PM Narendra Modi: हिमाचल प्रदेशात बुधवारी 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी राज्याच्या पोलिसांनी पत्रकारांकडे कॅरेक्टर सर्टिफिकेटची मागणी केली होती. तथापि, त्यावरून बराच गदारोळ माजल्यानंतर अखेर पोलिसांनी ही अट रद्द केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी हिमाचल प्रदेश दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात मोदींच्या कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांना सुरक्षा पास दिला जातो. तथापि, हिमाचल प्रदेशच्या पोलिसांनी या सुरक्षा पाससाठी पत्रकारांकडून कॅरेक्टर सर्टिफिकेटची मागणी केली. त्याशिवाय पत्रकारांना सुरक्षा पास दिला जाणार नाही, असे सांगितले गेले होते.
विशेष म्हणजे केवळ वर्तमानपत्रांचे पत्रकार, खासगी वृत्तवाहिन्याच नव्हे तर डिजिटल प्रसारमाध्यमांशी संबंधित पत्रकार, छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर आणि सरकारी प्रसारमाध्यमे असलेल्या आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या पत्रकारांनाही ही अट लागू केली होती. बिलासपूर येथील पोलिस उपाधिक्षकांच्या कार्यालयाच्यावतीने हे कॅरेक्टर सर्टिफिकेट दिले जाणार होते. यासाठी पोलिसांनी २९ सप्टेंबर रोजी एक अधिसूचनाही काढली होती.
त्यावर सर्वच विरोधी पक्षांकडून टीकेची झोड उठविण्यात आली होती. आम आदमी पक्षाचे प्रवक्ता पंकज पंडित म्हणाले की, मोदीजी काही पहिल्यांदाच राज्याच्या दौऱ्यावर येत नाही आहेत. पत्रकारांकडून कॅरेक्टर सर्टिफिकेटची मागणी करणे अपमानास्पद आहे. प्रसारमाध्यमांवर नियंत्रण ठेवण्याचा हा प्रकार आहे. काँग्रेसचे प्रवक्ता नरेश चौहान यांनीही प्रशासनाचा निषेध नोंदवत प्रसारमाध्यमांवर दबाव टाकला जात असल्याची टीका केली होती.
पोलिसांचे स्पष्टीकरण
दरम्यान, या गदारोळानंतर बिलासपुरच्या पोलिस अधीक्षकांनी पुन्हा नवी अधिसूनचा काढून आधीची अधिसूनचा मागे घेतली आहे. कार्यालयाने पुर्वीची अधिसूनचा अनावधानाने काढली होती. ती मागे घेतली जात असल्याचे नवीन अधिसूचनेत म्हटले आहे. आम्ही सर्व पत्रकारांचे पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात स्वागत करत आहोत. हिमाचल प्रदेशचे पोलिस महासंचालक संजय कुंदू यांनीही ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे,
असा आहे मोदींचा दौरा
५ ऑक्टोबर रोजी बिलासपूर येथे एम्स रूग्णालयाचे उद्घाटन करतील. २०१७ मध्ये मोदींनी या रूग्णालयाचे भूमिपूजन केले आहे. याशिवाय पिंजोर-नालगड ३१ किलोमीटर लांबींच्या चौपदरी राष्ट्रीय महामार्गाची पायाभरणी मोदी करतील. तसेच नालगड येथे ३५० कोटी रूपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या मेडिकल पार्कचे भूमिपूजनही मोदी करतील. तसेच ते कुलू येथील दसरा सोहळ्यात सहभागी होतील.
मोदींची याधीची सभा झाली होती रद्द
यापुर्वी गेल्या महिन्यात 24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींची सभा हिमाचल प्रदेशात होणार होती, पण खराब हवामानामुळे ही सभा होऊ शकली नव्हती. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या मोदींच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहेच.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.