

Israel Iran War Protest J&K Assembly: जम्मू-काश्मीर विधानसभेचे अधिवेशन वादळी ठरत असून शुक्रवारी (27 मार्च) सभागृहात स्थानिक मुद्द्यांऐवजी जागतिक घडामोडींवरुन अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. मध्य पूर्वेत सुरु असलेल्या युद्धाचे पडसाद थेट विधानसभेत उमटले असून इराणच्या समर्थनावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये राडा झाला. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या समर्थनार्थ पोस्टर्स आणि अमेरिका-इस्रायल विरोधी घोषणाबाजीमुळे सभागृहाचे कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले. या गोंधळाचे रुपांतर नंतर वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपात झाले, ज्यामध्ये आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली.
सभागृहाच्या कार्यवाहीदरम्यान नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत वेलमध्ये धाव घेतली. यावेळी त्यांनी इस्रायल आणि अमेरिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. इराणवर (Iran) होत असलेल्या हल्ल्यांचा निषेध नोंदवत हे आमदार इराणच्या समर्थनार्थ उभे ठाकले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या तणावाचे पडसाद काश्मीरच्या विधानसभेत उमटल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. नॅशनल कॉन्फरन्सच्या या भूमिकेमुळे सभागृहात प्रचंड गोंधळ निर्माण झाला आणि कामकाजात व्यत्यय आला.
हा गोंधळ सुरु असतानाच काँग्रेसच्या आमदारांनी या वादाला वेगळे वळण दिले. काँग्रेस आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली, ज्यामुळे वातावरण अधिकच तापले. काँग्रेस (Congress) आमदार इरफान हाफिज लोन आणि भाजप आमदार युद्धवीर सेठी यांच्यात यावेळी तीव्र शाब्दिक चकमक उडाली. वादाचे स्वरुप इतके वाढले की दोन्ही नेत्यांमध्ये धक्काबुक्की झाली. भाजपने काँग्रेसच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना आक्रमक पवित्रा घेतला.
भाजप आमदार युद्धवीर सेठी यांनी काँग्रेसवर पलटवार करताना राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले, ज्यामुळे सभागृहातील संयम सुटला. सेठी यांनी केलेल्या विधानानंतर काँग्रेस आमदार अधिकच संतप्त झाले आणि सभागृहाचे रुपांतर एका आखाड्यात झाले. विधानसभा अध्यक्षांनी वारंवार शांततेचे आवाहन करुनही कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज 30 मिनिटांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. लोकशाहीच्या या सर्वोच्च मंदिरात जनहितार्थ चर्चा होण्याऐवजी जागतिक राजकारण आणि वैयक्तिक टीकेवरुन झालेल्या या राड्यामुळे सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.