डॉ. संगीता साेनक
पणसायमळ. गोव्यातील कुशावती नदीच्या तीरावर वसलेले एक छोटेसे गाव. कुणाच्या अध्यातमध्यात नसलेले. कधी फारसे ऐकिवात न आलेले. थोडेसे सुस्तावलेले, कुशावतीच्या कुशीत शांत पहुडलेले.
पण अचानक या गावाला जाग आली ती अनेक शतकांपूर्वी तिथे राहिलेल्या माणसांमुळे; प्रसिद्धी मिळाली ती त्यांनी आकाशाखाली अगदी उघड्यावर जांभ्या (लॅटराईट) दगडावर कोरलेल्या कातळशिल्पांमुळे.
अश्मयुगीन काळात येथे मानवी वावर होता हे दर्शवणाऱ्या या पाऊलखुणा. सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी या नदीच्या तीरावर माणसे राहिली असतील, त्यांची सर्जनशक्ती या जांभ्या दगडावर व्यक्त झाली असेल, असे पुरातत्त्व खात्यातील शास्त्रज्ञांना वाटते.
ही कातळशिल्पे, किंवा भूपृष्ठचित्रे (खोदचित्रे), मानवी संस्कृतीच्या उत्क्रांतीचा एक महत्त्वाचा टप्पा दर्शवतात. ‘होमो सेपियन’ हे नाव धारण केलेल्या आपल्या प्रजातीच्या सर्जनशक्तीचे प्रदर्शन करतात.
सुमारे पंचवीस लाख वर्षांपूर्वी ‘होमो’ (मानवप्रजात) पृथ्वीवर पूर्व आफ्रिकेत अवतरला असे मानले जाते. ऑस्ट्रेलोपिथेकसपासून (वानरप्रजात) विकसित झालेला हा आदिमानव, ‘होमो इरेक्टस’, दोन पायांवर उभा राहून आपली कामे करू लागला. आपल्या सोयींसाठी अश्मांचा (दगडांचा) उपयोग करू लागला.
हा आपला सर्वांत प्राचीन मानव पूर्वज. जवळजवळ वीस लाख वर्षांपूर्वी याचा संचार उत्तर आफ्रिका, युरोप, आणि आशियात होऊ लागला. यानंतर कितीतरी वर्षे, शतके, युगे याच्या (मानवाच्या) अनेक प्रजाती उत्पन्न झाल्या.
यापैकी दगडापासून हत्यारे आणि वेगवेगळी साधने बनवणारा हेबिलीस’ आणि आपल्या दैनंदिन जीवनात अग्नीचा वापर करणारा ‘निएंडरथल’ या दोन सर्वाधिक सक्षम प्रजाती मानल्या जातात!
सुमारे तीन ते दोन लाख वर्षांपूर्वी आधुनिक मानवाची (होमो सेपियन) उत्पत्ती पूर्व आफ्रिकेत झाली. जवळजवळ सत्तर हजार वर्षांपूर्वी हा मानव आफ्रिकेच्या बाहेर पडला आणि जगभर फिरू लागला. कालांतराने आदिमानवाच्या इतर प्रजाती नामशेष झाल्या. पृथ्वीवर आता फक्त आपली ‘होमो सेपियन’ ही प्रजात शेष आहे.
सुमारे एक ते दोन लाख वर्षांपासून भारतभर अनेक ठिकाणी या होमो सेपियन प्रजातीच्या आदिमानवाने आपल्या अस्तित्वाच्या खुणा ठेवल्या आहेत. कोकणात अनेक ठिकाणी, विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात, अशा खोदचित्रांचा आढळ आहे. पणसायमळ येथील भूपृष्ठचित्रांचा काळ सुमारे 10,000 वर्षांपूर्वीचा मानला जातो.
गेली कित्येक वर्षे ही खोदचित्रे बघायची इच्छा होती. पण या ना त्या कारणाने राहून जायचे. शेवटी गेल्या आठवड्यात अचानक योग आला.
उघड्या आकाशाखाली एवढ्या मोठ्या फळ्यावर काढलेली ती चित्रे बघून आम्ही सगळे आश्चर्यचकित झालो. अवाक होऊन बघत राहिलो. या कातळशिल्पांनी गोव्याच्या प्रागैतिहासिक काळातील एक दालन आपल्यासाठी उघडले आहे.
हा कातळ पुरातत्त्व काळातील अनेक रहस्ये घेऊन आपल्यासमोर आला आहे. या खोदचित्रांचे प्रयोजन काय? यातून त्या लोकांना काय अभिव्यक्त करायचे असेल? त्यातून काय प्रतीत होते? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. हे गूढ अजूनही अनाकलनीय आहे.
या खोदशिल्पांना स्थानिक लोक अनेक वर्षे ‘राखण्याची चितरां’ म्हणून ओळखायचे. पुरातत्त्वशास्त्रात या खोदचित्रांना ‘पेट्रोग्लिफ’ किंवा ‘जिओग्लिफ’ असे म्हणतात. ग्रीक भाषेत ‘पेट्रा’ म्हणजे खडक आणि ‘ग्लिफ’ म्हणजे कोरीव काम. खडकावर केलेले कोरीव काम म्हणजे पेट्रोग्लिफ.
जगभर अनेक ठिकाणी ही खोदचित्रे (पेट्रोग्लिफ्स) उभ्या दगडांवर अथवा भिंतींवर आढळतात. कोकणात मात्र ही शिल्पे कोकणाची ओळख सांगणाऱ्या जांभ्या दगडावर, मुक्त आकाशाखाली, अगदी उघड्यावर आडवी कोरलेली आहेत. आडव्या भूपृष्ठावर कोरलेल्या चित्रांना ‘जिओग्लिफ्स’ असे म्हटले गेले आहे.
अशी खुल्या जागेत, मोकळ्या हवेत आडव्या दगडाच्या पृष्ठभागावर कोरलेली शिल्पे सापडणे अत्यंत दुर्मीळ आहे आणि अजूनपर्यंत केवळ कोकणात जांभ्या दगडावर सापडलेली आहेत. म्हणूनच याचे महत्त्व जागतिक आहे. ही भूपृष्ठचित्रे पाषाणकलेत एक नवा अध्याय जोडतात.
कोकणातील भूपृष्ठचित्रे प्रामुख्याने प्राणीजीवनावर आहेत. गोव्यातील कातळशिल्पात बैल, हरणे, मोर, हत्ती असे प्राणी आणि मानवी आकृत्या आहेत. काही ठिकाणी ‘कप्युल्स’ (दगडात केलेले पेल्याच्या आकाराचे छोटे छोटे खळगे) दिसतात, ज्याचे अनेक उपयोग शास्त्रज्ञांनी सांगितले आहेत. येथील खासियत म्हणजे एक चक्रव्यूह आकृती आहे.
अशा चक्रव्यूह आकृत्या जगात अनेक ठिकाणी सापडलेल्या आहेत. गोव्यातील आकृतीत सात समकेंद्री वर्तुळे आहेत. एका बाजूने मध्यबिंदुपर्यंत उघडे आहे. येथे कदाचित शिडीसारखी आकृती असावी. दुसऱ्या बाजूला जवळच एक मानवी पावलांची जोडी कोरलेली आहे.
केरळचे अजितकुमार लिहितात की, अशी चक्रव्यूह चिन्हे दिवंगत आत्म्याला मोक्ष, मुक्ती, स्वर्गलाभ दर्शवतात. एक शिडी किंवा दोरखंड स्वर्गात प्रवेश करण्यासाठी हेतुपुरस्सर ठेवलेली (कोरलेली) असते. पावले म्हणजे दिवंगत आत्मा. जगातील अनेक ठिकाणी असलेल्या शैलचित्रांत चक्रव्यूहाशी संबंधित अशी संयुक्त शिडी आणि पावले असतात.
गेली काही वर्षे महाराष्ट्रातील सुधीर रिसबूड आणि धनंजय मराठे यांनी अथक प्रयत्नांनी कोकणातील अनेक कातळशिल्पे शोधून काढली आहेत. महाराष्ट्राच्या पुरातत्त्व खात्याचे निर्देशक डॉ. तेजस गर्गे आणि पुरातत्त्वशास्त्रज्ञ ऋत्विज आपटे यांनीही या कातळशिल्पांच्या शोधकामात आपले योगदान दिले आहे.
गोव्यातील कातळशिल्पांवर कै. श्री प्र. पां. शिरोडकर आणि डॉ नंदकुमार कामत यांनी शोधकाम केले आहे आणि माहिती लिहिली आहे. कोकणातील इतर कातळशिल्पांबरोबर गोव्यातील पणसायमळ येथील कातळशिल्पेही युनेस्कोच्या संभाव्य यादीत समाविष्ट आहेत.
1) मानवी सर्जनशील प्रतिभेच्या उत्कृष्ट नमुन्याचे प्रतिनिधित्व, 2) हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या एका सभ्यतेची आणि सांस्कृतिक परंपरेची अद्वितीय साक्ष, आणि ३) मानवी उत्क्रांतीच्या इतिहासातील एका महत्त्वपूर्ण टप्प्याचे वर्णन करणाऱ्या शिल्पांचे एक उत्कृष्ट उदाहरण अशा तीन निकषांखाली कोकणातील या भूपृष्ठचित्रांची नोंद युनेस्कोच्या संभाव्य यादीत केली गेली आहे.
हजारो वर्षांपासूनचे आपल्या पूर्वजांच्या जीवनशैलीचे दुर्मीळ दर्शन आपल्याला अशा भूपृष्ठचित्रांद्वारे घेता येते. आदिम संस्कृतीची एक छान झलक आपल्याला त्यांच्या या कलाकृतीतून दिसून येते.
गोव्यात पुराश्मयुगापासून आदिमानवाची वस्ती असावी, असे काही इतिहासकारांचे म्हणणे आहे. याचा सखोल अभ्यास झाला पाहिजे. गोव्यातील अमूल्य आदिम संस्कृतीचे आपण सर्वांनी जतन केले पाहिजे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.