

Delhi Metro Viral Video: "दिल्ली मेट्रोमध्ये आपले स्वागत आहे!" मेट्रोमध्ये पाऊल ठेवताच प्रवाशांच्या कानी पडणारा हा आवाज आता केवळ औपचारिक उरला आहे की काय, असा प्रश्न पडू लागला आहे. कारण सध्या दिल्ली मेट्रो प्रवासापेक्षा प्रवाशांच्या आपापसातील वादांमुळे, शिवीगाळ आणि हाणामारीमुळे जास्त चर्चेत असते. कधी डान्स रील, तर कधी विचित्र कपड्यांमुळे प्रसिद्धीझोतात राहणारी दिल्ली मेट्रो आता वादाचा अड्डा बनताना दिसत आहे. नुकताच दोन महिला प्रवाशांमधील हाणामारीचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून यावरुन नेटकऱ्यांनी मेट्रो प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर @gharkekalesh नावाच्या पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दोन महिला किंवा तरुणींमध्ये झालेल्या तुफान हाणामारीचे दृश्य दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रोच्या गर्दीत एकमेकींना धक्का लागल्याच्या कारणावरुन हा वाद सुरु झाला असावा, असे कॅप्शनवरुन समजते.
काही क्षणातच या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. व्हिडिओमध्ये या दोन्ही महिला (Women) एकमेकींचे केस ओढताना, एकमेकींना धक्काबुक्की करताना आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. मेट्रोच्या डब्यात इतर प्रवासी हे सर्व शांतपणे पाहत उभे असल्याचेही दिसून येत आहे. काही प्रवाशांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र या महिला इतक्या संतापलेल्या होत्या की कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत त्या नव्हत्या.
हा व्हिडिओ आतापर्यंत 40000 पेक्षा जास्त वेळा पाहिला गेला असून त्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. दिल्ली मेट्रोमधील या सततच्या वादांना कंटाळून अनेक यूजर्संनी उपरोधिक टीका केली. एका युजरने म्हटले की, "दिल्ली मेट्रो हे आता सार्वजनिक वाहतुकीचे साधन राहिले नसून एक 'रिअॅलिटी शो' बनले आहे."
दुसऱ्या एका युजरने या दोघींच्या हाणामारीला 'WWE' आणि 'स्मैकडाउन'ची उपमा दिली असून त्यांना थेट कुस्तीच्या रिंगणात पाठवण्याचा सल्ला दिला आहे. एकाने तर गमतीने म्हटले की, "दिल्ली-गुडगाव हे तर आपले कार्टून नेटवर्क आहे."
काही नेटकऱ्यांनी पॉपकॉर्न खातानाचे 'GIF' शेअर करत म्हटले की, "जेव्हा आपल्या अवतीभवती मोफत मनोरंजन उपलब्ध आहे, तेव्हा टीव्हीची गरजच काय?"
दिल्ली (Delhi) मेट्रोमध्ये अशा प्रकारच्या घटना नवीन नाहीत. वारंवार घडणाऱ्या या प्रकारांमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कधी सीटवरुन, तर कधी गेटजवळ उभं राहण्यावरुन प्रवाशांमध्ये फ्री-स्टाइल हाणामारी पाहायला मिळते. या व्हिडिओची नेमकी तारीख आणि मेट्रोची लाईन कोणती होती, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अशा घटनांमुळे मेट्रोचा प्रवास सुखावह होण्याऐवजी तणावपूर्ण होत आहे.
दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (DMRC) यापूर्वीही प्रवाशांना शिस्त पाळण्याचे आवाहन केले आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला, परंतु अशा व्हिडिओंची वाढती संख्या पाहता या आवाहनाचा कोणताही परिणाम होताना दिसत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.