

मोरजी: गोव्याच्या शांत किनाऱ्यांवर रक्ताचा थरार उडाला आहे. मोरजी आणि हरमल भागात दोन रशियन महिलांचा गळा चिरुन खून करणाऱ्या आलंक्सेई लिओनोव या रशियन पर्यटकाने केवळ दोनच नव्हे, तर 10 हून अधिक तरुणींचा बळी घेतल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे गोवा हादरला असून कुप्रसिद्ध सिरीयल किलर महानंद नाईक याच्यानंतरचा हा गोव्यातील दुसरा सर्वात क्रूर सिरीयल किलर असल्याची भीती व्यक्त होत आहे.
रशियन महिलांच्या खूनप्रकरणी पेडणे पोलिसांनी संशयित लिओनोव याला अटक केली. शनिवारी (17 जानेवारी) त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने (Court) त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. संशयिताने दिलेली प्राथमिक माहिती आणि घटनास्थळावरील पुरावे पाहता हे प्रकरण केवळ दोन खुनांपुरते मर्यादित नसून याचे धागेदोरे खूप खोलवर असल्याचे पोलिसांचे मत आहे.
पोलीस तपासात समोर आलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे. लिओनोव हा रशियन महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत असे. त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन हसत-खेळत त्यांचे हात पाठीमागे बांधत असे. यानंतर महिला पूर्ण नग्न अवस्थेत आणि असहाय्य असताना तो त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करुन गळा चिरुन त्यांची हत्या करत असे. हरमल येथील गिरकरवाडा येथे राहणाऱ्या 37 वर्षीय एलिना कासचोनोवा आणि मोरजी येथील मधलावाडा येथे राहणाऱ्या एलिना वनिवा या दोन युवतींचा त्याने अशाच प्रकारे खून केला. विशेष म्हणजे, दोन्ही पीडितांचे नाव 'एलिना' असणे, हा योगायोग नसून आरोपीचा तो एक विशिष्ट कल असल्याचे दिसून येते.
पेडणे पोलीस ठाण्याचे उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि संपूर्ण पथक या प्रकरणाच्या चौकशीत रात्रंदिवस गुंतले आहे. संशयित आरोपीला घेऊन पोलीस ठिकठिकाणी चौकशीसाठी जात आहेत. त्याने आणखी किती युवतींना अशाच प्रकारे प्रेमाच्या जाळ्यात ओढून संपवले, याचा शोध घेतला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान लिओनोव काहीतरी वेगळेच बडबडत असून त्याच्या वागण्यातून तो एक मनोविकृत 'सिरीयल किलर' असल्याचे स्पष्ट होत आहे.
यापूर्वी, गोव्यात (Goa) 'महानंद नाईक' याने अनेक महिलांची लग्नाचे आमिष दाखवून हत्या केली होती. त्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. आता लिओनोवच्या रुपाने गोव्याच्या पर्यटनावर आणि सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परदेशी पर्यटकांमध्ये लपलेला हा रशियन किलर अजून किती जणांचा कर्दनकाळ ठरला आहे, हे पोलीस तपासात लवकरच स्पष्ट होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.