भारतीय जनता पक्षाने ( BJP) आपल्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना निलंबित केले आहे. गेल्या आठवड्यात एका टीव्ही चर्चेदरम्यान, प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या कथित वक्तव्यावरुन वाद सुरु झाला. या वक्तव्याबाबत आखाती देशांतूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यानंतर नुपूर यांनी कोणत्याही अटीशिवाय आपले वादग्रस्त वक्तव्य मागे घेतले आहे. ट्विटरवरील आपल्या मेसेजमध्ये त्यांनी लिहिले की, 'कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा माझा कधीही हेतू नव्हता.' (bjp leader nupur sharma suspended for her controversial remarks)
कोण आहेत नुपर शर्मा
नुपूर यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्या पेशाने वकील आणि भाजपच्या प्रमुख नेत्या आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून (Delhi University) कायद्याची पदवी घेतली आहे. 2011 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) मधून एलएलएम (Master of Laws) पूर्ण केले. नूपूर कॉलेजमधील दिवसांपासून राजकारणात (Politics) सक्रिय आहेत. लिंक्डइनच्या प्रोफाइलनुसार, त्यांनी जुलै 2009 ते जून 2010 पर्यंत "टीच फॉर इंडिया" चे राजदूत म्हणून काम केले.
राजकीय कारकीर्द
ऑस्ट्रेलिया-आशिया युथ डायलॉगनुसार, नुपूरची राजकीय कारकीर्द 2008 मध्ये सुरु झाली, जेव्हा त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडंट युनियन (DUSU) च्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी भाजपच्या युवा शाखेसाठीही काम केले आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात निवडणूक लढवली
नुपूरने 2015 ची दिल्ली विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध नवी दिल्ली मतदारसंघातून लढवली होती. मात्र त्यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता.
वादग्रस्त टिप्पणी
नुपूर यांच्या वक्तव्यावरुन उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर भाजपने त्यांच्यावर कारवाई केली. कानपूरमधील हिंसाचारात 40 हून अधिक लोक जखमी झाले असून, हिंसाचार प्रकरणात 1500 हून अधिक जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. सौदी अरेबिया, कतार, बहारीन आणि इराणसारख्या देशांनी या टिप्पणीवर कठोर शब्दांत टीका केली आहे. याप्रकरणी कतार आणि बहरीनने भारतीय राजदूताला बोलावून नाराजी व्यक्त केली. मात्र, या देशांनी भाजपने नूपूरवर केलेल्या कारवाईचे स्वागत केले आहे.
भारत सरकारने या वक्तव्यांना "अयोग्य" आणि "संकुचित" म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, "भारत सरकार सर्व धर्मांचा आदर करते." ते पुढे म्हणाले, "काही व्यक्तींकडून एका आदरणीय व्यक्तिमत्त्वाविरुद्ध ट्विट आणि अयोग्य वक्तव्य केले गेले.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.