

Bengaluru Digital Arrest Scam: सायबर फसवणुकीच्या एका अत्यंत गंभीर आणि धक्कादायक घटनेत बंगळुरु येथील एका 57 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने 'डिजिटल अरेस्ट' नावाच्या स्कॅममध्ये आपले तब्बल 31.83 कोटी रुपये गमावले. फसवणूक करणाऱ्यांनी स्वतःला केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) चे अधिकारी भासवून स्काईपद्वारे महिलेवर सतत नजर ठेवली आणि तिच्या मनात दहशत निर्माण करुन ही रक्कम हडप केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
शहर परिसरात राहणाऱ्या या सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फसवणूक करणाऱ्यांनी तिला सहा महिन्यांहून अधिक काळ 'डिजिटल अटक'च्या जाळ्यात अडकवून ठेवले आणि तिची सर्व आर्थिक माहिती मिळवली. या फसवणुकीची सुरुवात 15 सप्टेंबर 2024 रोजी झाली. एका व्यक्तीने या महिलेला फोन केला आणि तो डीएचएल (DHL) अंधेरी येथून बोलत असल्याचा दावा केला. त्याने सांगितले की, तुमच्या नावावर बुक केलेल्या एका पार्सलमध्ये क्रेडिट कार्ड्स, पासपोर्ट (Passport) आणि 'एमडीएमए' (MDMA - मादक पदार्थ) आढळले आहेत.
महिला (Women) काही उत्तर देण्यापूर्वीच तो कॉल लगेचच स्वतःला CBI अधिकारी भासवणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करण्यात आला. या आरोपींनी महिलेला धमकावले आणि 'सर्व पुरावे तुमच्या विरोधात आहेत' असा दावा केला. आरोपींनी महिलेला त्वरित दोन स्काईप आयडी तयार करण्याचे आणि व्हिडिओ कॉलवर सतत कनेक्टेड राहण्याचे निर्देश दिले. यानंतर, मोहित हांडा नावाच्या व्यक्तीने दोन दिवस आणि त्यानंतर राहुल यादवने एक आठवडा महिलेवर व्हिडिओ कॉलद्वारे सतत नजर ठेवली. प्रदीप सिंग नावाच्या आणखी एका आरोपीने स्वतःला CBI चा वरिष्ठ अधिकारी सांगितले आणि महिलेवर आपली निर्दोषता सिद्ध करण्यासाठी दबाव टाकला.
आरोपींनी महिलेच्या मनातील भीतीचा गैरफायदा घेतला. 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर या काळात महिलेला तिचे सर्व आर्थिक तपशील आरोपींना द्यावे लागले आणि तिने मोठी रक्कम हस्तांतरित केली. 24 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान, महिलेने कथित जामीन रक्कम म्हणून दोन कोटी रुपये जमा केले. त्यानंतर टॅक्स भरण्यासाठी म्हणून आणखी मोठी रक्कम घेतली गेली. पीडितेने तक्रारीत म्हटले की, फसवणूक करणाऱ्यांनी तिच्याकडून एकूण 187 व्यवहार करवून घेतले आणि तिच्याकडून जवळपास 31.83 कोटी रुपये हडप केले.
या सर्व मानसिक दबावामुळे पीडित महिलेची प्रकृती बिघडली. तिला मानसिक ताण सहन करावा लागल्यामुळे ती गंभीर आजारी पडली आणि त्यातून सावरण्यासाठी तिला एक महिन्याचा कालावधी लागला. 1 डिसेंबरला तिला 'क्लिअरन्स लेटर' मिळाल्याचे सांगण्यात आले. मात्र, डिसेंबरनंतरही घोटाळेखोरांनी 'प्रोसेसिंग फी'च्या नावाखाली पैशांची मागणी सुरु ठेवली आणि रिफंड देण्याची तारीख सतत पुढे ढकलत राहिले. अखेरीस, 26 मार्च 2025 रोजी फसवणूक करणाऱ्यांकडून सर्व संवाद थांबवण्यात आला. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.