Portuguese : भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी

कॅथरीनचे लग्न भारताच्या आणि ब्रिटिश साम्राज्याच्या नंतरच्या इतिहासावर महत्त्वपूर्ण परिणाम करणारे ठरले
Period of Portuguese power
Period of Portuguese powerDainik Gomantak
Published on
Updated on

सुशीला सावंत मेंडीस

Period of Portuguese power पोर्तुगीज राजकन्या व राजा असलेल्या चौथ्या जॉनची मुलगी कॅथरीन ऑफ ब्रागांझा यांनी ब्रिटिश राजा चार्ल्स द्वितीय (1660-85) यांच्याशी 21 मे 1662 रोजी विवाह केला. तिच्या विवाहासाठी दिलेल्या हुंड्याचा भाग बोम बहिया (गुड बे) किंवा आधुनिक मुंबईचा पोर्तुगीज प्रदेश होता. याशिवाय उत्तर आफ्रिकेतील टँगियर शहर, तसेच 5,00,000 पौंड रोख हुंडा देण्यात आला होता.

या विवाह संधी कराराने पोर्तुगीज ईस्ट इंडीज आणि ब्राझील यांच्याशी मुक्त व्यापाराचा अधिकारदेखील सुनिश्चित केला. वसाहतवादाच्या काळात लग्न करण्याचा हा एकमेव कायदेशीर मार्ग होता.

मारे आपल्याकडे हुंडा घेतला जातो व ही किती वाईट प्रथा आहे म्हणून छाती बडवणाऱ्या सुधारण्यावाद्यांनी हेही लक्षात घेतले पाहिजे की, ब्रिटिशांनी हुंडा घेण्याची प्रथा अनिवार्य केली होती. पोर्तुगीजांमध्ये लिस्बनमधील अनाथाश्रमातून मुलींना त्यांच्या वरसंशोधनात व नंतरच्या लग्नात हुंडा देऊन पाठवण्याची प्रथा होती. (त्यांना राजाचे अनाथ असे संबोधले जात असे).

अशीच एक मुलगी तिच्यासोबत क्रँगनोरच्या गव्हर्नरशिपसाठी ऑर्डर घेऊन आली होती. हा घोटाळा इतका वाढला की 1627 मध्ये अशा सर्व हुंडा नियुक्ती तीन वर्षांपर्यंत मर्यादित ठेवाव्यात, असा आदेश जारी करण्यात आला.

या शाही विवाहानंतर काही वर्षांनी २७ मार्च १६६८ च्या रॉयल चार्टरने इंग्लंडचे राज्य आणि इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात एक करार केला. यामुळे, इंग्लंडच्या चार्ल्स द्वितीय यांनी भाडे म्हणून वार्षिक १० पौंडांइतके सोने देण्याच्या बोलीवर ईस्ट इंडिया कंपनीला मुंबई भाडेतत्त्वावर दिली.

तेव्हा मुंबई सात बेटांचा (माहीम, माझगाव, लिटल कुलाबा, कुलाबा, बॉम्बे, वरळी आणि परळ) द्वीपसमूह होती. २३ डिसेंबर १५३४ रोजी गुजरात सल्तनतचा बहादूर शाह यांच्यात झालेल्या वसईच्या तहानंतर पोर्तुगीजांनी दमणसह मुंबईचा ताबा मिळवला होता.

पोर्तुगीजांनी या बेटांना विविध नावांनी संबोधले, ज्यांना एकत्रितपणे ‘बॉम्बे’ हे नाव देण्यात आले. त्यामुळे, ही सातही बेटे बॉम्बे बनली.

हा विवाह करार केव्हा झाला, हा मुद्दा समजून घेणे आवश्यक आहे. १५८० ते १६४० या कालावधीत पोर्तुगाल पारतंत्र्यात होते. कारण सिंहासनाला वारस हवा होता आणि ते स्पेनचा राजा फिलिप - द्हितीय याने ताब्यात घेतले होते.

जेव्हापासून स्पॅनिश राजाने पोर्तुगालला आपल्या ताब्यात आणले तेव्हापासून पोर्तुगीज राजांनी व्यापाराच्या विकासात घेतलेले व्यक्तिगत स्वारस्य नाहीसे झाले. या परिस्थितीत पोर्तुगीज परदेशातील प्रदेश डच आणि इंग्रजांनी अधिग्रहित केले.

यामुळे या ६० वर्षांच्या कालावधीत पोर्तुगालचे व्यापार आणि आर्थिक बाबतीत नुकसान होत राहिले. उरलेल्या वर्षांमध्ये व्यापारावरील पोर्तुगीज वर्चस्वाचा हळूहळू अस्त होऊ लागल्याने व्यापारावर नियंत्रण मिळवणाऱ्या ब्रिटिश व्यापाऱ्यांचा उदय होऊ लागला.

या परिस्थितीतच मुंबई ब्रिटिश राजाला हुंडा म्हणून दिले गेले. त्यावेळच्या परिस्थितीनुरूप घेतलेला तो एक व्यावहारिक निर्णय होता.

या काळात पोर्तुगीज सत्तेच्या क्षयाचे परिणाम शहरांमध्ये सर्वाधिक दिसून आले. तत्कालीन व्हाइसरॉय, कोंद द विगुएरा यांनी १६२२ मध्ये राजाला लिहिले की मसाल्यांच्या व्यापाराचे केंद्र असलेले कोचीन, कान्नोर व क्विलोन(थांगसेरी)ही बिनमहत्त्वाचे झाले आहे.

व्हाइसरॉयने राजाला सांगितलेले हे किल्ले बंदुका किंवा संरक्षणाच्या इतर प्रभावी साधनांशिवाय होते. यावेळेपर्यंतचा महसूल हा प्रामुख्याने कस्टम ड्युटी आणि कार्तेझच्या(पोर्तुगीजांनी हिंद महासागरात व्यापार करण्यासाठी पोर्तुगीजांव्यतिरिक्त इतर व्यापारिक जहाजांना परवानगी देण्यासाठी दिलेले परवाने) विक्रीवर आधारित होता.

व्यापार घटल्याने कस्टम ड्यूटी घटली आणि पोर्तुगीज सत्तेचा वचक न राहिल्याने कार्तेझमधून येणारा महसूल बंद झाला. या दरम्यान डचांची शक्ती मोठ्या प्रमाणात वाढत होती. कोचीन, कन्नूर आणि क्विलोन या पोर्तुगीजांच्या ताब्यात एक-एक करून पूर्वेकडील सिलोन (श्रीलंका) डच आणि क्रँगनोर स्थानिक झामोरिनच्या ताब्यात गेले.

या विवाहाची फलश्रुती खूप मनोरंजक आहे. असे म्हटले जाते की जेव्हा ब्रॅगांझा यांची कॅथरीन पोर्तुगालहून चार्ल्स द्वितीयशी लग्न करण्यासाठी आली तेव्हा तिने तिच्यासोबत चहाचा डबा आणला होता.

सतराव्या शतकाच्या सुरुवातीपासून पोर्तुगीज युरोपमध्ये चहाची आयात करत होते; राजकन्या रोजच्या पसंतीचे पेय म्हणून चहा पिऊन मोठी झाली होती. लग्नाची सुरुवात चांगली झाली परंतु लवकरच कॅथरीनच्या लक्षात आले की, ‘मेरा पती सिर्फ मेरा नही’.

लुसी वॉल्टर, बार्बरा विलियर्स, नेल ग्वेन आणि लुसी द केरोअल या चौघीजणी चार्ल्सची अंगवस्त्रे होत्या. लुसी वॉल्टरने मुलाला जन्म दिला, ज्याला चार्ल्सने कबूल केले आणि त्याला जेम्स स्कॉट, ड्यूक ऑफ मॉनमाउथ ही पदवी देण्यात आली.

या चार माहीत असलेल्या अंगवस्त्रांशिवाय चार्ल्सच्या अनेक ठेवलेल्या बायाही होत्या. सर्वमान्य चार अंगवस्त्रे, काही ठेवलेल्या बाया, सोळा सोळा अवैध मुले, चार्ल्स आणि कॅथरीन असा मिळून अत्यंत ‘सुखाचा संसार’ होता.

Period of Portuguese power
History of Goa: पश्चिमचक्रवर्ती कदंब

१६६५/६ मध्ये लंडनला लागलेल्या बुबोनिक प्लेगसारख्या साथमारीच्या कठीण आव्हानांना या कुटुंबाने एकत्रितपणे तोंड दिले. त्यानंतर लगेचच, आगीने लंडनचा बराचसा भाग जाळून खाक केला. या वेळीही या कुटुंबाने एकत्रितपणे लाकडापासून दगडापर्यंत नष्ट झालेल्या लंडनच्या ८०% इमारतींच्या पुनर्बांधणीचे काम केले.

ती रोमन कॅथलिक होती आणि तो एक प्रोटेस्टंट असल्याने, कॅथरीनवर देशद्रोहाचा आरोप लावण्यात आला. तिच्याविरुद्ध अनेक साक्षी नोंदवल्या गेल्या, परंतु तिच्या पतीच्या हस्तक्षेपामुळे तिच्यावर खटला घातला गेला नाही.

कॅथरीनला मूल नव्हते, पण तिचा चारवेळा गर्भपात झाला होता. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत, चार्ल्सने कॅथरीनला घटस्फोट देण्याची कल्पना नाकारली आणि म्हणूनच तिचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. राजा आणि त्याच्या देशाला सर्वांत मोठा राजकीय आणि आर्थिक फायदा होण्यासाठी आयोजित केलेला विवाह नेहमीच तसाच राहिला.

Period of Portuguese power
धर्माची लक्षणे

हे लग्न १६८५मध्ये राजा चार्ल्सच्या मृत्यूपर्यंत टिकले. कॅथरीन १६९२मध्ये विधवा म्हणून लिस्बनला परत आली आणि तिने दुसऱ्या प्रोटेस्टंट लुईस दे डुरासशी पुनर्विवाह केला.

१७०५ मध्ये तिचे निधन होण्यापूर्वी पोर्तुगालमध्ये तिने १७०१ आणि १७०४-५ या कालावधीत तिचा भाऊ पीटर द्वितीयसाठी रीजेंट (राजा लहान असल्यास राज्याचे पालकत्व किंवा राजा नसताना कारभार सांभाळणारी व्यक्ती) म्हणून काम केले.

हा विवाह ही एक राजकीय तडजोड होती. यात दोघा पतीपत्नीच्या सांसारिक हिताऐवजी राज्याचे हित पाहणे महत्त्वाचे होते. प्राप्त कर्तव्य म्हणून ते एकनिष्ठतेने स्वीकारावे तरी लागते किंवा मुळातूनच झिडकारावे तरी लागते;

दोन्ही बाबतीत फरफट ठरलेली! ही घटना तीन शतकांपूर्वी घडली होती, परंतु मोठा हुंडा, संपत्तीची देवाणघेवाण विवाह सुखाचा किंवा यशस्वी करतेच असे नाही, ही गोष्ट अधोरेखित करते.

Period of Portuguese power
इथल्या पिंपळ पानावरती...

कॅथरीनचे लग्न तिच्या आयुष्यावर अनेक अर्थांनी परिणाम करून गेले तसेच ते भारताच्या आणि ब्रिटिश साम्राज्याच्या नंतरच्या इतिहासावर महत्त्वपूर्ण परिणाम करणारे ठरले. ब्रिटिशांच्या काळात हे शहर बॉम्बे प्रेसिडेन्सीची राजधानी म्हणून काम करत होते (प्रशासकीय एकक म्हणून).

दुसऱ्या महायुद्धातही या शहराला महत्त्व प्राप्त झाले, हजारो लष्करी तुकड्या, औद्योगिक उत्पादने आणि रॉयल भारतीय नौदलाच्या ताफ्याने मुंबईला एक महत्त्वाचे स्थान बनवले. पश्चिम आशिया आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये लढल्या जाणाऱ्या लढायांसाठी लष्करी आणि नौदल तळ म्हणून नावारूपास आले.

कालांतराने मुंबई हे भारतातील प्रमुख शहरांपैकी एक बनले. जर हुंडा म्हणून दिले गेले नसते आणि ब्रिटिशांनी किंवा डचांनी ताब्यात घेतले नसते व ते गोव्याप्रमाणे पोर्तुगीजांकडे राहिले असते, तर आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना आणखी एक पोर्तुगीज प्रदेश मुक्त करण्यासाठी गोव्याप्रमाणेच चाळीस वर्षे संघर्ष करावा लागला असता!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com