

Bihar Crime News: बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली. घराच्या उदरनिर्वाहासाठी आर्केस्ट्रात काम करणाऱ्या एका निष्पाप तरुणीला सहा नराधमांनी रस्त्यातून पळवून नेले आणि रात्रभर तिच्यावर पाशवी अत्याचार केले. या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून पीडित तरुणी सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी नेवलाल चौक परिसरातून पायी आपल्या घराकडे जात होती. त्याचवेळी कारमधून आलेल्या सहा तरुणांनी तिला घेरले. तिने विरोध केला असता, आरोपींनी तिला जबरदस्तीने ओढत कारमध्ये बसवले. तिथून तिला सुमारे 25 किलोमीटर दूर असलेल्या बरियार चौक येथील 'जया ट्रेडर्स'च्या एका खोलीत नेण्यात आले. तिथे नराधमांनी तिला डांबून ठेवले आणि तिला जबरदस्तीने दारु पाजली. त्यानंतर सहाही नराधमांनी रात्रभर तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला.
या भयानक परिस्थितीतही पीडित तरुणीने कमालीचे धैर्य दाखवले. पहाटेच्या सुमारास जेव्हा मुख्य आरोपी मोहम्मद जुनेद नशेच्या धुंदीत गाढ झोपी गेला, तेव्हा पीडितेने संधी साधून त्याचाच मोबाईल उचलला. तिने तत्काळ पोलिसांच्या '112' या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल केला आणि तिचे लोकेशन सांगितले. ही माहिती मिळताच डगरुआ पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळाकडे रवाना झाले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून खोलीचा दरवाजा तोडला तेव्हा तरुणी अत्यंत विदारक अवस्थेत आढळली. मुख्य आरोपी जुनेद तिथेच झोपलेला होता, ज्याला पोलिसांनी (Police) जागीच बेड्या ठोकल्या.
डगरुआ पोलीस स्टेशनच्या एसआय पूर्णिमा कुमारी यांनी या सामूहिक बलात्काराच्या घटनेला दुजोरा दिला. त्यांनी सांगितले की, "मुख्य आरोपी मोहम्मद जुनेदला अटक करुन जेलमध्ये पाठवण्यात आले आहे. या गुन्ह्यात सामील असलेल्या उर्वरित पाच आरोपींची ओळख पटली असून पोलीस त्यांच्या शोधात आहेत. फरार आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत."
पीडित तरुणीवर सध्या पूर्णिया मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. एका सामान्य कुटुंबातील ही मुलगी आर्केस्ट्रात काम करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत होती. मात्र, या नराधमांनी तिच्या स्वप्नांचा चक्काचूर केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.