
Shubman Gill Video: वेस्ट इंडिजविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकल्यानंतर टीम इंडिया आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाली. या दौऱ्यावर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वनडे (ODI) आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे, ज्याची सुरुवात 19 ऑक्टोबरपासून होणार आहे. विशेष म्हणजे, या मालिकेने शुभमन गिल भारतीय वनडे संघाचा कर्णधार म्हणून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा नवा अध्याय सुरु करणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा झाली, तेव्हा रोहित शर्माला संघात स्थान मिळाले, परंतु कर्णधारपदाची जबाबदारी शुभमन गिलकडे सोपवण्यात आली. मुख्य सिलेक्टर्स अजित आगरकर यांनी या निर्णयामागे 2027 च्या वनडे वर्ल्डकपची तयारी हे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे युवा गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया कशी कामगिरी करते याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी शुभमन गिलची रोहित शर्मा आणि विराट कोहलीसोबत झालेली भेट सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया 14 ऑक्टोबरच्या संध्याकाळी रवाना झाली. बीसीसीआयने (BCCI) यासंबंधीचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केला, जो तूफान व्हायरल होत आहे.
हॉटेलमध्ये जेव्हा कर्णधार शुभमन गिलची माजी कर्णधार रोहित शर्मासोबत भेट झाली, तेव्हा दोघांमध्ये उत्साहपूर्ण आणि जिव्हाळ्याचे वातावरण पाहायला मिळाले. गिल रोहितला भेटायला गेला, तेव्हा रोहित एका कामात व्यस्त होता, पण गिलने त्याच्या पाठीवर हात ठेवताच दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलले आणि त्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. यावेळी रोहितने गिलला 'क्या हाल है भाई' असा सवाल देखील केला. रोहितने आपला शेवटचा वनडे सामना या वर्षाच्या सुरुवातीला खेळला होता, जेव्हा त्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले होते.
त्याचवेळी, व्हिडिओमध्ये गिल दिग्गज विराट कोहलीला भेटल्याचेही दिसत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विमानतळाकडे रवाना होण्याकरता टीम बसमध्ये ही भेट झाली. गिल बसमध्ये चढला तेव्हा विराट अगदी समोरच्या सीटवर बसला होता. गिलने बसमध्ये प्रवेश केल्यावर कोहलीशी हात मिळवला, ज्यावेळी कोहलीने त्याला शाबासकी देखील दिली. कोहलीला मैदानावर खेळताना पाहण्यासाठी चाहते खूप आतुर झाले आहेत, कारण त्यानेही आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात खेळला होता.
वनडे क्रिकेटमध्ये शुभमन गिलला नेतृत्वाची मोठी संधी मिळाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या वरिष्ठ खेळाडूंची साथ त्याला या दौऱ्यात लाभणार आहे. अनुभवी खेळाडूंचे मार्गदर्शन आणि युवा कर्णधाराचा उत्साह याच्या जोरावर टीम इंडिया ऑस्ट्रेलियात कशी कामगिरी करते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.