
पणजी: गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करत १८ लाखांच्या सायबर फसवणूक प्रकरणाचा यशस्वी तपास केला आहे. पोलिसांनी पंजाबमध्ये जाऊन लुधियाना, पंजाब येथील १९ वर्षीय संशयित सुरिंदर कुमार याला अटक केली आहे. संशयितास न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्याची नोंद गुन्हा क्र. १५/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१८(४), ३१९(२) सह ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६-डी अंतर्गत करण्यात आली आहे. ३ जून २०२५ रोजी अज्ञात संशयिताने स्वतःची सीबीआय अधिकारी म्हणून ओळख देत पीडित व्यक्तीशी व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधला.
पीडिताचे बँक खाते व वैयक्तिक माहिती मनी लाँडरिंग प्रकरणात अडकलेली आहे असा बनाव केला आणि कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी पीडितास रुपये १८ लाख खात्यात जमा करण्यास भाग पाडले.
सायबर पोलिसांनी तांत्रिक पातळीवर तपास व आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेत या फसवणुकीचा तपशील शोधून काढला. याअंतर्गत संशयिताची ओळख पटवून तो पंजाबमधील लुधियाना येथे असल्याचे निष्पन्न झाले. गोवा सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अनिल पोलेकर, हेड कॉन्स्टेबल अनय नाईक व सिद्रामय्या मत्त यांनी पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अक्षत आयुष (आयपीएस) व पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता (आयपीएस) यांच्या मार्गदर्शनाखाली लुधियानामध्ये जाऊन यशस्वी कामगिरी बजाविली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.