Candolim Murder Case: म्हापसा कोर्टाने संशयित सूचनाला दिलेल्या या सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत चौकशीदरम्यान सूचना अनेकदा ओक्साबोक्शी रडल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरुवातीला तिच्याकडून कोणतेची सहकार्य पोलिसांना मिळाले नाही.
मात्र नंतर ती फक्त पोलीस निरीक्षक परेश यांच्याशी बोलू लागली आणि हळूहळू गोष्टींचा उलघडा होऊ लागला. यावेळी अनेकदा तिने पोलिसांकडे मुलाचा फोटो दाखवण्याची मागणी केली. जेव्हा पोलीस तिला मोबाईलवर चिन्मयचा फोटो दाखवत तेव्हा-तेव्हा तिच्या अश्रूंचा बांध फुटे.
कांदोळीत झालेल्या 4 वर्षीय खून प्रकरणात सूचनाचा पती व्यंकटरमणला पोलिसांनी चौकशीसाठी समन्स जारी केले होते. त्यानुसार काल (13 जानेवारी) व्यंकटरमण आपल्या वकिलासोबत कळंगुट पोलिसांसमोर हजर झाला. यावेळी साडेतीन तासांच्या चौकशीअंती त्याचा अधिकृत जबाब नोंदवण्यात आला.
उपलब्ध माहितीनुसार, यावेळी सूचना आणि व्यंकटरमण यांची एकत्र चौकशी करण्यात आली. दोघेही समोर येताच त्यांच्यामध्ये मुलाच्या हत्येवरून खटके उडाले. 'तू असे कृत्य का केलेस? माझ्या मुलाला का मारलेस? तुला राग होताच तर तो माझ्यावर काढायचा? निष्पाप मुलाचा बळी का घेतलास?’ मुलाच्या मृत्यूने उद्ध्वस्त झालेल्या व्यंकटरमणने सूचनाला असे सवाल केल्यानंतर तिने घडलेल्या घटनेला त्यालाच दोषी मानले. तसेच मुलाचा खून आपण केला नसल्याचे सांगितले. साधारण त्यांच्यामध्ये 20 मिनिटे आरोप-प्रत्यारोपाचे हे सत्र सुरू होते.
या प्रकरणातील महत्वाचा दुवा असलेले व्यंकटरमण यांची उद्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयात डीएनए चाचणी होणार आहे. या घटनेतील कोणतीही बाब/पुरावे सुटू किंवा दुर्लक्षित होऊ नयेत यासाठी कळंगुट पोलिसांनी सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित केले असल्याचे सांगितले.
आज (14 जानेवारी) म्हापसा कोर्टाने सूचनाला सुनावलेला सहा दिवसांचा पोलीस कोठडीचा कालावधी पूर्ण होत आहे. याबाबत उद्या बालन्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये होणाऱ्या निर्णयाकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
संशयित सूचना सेठ व तिचा पत्नी व्यंकटरमण यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याने हे प्रकरण न्यायलयात गेले होते. दोघांच्या घटस्फोटासाठी बंगळुरुमधील कोर्टात सुनावणी चालू होती. याव्यतिरिक्त चिन्मयच्या कस्टडीसाठी दोघांमध्ये न्यायालयीन लढाई सुरू होती.
अशातच, बंगळुरुच्या फॅमिटी कोर्टाने व्यंकटरमण यांना चिन्मयला भेटण्यासाठी परवानगी दिली होती आणि कदाचित हाच मुद्दा सूचनाला खटकला असावा व तिने चिन्मयची हत्या केली असावी अशी शक्यता व्यंकटरमण यांच्या बाजूने वकील अॅड. अझर मीर यांनी आज शनिवारी माध्यमांसमोर व्यक्त केली. अॅड. अझर मीर पुढे म्हणाले की, सूचनाला राग होताच, तर तो त्यांनी व्यंकटरमण यांच्यावर काढायचा होता.
चिन्मयचा जीव घेऊन कुणाचे बरे झाले? राहिला प्रश्न न्यायाचा, तर आम्हाला कुठल्याच न्यायाची अपेक्षा नाही. कारण, चिन्मय या जगात नाही. चिन्मयसाठी व्यंकटरमण यांनी स्वतःचा जीव दिला असता. आता सूचना हिला शिक्षा होवो अथवा नको. किंवा सूचनाला पोलिस कोठडीतच ठेवल्यानेसुद्धा व्यंकटरमण यांना आता कोणताच फरक पडत नाही. कारण, व्यंकटरमण यांनी त्यांचे सर्वस्व असलेला चिन्मय गमावला असल्याचे अॅड. मीर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.