Tamil Nadu: मोदी आडनाव प्रकरणी दोषी ठरल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर देखील काँग्रेस नेत्यांची भाषणबाजी सुरूच आहे. एकीकडे विरोधी पक्ष भाजपवर निशाणा साधत आहेत, तर दुसरीकडे भाजपही काँग्रेस आणि राहुल गांधींवर सातत्याने हल्लाबोल करत आहे.
या सगळ्यात काँग्रेस नेत्याने राहुल गांधींना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशाची जीभ कापण्याची धमकी दिली आहे.
तामिळनाडूच्या दिंडीगुलमध्ये राहुल गांधींना खासदार म्हणून अपात्र ठरवल्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या एससी/एसटी शाखेने शुक्रवारी निषेध व्यक्त केला. येथे पक्षाचे जिल्हाप्रमुख मणिकंदन यांनी आपल्या भाषणादरम्यान काँग्रेसची सत्ता आल्यास राहुल गांधींना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देणाऱ्या न्यायाधीशाची जीभ कापून टाकू, अशी धमकी दिली.
“23 मार्च रोजी सुरत न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आमचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. न्यायमूर्ती एच वर्मा ऐका, जेव्हा काँग्रेस सत्तेवर येईल तेव्हा आम्ही तुमची जीभ कापून टाकू." असे वादग्रस्त विधान मणिकंदन यांनी केले.
घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक पोलिस ठाण्यात मणिकंदनविरुद्ध तीन कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच दिंडी उत्तर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास करून पुढील कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, 13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकमधील एका निवडणूक रॅलीत राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. 'नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी... सगळ्यांना एक समान आडनाव का आहे? सगळ्या चोरांची आडनाव मोदी का? या वक्तव्याबद्दल भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.
यावर 23 मार्च रोजी सुरतच्या कोर्टाने राहुलला दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. शिक्षेची घोषणा करताना न्यायालयाने म्हटले होते की, 'भाषण एका खासदाराने दिले असल्याने गुन्ह्याचे गांभीर्यही मोठे आहे, ज्याचा जनतेवर खोलवर परिणाम होतो.' कमी शिक्षा दिल्यास चुकीचा संदेश जाईल, असेही न्यायालयाने म्हटले होते.
दोन वर्षांच्या शिक्षेमुळे राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्वही रद्द करण्यात आले. कायद्यानुसार खासदाराला दोन वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सदस्यत्व लगेच संपते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.