Goa Nightclub Fire: हडफडेचे पदच्युत सरपंच, सचिवांची पोलिसांच्या हातावर तुरी! जामीन फेटाळल्यानंतर भूमिगत; हायकोर्टात जाण्याची शक्यता

Arpora Nightclub Fire: हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकर आणि बडतर्फ सचिव रघुवीर बागकर यांच्या मागे आता पोलिस लागले आहेत. मात्र, दिवसभरात ते पोलिसांना सापडू शकले नाहीत.
Goa Nightclub Fire
Goa Nightclub FireDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकर आणि बडतर्फ सचिव रघुवीर बागकर यांच्या मागे आता पोलिस लागले आहेत. मात्र, दिवसभरात ते पोलिसांना सापडू शकले नाहीत.

बर्च बाय रोमिओ लेन या नाईट क्लबला आग लागून २५ जण मृत्युमुखी पडल्यानंतर केलेल्या न्यायदंडाधिकारी चौकशीत सरपंच आणि पंचायत सचिव यांनी बेकायदेशीरपणाकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर त्यांची चौकशी अनिवार्य झाली आहे. त्याआधीच पोलिस अटकेच्या भीतीने हे दोघे जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी गेले होते. तेथे त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाचा निकाल लागेपर्यंत अटकेपासून न्यायालयाने त्यांना संरक्षण दिले होते.

आता जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. आता अटक होईल, या भीतीने ते दोघेही भूमिगत झाले आहेत. पोलिसांनी आज दिवसभर जंग जंग पछाडूनही ते त्यांच्या हाती लागलेले नाहीत.

हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या क्लबमधील अग्नितांडव प्रकरणात सरकारी सेवेतून बडतर्फ केलेले पंचायत सचिव रघुवीर बागकर तसेच हडफडे-नागवाचे माजी सरपंच रोशन रेडकर यांना पंचसदस्य म्हणून अपात्र ठरविण्याचा आदेश पंचायत संचालकांनी ३१ डिसेंबर २०२५ रोजी जारी केला होता.

या प्रकरणात, हणजूण पोलिसांकडून अटक होऊ शकते, या भीतीने दोघांनी म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयात धाव घेत, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, सरकारी पक्षाने कोर्टासमोर मुद्देसूद युक्तिवाद करीत, दोघांच्या अर्जावर जोरदार हरकत घेतली होती.

त्यानुसार, या दोघांचा अटकपूर्व अर्ज ३० डिसेंबर २०२५ रोजी न्यायालयाने फेटाळला होता. या आदेशानंतर हणजूण पोलिस दोघांचा सर्वत्र शोध घेताहेत. पोलिसांची विविध पथके दोघांच्याही घराबाहेर तसेच इतरत्र घिरट्या घालत, तिथे चोवीस तास तैनात आहेत.

मात्र, अद्याप दोघेही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. उल्लेखनीय म्हणजे, दोघांचे मोबाईल फोन स्वीच ऑफ येत असल्याने, तांत्रिकदृष्ट्या पोलिसांना दोघांचा माग काढण्यात अचडणी येताहेत, असे सूत्रांनी सांगितले. शुक्रवारीही (२ डिसेंबर) अपात्र सरपंच तसेच बडतर्फ सचिव हे त्यांच्या घरी पोलिसांना सापडले नव्हते.

मिश्रांवर मेहरबानी का? : सावियो रॉड्रिग्स

मडगाव : हडफडे येथील नाईट क्लब दुर्घटनेसंदर्भात न्‍यायदंडाधिकाऱ्यांकडून जी चौकशी झाली, ती करताना या दुर्घटनेला कारणीभूत ठरणारे आयएएस अधिकारी अरुणकुमार मिश्रा यांना का बोलावले नाही, असा सवाल करून या चौकशीसंदर्भात भाजपचे पदाधिकारी सावियो रॉड्रिग्स यांनी आक्षेप घेतला आहे. मिश्रा हे किनारपट्टी व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे चेअरमन असताना त्‍यांनी या क्‍लबवरील कारवाई रोखून धरली होती, अशी माहिती यापूर्वी पुढे आली होती. अशा बेकायदेशीर कृत्‍याला मिश्रा यांनी साहाय्‍य करुनही त्‍यांच्‍यावर मेहरबानी का? असा सवाल सावियो यांनी केला आहे.

मोबाईल बंद

या दोघांनी मोबाईल क्रमांक बंद ठेवल्याने तांत्रिक मदतीने त्यांचा ठावठिकाणा शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. रेडकर यांनी ही घटना घडल्यानंतर भाजपवर तोंडसुख घेतले होते. आपण भाजप सोडत असल्याचे त्यांंनी रागाच्या भरात जाहीर केले होते. त्यामुळे आता सत्ताधारी वर्तुळातून मदत मिळण्याची आशा कमी झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेणे किंवा पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर होणे असेच दोन पर्याय त्यांच्यासमोर आहेत.

Goa Nightclub Fire
Madkai Fire News: मडकईत घराला आग; 10 लाखांचे नुकसान Video

...या कारणास्तव लपल्याची चर्चा

रोशन रेडकर यांना पंचायत संचालकांनी सरपंच व पंच म्हणून अपात्र ठरवतानाच पुढील पाच वर्षे कोणत्याही पंचायतीची निवडणूक लढवण्यास बंदी घातली आहे. त्याशिवाय रघुवीर बागकर यांना सरकारी सेवेतून बडतर्फ केले आहे. त्यामुळे ते आता सर्वसामान्य नागरिक झाले आहेत. त्याशिवाय पंचायतीचे दप्तर हणजूण पोलिसांनी जप्त केल्याने त्‍यांना कोणत्याही कागदपत्रांत फेरफार करणे कठीण झाले आहे. आज किंवा उद्या अटक झाल्यास रविवारी जामीन मिळणार नाही, या भीतीने ते लपल्याची चर्चा आहे.

Goa Nightclub Fire
Arpora Nightclub Fire: हडफडेतील क्लब संरचना मूलतःच बेकायदेशीर, व्यापार परवाना नाही हे माहित होते; पंचायत सचिवाची जबानी

हायकोर्टाचे दरवाजे ठोठावण्याची शक्यता

याप्रकरणी म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. सध्या दोघांचे मोबाईल फोन ‘स्वीच ऑफ’ असून, हणजूण पोलिसांकडून त्यांचा शोध घेणे सुरू आहे. अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या दिवसापासून दोघेही हणजूण पोलिसांच्या रडारवर आहेत. मात्र, अद्याप ते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. दोघेही अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com