वचषकाचे वेळापत्रक आधीच निश्चित झाल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी चाहत्यांना थोडी वाट पाहावी लागेल.
मात्र, आयपीएल २०२६ मध्ये आरसीबी आपला किताब राखण्यासाठी याच मैदानावर उतरणार असल्याने ही चाहत्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. गतविजेत्या आरसीबीचा 'होम ॲडव्हांटेज' आता कायम राहणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.