

जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'इंडियन प्रीमियर लीग' (IPL) मधून बांगलादेशी खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पाकिस्ताननंतर बांगलादेश हा दुसरा देश ठरला आहे, ज्यांच्या खेळाडूंवर आयपीएलमध्ये अघोषित बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे संतापलेल्या बांगलादेश सरकारने आता आपल्या देशात आयपीएलच्या प्रक्षेपणावरच बंदी घालण्याची तयारी सुरू केली असून, क्रीडा विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
आयपीएल २०२६ च्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला ९.२ कोटी रुपयांच्या मोठ्या रकमेत खरेदी केले होते. मात्र, बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर भारतातून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
प्रसिद्ध कथावाचक देवकीनंदन ठाकूर आणि इतर अनेक संघटनांनी बांगलादेशी खेळाडूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी लावून धरली होती. या वाढत्या दबावामुळे ३ जानेवारी २०२६ रोजी बीसीसीआयच्या सूचनेवरून केकेआरने मुस्तफिजुरला संघातून मुक्त केले. विशेष म्हणजे, यंदाच्या हंगामात तो एकमेव बांगलादेशी खेळाडू होता.
भारताच्या या भूमिकेमुळे बांगलादेशात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. बांगलादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी यावर आक्रमक भूमिका घेतली आहे.
त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे अधिकृत विनंती केली आहे की, बांगलादेशमध्ये आयपीएलच्या सर्व सामन्यांचे प्रसारण बंद करण्यात यावे. जर ही मागणी मान्य झाली, तर बांगलादेशमध्ये आयपीएल पूर्णपणे 'बॅन' होईल. या निर्णयामुळे दोन्ही देशांतील क्रिकेट संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे.
२००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामात पाकिस्तानी खेळाडूंनी सहभाग घेतला होता, मात्र सीमापार दहशतवाद आणि बिघडलेल्या राजकीय संबंधांमुळे २००९ पासून त्यांच्यावर कायमची बंदी घालण्यात आली. आता तशीच परिस्थिती बांगलादेशच्या बाबतीत निर्माण झाली आहे.
बांगलादेशातील बदललेली राजकीय स्थिती आणि तिथल्या अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांमुळे भारतीय चाहत्यांनी बांगलादेशी खेळाडूंना भारतात खेळण्यास विरोध केला आहे. बीसीसीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे भविष्यात आयपीएलमध्ये बांगलादेशी खेळाडू दिसण्याची शक्यता धूसर झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.