

आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) आपल्या १५ सदस्यीय संघाची अधिकृत घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, सध्या आयपीएलमधील हकालपट्टीमुळे चर्चेत असलेला स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला संघात स्थान देण्यात आले आहे. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या महाकुंभासाठी बांगलादेशने अनुभवी आणि तरुण खेळाडूंचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला असून, यष्टिरक्षक फलंदाज लिटन दासकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुस्तफिजुर रहमान हा भारत आणि बांगलादेशमधील वादाचा केंद्रबिंदू ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला संघातून डच्चू दिल्यानंतर बांगलादेशनेही भारतात आयपीएल प्रक्षेपणावर बंदी घालण्याची मागणी केली होती. या सर्व राजकीय आणि क्रीडा वादाच्या पार्श्वभूमीवर, बांगलादेशने आपल्या मुख्य वेगवान गोलंदाजावर विश्वास कायम ठेवला आहे. मुस्तफिजुरसह तस्कीन अहमद आणि शोरफुल इस्लाम यांच्यावर वेगवान गोलंदाजीची मदार असेल.
बांगलादेशने यावेळेस संघात काही महत्त्वाचे बदल केले आहेत. अनुभवी लिटन दास संघाचे नेतृत्व करेल, तर मोहम्मद सैफ हसन याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तौहीद हृदोय आणि तंजीद हसन यांच्यासारख्या स्फोटक फलंदाजांचा संघात समावेश करून फलंदाजीची फळी भक्कम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अष्टपैलू मेहदी हसन आणि फिरकीपटू रिशाद हुसैन हे फिरकी विभागाचे नेतृत्व करतील.
२०२६ चा टी-२० विश्वचषक ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी जगभरातील संघ आपली तयारी अंतिम टप्प्यात आणत आहेत. बांगलादेशने आपला संघ जाहीर केला असला तरी, भारताविरुद्ध सुरू असलेल्या क्रीडा तणावाचा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मुस्तफिजुर रहमानसाठी ही स्पर्धा स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी असेल, कारण आयपीएलमधील कारवाईनंतर तो पहिल्यांदाच मोठ्या आंतरराष्ट्रीय मंचावर दिसेल.
बांगलादेशचा संघ: लिटन दास (कर्णधार), मोहम्मद सैफ हसन (उपकप्तान), तंजीद हसन, मोहम्मद परवेज हुसैन इमोन, तौहीद हृदोय, शमीम हुसैन, काजी नुरुल हसन सोहन, मेहदी हसन, रिशाद हुसैन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तंजीम हसन साकिब, तस्कीन अहमद, मोहम्मद शैफुद्दीन आणि शोरफुल इस्लाम.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.