

झीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची निवड आज होणार आहे. या निवडीच्या काही तास आधीच स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने आपल्या बॅटने निवडकर्त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये बडोदा संघाकडून खेळताना हार्दिकने विदर्भ विरुद्ध अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याचे चित्र पालटले. त्याने एकाच षटकात सलग ५ षटकार आणि १ चौकार मारत आपले शतक पूर्ण केले.
बडोद्याच्या डावातील ३९ वी ओव्हर ऐतिहासिक ठरली. हार्दिक पांड्या तेव्हा ६२ चेंडूत ६६ धावांवर खेळत होता. विदर्भाकडून डावखुरा फिरकीपटू पार्थ रेखडे गोलंदाजीसाठी आला. हार्दिकने पहिल्या पाच चेंडूंवर सलग ५ गगनभेदी षटकार खेचले.
शेवटच्या चेंडूवर चौकार मारून त्याने अवघ्या ६ चेंडूंत ३४ धावा वसूल केल्या आणि आपले शतक पूर्ण केले. ६६ वरून थेट १०० धावांपर्यंत पोहोचण्याचा त्याचा हा वेग पाहून प्रेक्षक आणि मैदानातील खेळाडूही अवाक झाले.
हार्दिकने आपल्या खेळीची सुरुवात अतिशय सावध केली होती, त्याने ४४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले होते. मात्र, एकदा का लय सापडल्यानंतर त्याने विदर्भाच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. हार्दिक ९२ चेंडूंमध्ये १३३ धावांची खेळी करून बाद झाला.
या स्फोटक खेळीत त्याने ११ षटकार आणि ८ चौकारांची आतषबाजी केली. हार्दिकच्या या शतकामुळे बडोद्याने निर्धारित ५० षटकांत ९ गडी गमावून २९३ धावांपर्यंत मजल मारली. बडोद्याच्या इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही; विष्णू सोलंकीने २६, तर कर्णधार कृणाल पांड्याने २३ धावांचे योगदान दिले.
विदर्भाकडून यश ठाकूरने सर्वाधिक ४ बळी घेतले, ज्यात हार्दिकच्या महत्त्वाच्या विकेटचा समावेश होता. मात्र, हार्दिकने पार्थ रेखडेच्या एका षटकात केलेल्या धुलाईमुळे पार्थने १० षटकांत ८० धावा मोजल्या. हार्दिकची ही खेळी अशा वेळी आली आहे, जेव्हा भारतीय संघात त्याच्या पुनरागमन आणि फिटनेसवर चर्चा सुरू आहे. आज होणाऱ्या बीसीसीआयच्या बैठकीत हार्दिकच्या या शतकाचा नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.