
India vs New Zealand Champions Trophy 2025 Final
टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे विजेतेपद पटकावले आहे. एकतर्फी झालेल्या सामन्यात रोहितच्या सेनेनं न्यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव केला. टीम इंडियाने किवी संघाने दिलेले २५२ धावांचे लक्ष्य केवळ ६ विकेट्स गमावून पूर्ण केले. यासह भारतानं १२ वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. यापूर्वी २०१३ मध्ये भारतानं ही स्पर्धा जिंकली होती.
कीवींनी दिलेल्या २५२ धावांच्या पाठलाग करायला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात वादळी झाली. शुभमन गिलसोबत रोहितनं पहिल्या १० षटकांत ६४ धावा केल्या. मात्र यानंतर मधल्या षटकात १७ धावांत ३ विकेट गमावल्यानं टीम इंडिया अडचणीत आली.
यादरम्यान रोहितही ७६ धावा करुन आउट झाला. पुढे अक्षर पटेल आणि श्रेयस अय्यर यांच्यात ६१ धावांची भागीदारी झाली आणि भारताचा विजय सुकर झाला. शेवटी राहुलनं संयमी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
फलंदाजीत रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि केएल राहुल यांनी दमदार कामगिरी केली. कर्णधार रोहितनं ७६ धावा केल्या. श्रेयस अय्यरने ४८ धावांचे योगदान दिले. केएल राहुल आणि हार्दिक पंड्या यांनी शेवटच्या षटकांमध्ये शानदार फलंदाजी केली आणि भारतीय संघाला लक्ष्यापर्यंत पोहोचवले.केएल राहुलनं नाबाद राहत ३४ धावा केल्या. तर अक्षर पटेल मधल्या फळीत संघाला गरज असताना २९ धावा केल्या.
गोलंदाजीत भारतीय संघातील फिरकीपटूंनी त्यांची जादू दाखवली. वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांना १-१ विकेट मिळाली.
टीम इंडियानं २००० च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाचाही बदला घेतला आहे. त्या सामन्यात टीम इंडिया प्रथम फलंदाजी करायला आली. कर्णधार सौरव गांगुलीनं शानदार शतक (११७ धावा) झळकावलं होतं.
सौरव गांगुली व्यतिरिक्त सचिन तेंडुलकरनं ६९ धावा काढल्या. टीम इंडियानं ६ बाद २६४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल, ख्रिस केर्न्स (१०२) च्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडनं ४ विकेट्सने सामना जिंकला आणि न्यूझीलंड संघ चॅम्पियन ठरला होता. त्या सामन्याचा बदला भारतानं घेतला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.