

School Bus Accident: देशभरात शाळकरी मुलांच्या बस अपघाताच्या दोन गंभीर घटना एकाच वेळी समोर आल्या आहेत. मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात एक स्कूल बस नदीत कोसळल्याने अनेक मुले जखमी झाली, तर दुसरीकडे हरियाणातील चरखी दादरी येथे रोडवेज बस आणि स्कूल बसची समोरासमोर धडक होऊन 11वीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आणि 18 मुले जखमी झाली.
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) विदिशा जिल्ह्यामध्ये जोहड गावाजवळ एक स्कूल बस नदीत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. ही बातमी समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर तात्काळ मदतकार्य सुरु करण्यात आले आणि मुलांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. बस नदीत कोसळल्यामुळे अनेक मुलांना जबर मार लागला. विदिशा मेडिकल कॉलेजचे बीएमओ डॉ. नारायण यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आज दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास 6 मुलांना गंभीर अवस्थेत मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले. सुमारे 25 मुलांना घेऊन जाणारी एक बस जाहोद नदीत कोसळल्याचे सांगण्यात आले."
रुग्णालयात (Hospital) दाखल केलेल्या 6 मुलांपैकी 2 मुलांना डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु आहेत. उर्वरित 4 मुलांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर आहेत. हा अपघात सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर मुलांच्या पालकांनी आणि स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. तातडीने मुलांचे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण करण्यात आले आणि जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले.
दरम्यान, या घटनेबरोबरच हरियाणातील चरखी दादरी येथेही एक अत्यंत भीषण अपघात झाला. दादरी-बिरोहड रोडवर हरियाणा रोडवेजची बस आणि एका खासगी स्कूल बसची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. या अपघातात 11वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच, या घटनेत एकूण 18 मुले गंभीर जखमी झाली आहेत. अपघात इतका भीषण होता की, स्कूल बसचा अक्षरशः चक्काचूर झाला. आजूबाजूच्या परिसरात दूरवर या धडकेचा मोठा आवाज ऐकू आल्याने लोक घाबरुन घटनास्थळी धावले.
सर्व जखमी मुलांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दादरीहून बिरोहड रोडवरुन हरियाणा रोडवेजची बस जात होती. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने खासगी स्कूलची बस मुलांना शाळेत घेऊन जात होती. दोन्ही वाहने समोरासमोर आल्याने जोरदार धडक झाली. एकाच दिवशी शाळकरी मुलांच्या बस अपघाताच्या या दोन मोठ्या घटनांमुळे शालेय वाहतुकीच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन्ही ठिकाणी स्थानिक पोलीस तपास करत असून, अपघातांची नेमकी कारणे शोधत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.