

आगामी ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ पूर्वी क्रिकेट विश्वात एक मोठी खळबळ उडाली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) आपल्या संघाला भारतात पाठवण्यास अधिकृतपणे नकार दिला असून, या संदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) पत्र लिहून तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या निर्णयामुळे भारत आणि बांगलादेशमधील क्रीडा संबंध आता एका अत्यंत कठीण वळणावर येऊन पोहोचले आहेत.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे संचालक खालिद मसूद पायलट यांनी भारताच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "जर भारत आमच्या एका खेळाडूला (मुस्तफिजुर) सुरक्षा देऊ शकत नसेल, तर आमच्या संपूर्ण संघाच्या सुरक्षेची जबाबदारी ते कशी घेणार?" असा सवाल त्यांनी केला आहे.
त्यामुळेच बांगलादेशने त्यांचे सर्व सामने भारताबाहेर, विशेषतः श्रीलंकेत हलवण्याची मागणी आयसीसीकडे केली आहे. या निर्णयाला बांगलादेशच्या क्रीडा मंत्रालयानेही पाठिंबा दिला असून, त्यांनी याला भारताच्या धोरणांना दिलेले चोख प्रत्युत्तर म्हटले आहे.
या वादाची खरी सुरुवात ३ जानेवारी रोजी झाली. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) ९.२ कोटी रुपयांना खरेदी केलेल्या बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला बीसीसीआयच्या आदेशानंतर संघातून मुक्त (Release) करण्यात आले.
बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ भारतात मुस्तफिजुरविरुद्ध संतापाची लाट होती. बीसीसीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे बांगलादेश सरकार आणि क्रिकेट बोर्ड संतापले असून, त्यांनी थेट विश्वचषकावरच गदा आणण्याचा प्रयत्न केला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आधीच सुरक्षेच्या कारणास्तव भारताबाहेर 'हायब्रीड मॉडेल'मध्ये खेळवण्याचा निर्णय झाला आहे. आता बांगलादेशनेही भारतात खेळण्यास नकार दिल्याने आयसीसीचे नवनियुक्त अध्यक्ष जय शाह यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
बांगलादेशचे तीन सामने कोलकात्यात आणि एक मुंबईत होणार होता. जर बांगलादेश आपल्या भूमिकेवर ठाम राहिला, तर विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इतकेच नाही तर बांगलादेशने आपल्या देशात आयपीएलच्या प्रक्षेपणावरही बंदी घालण्याची तयारी सुरू केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.