

Money Laundering Case: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने मोठी कारवाई करत अल फलाह युनिव्हर्सिटीचे संस्थापक जावेद अहमद सिद्दीकी यांना अटक केली. अल फलाह ग्रुपचे चेअरमन असलेल्या सिद्दीकी यांना मंगळवारी (18 नोव्हेंबर) मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा, 2002 च्या कलम 19 अंतर्गत अटक करण्यात आली. अल फलाह ग्रुपशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केल्यानंतर मिळालेल्या महत्त्वाच्या माहिती आणि पुराव्यांच्या आधारावर ईडीने ही कारवाई केली.
ईडीने ही मनी लॉन्ड्रिंगची चौकशी दिल्ली पोलीस क्राईम ब्रँचने दाखल केलेल्या दोन स्वतंत्र एफआयआरच्या आधारावर सुरु केली होती. फरीदाबाद येथील अल फलाह युनिव्हर्सिटीने नॅशनल असेसमेंट ॲण्ड ॲक्रिडिटेशन कौन्सिलची मान्यता असल्याचा चुकीचा दावा केला होता, असा गंभीर आरोप या एफआयआरमध्ये करण्यात आला होता.
अल फलाह युनिव्हर्सिटीने 'युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन'च्या कलम 12(B) अंतर्गत मान्यता असल्याचा खोटा दावा केला होता. यूजीसीने स्पष्ट केले की, अल फलाह युनिव्हर्सिटी केवळ कलम 2(F) अंतर्गत एक राज्य खासगी विद्यापीठ म्हणून सूचीबद्ध आहे. या विद्यापीठाने 12(B) अंतर्गत मान्यतेसाठी कधीही अर्ज केलेला नव्हता. अशा प्रकारे खोटी माहिती देऊन त्यांनी शिक्षण आणि आर्थिक क्षेत्रात अनियमितता केल्याचा ईडीला संशय आहे.
दिल्लीतील प्रवर्तन निदेशालयच्या पथकाने मंगळवारी एकूण 19 ठिकाणी छापे टाकले. यात अल फलाह युनिव्हर्सिटी आणि या ट्रस्टशी जोडलेल्या महत्त्वाच्या लोकांच्या घरांचा समावेश होता. छाप्यात ईडीला खालील महत्त्वाच्या वस्तू आणि पुरावे मिळाले. 48 लाखांहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच, अनेक डिजिटल डिव्हाईसेस जप्त करण्यात आले. याशिवाय, काही महत्त्वाचे दस्तऐवज हाती लागले. अनेक शेल कंपन्यांसंबंधित पुरावे देखील मिळाले.
अल फलाह युनिव्हर्सिटीच्या संस्थापकाच्या अटकेवर स्पष्टीकरण देताना ईडीने म्हटले की, जावेद अहमद सिद्दीकी हेच ट्रस्टचे आणि त्याच्या आर्थिक निर्णयांचे वास्तविक नियंत्रक आहेत. मिळालेल्या पुराव्यांवरुन हे स्पष्ट होते की, त्यांनी गुन्ह्यातून कमावलेले पैसे लपवले आणि वेगवेगळ्या मार्गांनी ते पैसे फिरवले. या पुराव्यांच्या आधारावर आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
अल-फलाह चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना 8 सप्टेंबर 1995 रोजी झाली. जावेद अहमद सिद्दीकी पहिल्या दिवसापासून या ट्रस्टचे विश्वस्त आहेत. युनिव्हर्सिटी आणि त्याअंतर्गत येणारे सर्व कॉलेज याच ट्रस्टच्या अंतर्गत येतात. 1990 च्या दशकापासून या ट्रस्ट आणि ग्रुपने अतिशय वेगाने आपला विस्तार केला, मात्र ही वाढ त्यांच्या सामान्य आर्थिक क्षमतेशी जुळणारी नव्हती, असा ईडीचा प्राथमिक निष्कर्ष आहे. यामुळेच मनी लॉन्ड्रिंगचा संशय बळावला. या अटकेमुळे शिक्षण क्षेत्रातील या मोठ्या संस्थेच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.