Rahul Gandhi ‘‘छत्तीसगड, मध्य प्रदेश व तेलंगण विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला निश्चितपणे यश मिळणार आहे; परंतु राजस्थानमध्ये सत्ता टिकवून ठेवणे काहीसे कठीण जाईल, तेथे स्पर्धा अटीतटीची आहे,’’ अशी कबुली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज दिली.
या सर्व राज्यांमध्ये या वर्षाअखेरीस निवडणूक अपेक्षित असून बहुतेक सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राहुल यांचे हे विधान राजस्थानमधील काँग्रेस कार्यकर्त्यांना इशारा देणारे मानले जात आहे.
ईशान्य भारतातील एका माध्यम समूहाने दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी विविध विषयांवर मते मांडली. भारत जोडो यात्रा, महिला आरक्षण विधेयक, पूर्वोत्तर राज्यांतील स्थिती, भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा अशा विविध विषयांवर त्यांनी विचार मांडले.
यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘‘येत्या डिसेंबरमध्ये पाच राज्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. यात तेलंगण, मध्य प्रदेश व छत्तीसगड या राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष निश्चितपणे सत्तेत येणार आहे. भाजपचे नेतेसुद्धा हे मान्य करीत आहेत.
...ही तर भाजपची खेळी
राहुल गांधी यांनी भाजपचे खासदार रमेश बिधुरी यांनी बसपचे नेते दानिश अली यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरही प्रतिक्रिया दिली. जातिनिहाय जनगणनेपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप नेहमीच अशा प्रकारच्या क्लृप्त्या करत असतो, अशी टीका त्यांनी केली.
‘‘जातिनिहाय जनगणनेवर भाजपला चर्चा नको आहे. आम्ही ज्या ज्या वेळी हा मुद्दा उपस्थित करतो, तेव्हा ते वादग्रस्त विधाने करून मूळ प्रश्नापासून दूर जातात,’’ असा आरोप राहुल यांनी भाजपवर केला.
गुन्हेगारी घटनांवरून काँग्रेसवर टीका
राजस्थानात काँग्रेसला निवडणूक जिंकण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागण्याचे सूतोवाच राहुल गांधी यांनी केले असतानाच भाजपच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी राजस्थानमध्ये गुन्हेगारी घटना वाढल्यावरून तोफ डागली आहे.
अत्याचार आणि अन्याय दूर करण्यासाठी महिलांना पुढे येण्याचे आवाहन करताना त्या म्हणाल्या,‘‘ज्यावेळी देवही असाहाय्य होतात, त्यावेळी देवी महिषासुर मर्दिनीचा अवतार घेऊन महिषासुराचा वध करते.
आपला अभिमान जपण्यासाठी महिला चंडीचे रूप घेतात. आज राजस्थानात महिलांवर होत अत्याचार होत असल्याच्या अनेक बातम्या ऐकू येतात.
ख्रिस्तियानो रोनाल्डो आवडता खेळाडू
मला क्रिकेटपेक्षा फुटबॉल खेळ अधिक आवडत असून पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो हा आवडता खेळाडू असल्याचे राहुल गांधी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. ‘रोनाल्डोचा दयाळूपणा आपल्याला भावतो, मात्र खेळाडू म्हणून माझ्या चमूमध्ये मात्र अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीला स्थान देऊ,’ असेही त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.