

Jammu-Kashmir vs Delhi: भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये जम्मू-काश्मीर संघाने एक मोठा इतिहास रचला. रणजी करंडक स्पर्धेच्या 96 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरने बलाढ्य दिल्ली संघाचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयामुळे संपूर्ण क्रिकेट जगतात जम्मू-काश्मीरच्या खेळाडूंचे कौतुक होत आहे.
दिल्लीविरुद्धच्या (Delhi) या ऐतिहासिक विजयामध्ये अष्टपैलू कामगिरी करणारा आकिब नबी याला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र, त्याच्याशिवाय कर्णधार पारस डोगरा, सलामीवीर कामरान इक्बाल आणि गोलंदाज वंशराज शर्मा यांनीही चमक दाखवली.
दिल्लीने जम्मू-काश्मीरसमोर विजयासाठी 179 धावांचे लक्ष्य ठेवले होते. जम्मू-काश्मीरने हे लक्ष्य केवळ 3 विकेट्स गमावून सहज गाठले आणि ऐतिहासिक विजय मिळवला. या माफक धावसंख्येचा पाठलाग करताना सलामीवीर कामरान इक्बाल याने सर्वात मोठी भूमिका निभावली. त्याने एकट्याने 133 धावा ठोकल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.
सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) वेगवान गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजांना फार काळ मैदानावर टिकू दिले नाही. दिल्लीने पहिल्या डावात 211 धावा केल्या होत्या. दिल्लीला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्यात वेगवान गोलंदाज आकिब नबी याची भूमिका निर्णायक ठरली. त्याने पहिल्या डावात फक्त 35 धावा देत 5 महत्त्वाचे बळी घेतले. दुसऱ्या डावात वेगवान गोलंदाज वंशराज शर्मा याची दहशत पाहायला मिळाली. त्याने एकट्याने दिल्लीच्या 6 फलंदाजांना तंबूत पाठवले. पहिल्या डावातील 2 विकेट्ससह वंशराजने संपूर्ण सामन्यात एकूण 8 विकेट्स घेतल्या.
दिल्लीच्या 211 धावांना उत्तर देताना जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात 310 धावा केल्या. यात कर्णधार पारस डोगरा याच्या 106 धावांच्या शानदार शतकाचा मोठा वाटा होता, ज्यामुळे जम्मू-काश्मीरला 99 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली. पहिल्या डावातील 99 धावांची आघाडी भरुन काढण्यासाठी दिल्लीने दुसऱ्या डावात थोडी चांगली कामगिरी केली, पण ते 300 धावांचा आकडा पार करु शकले नाहीत आणि 277 धावांवर सर्व संघ गारद झाला.
जम्मू-काश्मीरने या विजयाने रणजी करंडक स्पर्धेतील आपली क्षमता सिद्ध केली असून, या ऐतिहासिक कामगिरीमुळे या हंगामात त्यांची गाडी पुढे सरकण्याची चिन्हे आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.