

नवी दिल्ली: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ प्लॅटफॉर्मच्या आयपीओने पहिल्याच दिवशी अवघ्या १०० मिनिटांत पूर्ण शंभर टक्के बोली मिळवून नवा विक्रम नोंदवला आहे. हा देशातील सर्वांत वेगवान बोली लागलेला पहिला आयपीओ ठरला आहे. या बहुचर्चित, बहुप्रतिक्षीत ३०,२१३ कोटी रुपयांच्या आयपीओला पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. याआधी बजाज हाउसिंग फायनान्सच्या आयपीओला पहिल्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत पूर्ण बोली लागली होती.
एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या २०२५ मध्ये आलेल्या आयपीओसाठी पहिल्याच दिवशी पूर्ण बोली लागली होती. मात्र, जिओ प्लॅटफॉर्मने अवघ्या १०० मिनिटांत हा टप्पा गाठला आहे. या आयपीओसाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ३.०१ पट बोली लागली. गुंतवणूकदारांनी सुमारे ६६,५०० कोटी रुपयांच्या बोली लावली. अँकर गुंतवणूकदारांच्या ८,११० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एकूण मागणी सुमारे ७४,६१० कोटी रुपयांवर पोहोचली. शेअर बाजारांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, या आयपीओमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या १९.७५ कोटी शेअरच्या तुलनेत ५९.४४ कोटी शेअरसाठी बोली लागली.
या आयपीओमध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (क्यूआयबी) राखीव असलेल्या हिश्शासाठी ९.०२ पट बोली लागली. या गटासाठी राखीव ४.९० कोटी शेअरच्या तुलनेत ४४.२२ कोटी शेअरसाठी बोली लागली. देशांतर्गत वित्तीय संस्था, बँका आणि विमा कंपन्यांनी मिळून २५.०२ कोटी शेअरसाठी, तर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १५.१४ कोटी शेअरसाठी बोली लावली. म्युच्युअल फंडांनी ३.१९ कोटी शेअरसाठी मागणी नोंदवली. बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी असलेल्या राखीव हिश्शासाठी १.५८ पट बोली लागली. मात्र, सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या प्रतिसाद तुलनेने कमी राहिला.
गुंतवणूकदारांकडूनही मोठी मागणी
जिओ प्लॅटफॉर्म्सने सोमवारी (ता. १९) २१२ अँकर गुंतवणूकदारांना प्रतिशेअर १,११९ रुपये या दराने सुमारे ८,११० कोटी रुपयांचे शेअर वितरित केले. यासाठी २.५ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक मागणी नोंदवण्यात आली होती.
मूल्यांकन १०८ अब्ज डॉलर
जिओ प्लॅटफॉर्मने आपल्या आयपीओसाठी प्रतिशेअर १,०६५ ते १,११९ रुपये असा किंमतपट्टा निश्चित केला आहे. वरच्या भावाने कंपनीचे मूल्यांकन सुमारे १०८ अब्ज डॉलर होणार आहे. दूरसंचार क्षेत्रातील मोठ्या ग्राहकवर्गाच्या बळावर डिजिटल सेवा, क्लाउड कम्प्युटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या क्षेत्रांत विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.