DNA Test: छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात पीडिता अल्पवयीन असल्यापासूनच डॉक्टर एका मुलीचे लैंगिक शोषण करत होता. मुलीचे लग्न झाल्यानंतरही डॉक्टर तिच्यावर बळजबरी करतच राहिला आणि त्यातून दोघांना एक मुलगी झाली.
जेव्हा पीडितेने आरोपीला मुलीचे नाव लावण्यास सांगितले असता त्याने नकार दिला. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आणि आता न्यायालयाने आरोपी डॉक्टरची डीएनए चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.
यापूर्वी डॉक्टरांनी चाचणी करण्यास नकार दिला होता. मात्र आता बिलासपूर उच्च न्यायालयाने ही चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.
या संपूर्ण प्रकरणाबाबत पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिची आई आरोपी डॉ. सुखदेव सिंग गुरिया यांच्याकडे उपचारासाठी जात असे. तेव्हा पीडिता फक्त 13 वर्षांची होती. 2005 मध्ये डॉक्टरने आधी तिचा विनयभंग केला आणि नंतर तिला मारहाण, धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला.
जेव्हा ती 18 वर्षांची झाली तेव्हा 2010 मध्ये मध्य प्रदेशातील होशंगाबादमध्ये तिचे लग्न झाले. ती पुढे म्हणाली की, जेव्हा ती तिच्या आई-वडिलांच्या घरी यायची तेव्हा डॉक्टर तिला ब्लॅकमेल करून धमकावत तिच्यावर बलात्कार करायचा. 2011 मध्ये तिने पहिल्या मुलीला डॉक्टरांकडून जन्म दिला आणि त्यानंतर तिने पतीपासून दुसऱ्या मुलीला जन्म दिला.
पीडितेने पुढे सांगितले की, 2019 मध्ये ती पुन्हा तिच्या माहेरी आली असता आरोपी डॉक्टरने पुन्हा तिच्याशी संबंध ठेवले. तिने नकार दिल्यावर मारहाण करून धमकावले. त्यामुळे त्रस्त तरुणीने हिंमत एकवटून त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तिने पुढे सांगितले की, आरोपी डॉक्टर गेल्या 14 वर्षांपासून तिचे शारीरिक शोषण करत आहे. सध्या पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली असून, या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
न्यायालयात सुनावणीदरम्यान आरोपी डॉक्टरने मुलीचे आरोप खोटे असल्याचे म्हटले. पोलिस आणि न्यायालयाने डीएनए चाचणी करण्यास सांगितले तेव्हा आरोपीने नकार दिला.
या संपूर्ण प्रकरणात पीडित आणि तिची मुलगी डीएनए चाचणी करण्याच्या तयारीत होती. डीएनए चाचणी करून घेण्यासाठी त्यांनी आपल्या वकीलामार्फत उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती, तेथे दोन्ही पक्षांमध्ये सुनावणी झाली.
यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एनके व्यास यांनी पीडिता, तिची मुलगी आणि आरोपी डॉक्टरची डीएनए चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. सध्याच्या परिस्थितीत डीएनए चाचणी करूनच सत्य बाहेर येईल, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.