Gomantak Editorial सामाजिक, आर्थिक अस्थैर्याचा सामना करणाऱ्या पाकिस्तानात राजकीय स्थैर्यदेखील धोक्यात आले आहे. लष्कराला जेव्हा एखादी व्यक्ती अनुकूल वाटते, तेव्हा तिला एका चौकटीत वाव दिला जातो; पण ती आपल्या हितसंबंधांशी विसंवादी सूर लावते आहे, असे जाणवताच तिला राजकीयदृष्ट्या नामशेष करण्याचा प्रयत्न होतो, हा पाकिस्तानचा आजवरचा इतिहास आहे.
यावेळचे वेगळेपण असे की, इम्रान खान उघडपणे लष्कराच्या विरोधात भूमिका घेत आहेत. देशातील असंतोषातून पुन्हा आपल्याकडे सत्ता यावी, असा त्यांचा प्रयत्न आहे. पण इतक्या उघड भूमिकेची परिणती काय होते, हे जगाला मंगळवारी पाहायला मिळाले.
इम्रान यांचे अक्षरशः बखोट धरून सैनिकांनी त्यांना अटक केली. इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांच्या पक्षाचे समर्थक थेट लष्करी मुख्यालयावर धावून गेले. या संघर्षात लष्कर विरोध चिरडून टाकेलही; पण वेगवेगळ्या कारणांनी पाकिस्तानात आधीच धुमसत असलेला असंतोष आणि त्यात या अटकेची भर यामुळे देश ज्वालामुखीच्या तोंडावर उभा आहे.
पंतप्रधानपदावरून इम्रान खान यांची हकालपट्टी झाल्यानंतर शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आलेले विरोधकांचे कडबोळ्यांचे सरकार समस्यांनी घेरलेले आहे. इम्रानच्या अटकेनंतर निदर्शने, आंदोलने आणि हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. त्यांच्या समर्थकांनी लष्कराला लक्ष्य करत रावळपिंडी, क्वेट्टा, इस्लामाबादमधील त्याच्या कार्यालयांची तोडफोड केली.
तोशाखाना प्रकरणात इम्रान खान यांना दोषी ठरविण्यात आल्याने त्यांची अवस्था बुडत्याचा पाय आणखी खोलात अशी झाली आहे. त्याचवेळी ‘एनएबी’ने पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि त्यांचे पुत्र हमजा यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी क्लिनचीट दिल्याने त्यांच्या राजकीय वाटचालीतील अडथळे दूर झाले आहेत.
पाकिस्तानी पंतप्रधानांना मिळणाऱ्या भेटवस्तू तोशाखानामध्ये जमा होतात. त्यातून हव्या त्या वस्तू विशिष्ट किंमत देऊन ते विकत घेऊ शकतात. या खरेदी व्यवहारात खान दोषी ठरले आहेत. क्रिकेटचे मैदान गाजवलेल्या इम्रान यांच्या पाकिस्तान ‘तेहरीके इन्साफ’ला स्थापनेनंतर सुमारे दोन दशकांनी राजकीय सूर गवसला.
२०१८मध्ये त्यांचे सरकार सत्तेवर आले, तेही युवकांना काम, भ्रष्टाचाराला तिलांजली आणि ‘नया पाकिस्तान’चे स्वप्न दाखवत. लष्कराच्या कुबड्यांवरचे हे सरकार त्याच्या मर्जीवरच तरले आणि त्याच्या वक्रदृष्टीने बरखास्तही झाले. अर्थात, पाकिस्तानात लोकशाही रुजली नाहीच, जी सरकारे चालली ती लष्कराच्या मर्जीवरच.
इम्रान यांनी लष्कराशी आणि त्याचे तत्कालीन प्रमुख कमर जावेद बाजवा यांच्याशी पंगा घेतला. एवढेच नव्हे तर आपले सरकार अस्थिर करण्यामागे अमेरिका आहे, असे बोल लावण्यापर्यंत त्यांची मजल गेली. राजकारणात काही पथ्ये, संकेत पाळायचे असतात. बेछूट, बेताल वक्तव्याने खुर्ची टिकते; पण राजकीय कारकिर्दीला सुरुंग लागतो, हेच त्यांना उमगले नाही.
त्याची किंमत आता ते मोजत आहेत. याच इम्रान यांच्यावर पाकिस्तानभर सव्वाशेवर खटले आहेत. भ्रष्टाचार, पदाच्या गैरवापराद्वारे संपत्ती जमवणे, फसवणूक अशा कितीतरी स्वरूपाचे बालंट त्यांच्यावर आहे. त्यांनी धार्मिक प्रशिक्षण देणारी ‘अल कादिर’ नावाची संस्था स्थापली, त्यासाठी शंभरवर एकर जमीन, शेकडो कोटी रुपयांचा निधी जमवला.
तेही बडा बांधकाम व्यावसायिक मलिक रियाज हुसेन याच्या बारीया टाउनच्या आर्थिक व्यवहाराच्या दडपादडपीच्या प्रकरणातून. आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या पाकिस्तानच्या तिजोरीला त्यामुळे काहीशे कोटींचा फटका बसल्याने ‘एनएबी’ने ही कारवाई केली आहे.
इम्रान यांच्या सगळ्या प्रकारच्या गुगली, बाउन्सरला न जुमानता ‘पाकिस्तान मुस्लिम लीग’चे शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे बिलावल भुट्टो यांच्याशी आघाडीची मोट बांधत सरकार स्थापले. तेव्हापासून त्याला सुरुंग लावण्याचे प्रयत्न खान यांनी चालवले आहेत. गेल्या नोव्हेंबरात त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, त्यातून बचावले.
त्यामागे आपल्याला संपवण्याचे लष्करी अधिकाऱ्यांचे षड्यंत्र होते, असा त्यांनी घोशाच लावला होता. महापुराने उडवलेली दाणादाण, महागाईने गाठलेला कळस, घटलेला परकी चलनाचा साठा यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मदतीचे दान कधी कटोऱ्यात टाकेल, याची प्रतीक्षा आहे.
अशा संकटात पाकिस्तानात सत्ताच्युत झालेले इम्रान पुन्हा सत्तेला गवसणी घालण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करत आहेत. तथापि, राजकारण करताना परिपक्वता दाखवायची असते. करिष्म्याने सत्ता मिळवून दिली तरी भ्रष्टाचारविरहित, पारदर्शी, जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करणारा कारभार करायचा असतो, याचे भान त्यांना नव्हते.
पक्षांतर्गत सक्षम दुसरी फळी निर्माण करायची असते, याचाही त्यांना पत्ता नव्हता. लोकप्रियता मिळाली तरी तिचा सकारात्मक उपयोग त्यांना करता आला नाही. आगामी सहा-आठ महिन्यांत पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका होतील.
त्यासाठी मोर्चेबांधणी करणे, पक्षाचे नेतृत्व उभे करणे यांच्याइतकेच निवडणूक लढण्यासाठीची पात्रता कायम राखणे अशी कितीतरी आव्हाने इम्रान यांच्यासमोर आहेत. कार्यकर्ते रस्त्यावरील लढाई लढवत असले, तरी न्यायालयीन लढाईत ते कितपत यशस्वी होतात हे पाहायचे. पण प्रश्न त्यांच्या राजकीय स्थानापेक्षा देशाच्या भवितव्याचा आहे, तेच सध्या झाकोळलेले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.