

Rubaiya Sayeed Kidnapping Case: केंद्रीय अन्वेषण विभागाने एका मोठ्या आणि भारतीय इतिहासातील महत्त्वपूर्ण केसमध्ये मोठे यश मिळवले. भारताचे माजी गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची कन्या डॉ. रुबिया सईद यांच्या अपहरण प्रकरणातील 36 वर्षे जुन्या केसमध्ये वॉन्टेड असलेला फरार आरोपी शफात अहमद शांगलू याला सीबीआयने अटक केली. 1989 मध्ये घडलेल्या आणि भारतीय राजकारणासोबत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचे वळण ठरलेल्या या प्रकरणाला या अटकेमुळे पुन्हा एकदा गती मिळाली.
आरोपी शफात अहमद शांगलू याच्यावर 1989 मध्ये झालेल्या अपहरण कटात सहभाग असल्याचा आरोप आहे. त्याने दहशतवादी यासीन मलिक (Yasin Malik) आणि इतर आरोपींसोबत मिळून आरपीसी (RPC) आणि टाडा (TADA) कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हेगारी कट रचल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अपहरण प्रकरणाशी संबंधित पकडलेला आरोपी शफात अहमद शांगलू हा गेली 36 वर्षे फरार होता आणि त्याच्यावर 10 लाख रुपयांचा इनामही घोषित करण्यात आला होता. आरोपीला आता कायद्यानुसार निर्धारित वेळेत जम्मू येथील विशेष टाडा कोर्टासमोर (TADA Court) हजर केले जाईल.
डॉ. रुबिया सईद यांच्या अपहरणाची ही घटना 8 डिसेंबर 1989 रोजी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे घडली होती. रुबिया सईद या त्यावेळी भारताचे तत्कालीन गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या कन्या होत्या. मुफ्ती मोहम्मद सईद हे 2 डिसेंबर 1989 पासून पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून कार्यरत होते. रुबिया सईद यांचे अपहरण जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी केले होते. अपहरणकर्त्यांनी रुबिया सईद यांच्या सुटकेच्या बदल्यात 5 दहशतवाद्यांना सोडण्याची मागणी केली होती, जी तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांच्या सरकारने स्वीकारली होती.
अपहरणकर्त्यांच्या मागणीनुसार 5 दहशतवाद्यांना सोडण्याचा हा निर्णय भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा आणि अत्यंत वादग्रस्त मानला जातो. कारण या घटनेमुळे काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांचे मनोधैर्य वाढले आणि तेथील दहशतवादाला प्रोत्साहन मिळाले, असा मतप्रवाह आहे. मुफ्ती मोहम्मद सईद यांनी 10 नोव्हेंबर 1990 पर्यंत गृहमंत्री पद भूषवले. त्यानंतर त्यांनी 2002 ते 2005 आणि पुन्हा 2015 ते 2015 या कालावधीत जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्रीपदही सांभाळले.
डॉ. रुबिया सईद यांच्या अपहरण प्रकरणात यासीन मलिक आणि इतर आरोपींवर कोर्टाने यापूर्वीच आरोप निश्चित केले आहेत. रुबिया सईद यांनी कोर्टात आपली साक्ष नोंदवताना यासीन मलिकसह काही अन्य अपहरणकर्त्यांची ओळखही पटवली. अपहरण आणि दहशतवाद्यांची सुटका करण्याची ही घटना काश्मीर खोऱ्यात दहशतवाद वाढण्याचे एक महत्त्वाचे वळण मानली जाते. 36 वर्षांनंतर या प्रकरणातील फरार आरोपीला अटक झाल्यामुळे या ऐतिहासिक प्रकरणातील उर्वरित आरोपींवरही कायदेशीर कारवाईचा फास आवळला जाईल, अशी शक्यता सीबीआयने वर्तवली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.