
Land Scam Case: दवर्ली येथील जमीन हडप प्रकरणातील मास्टर मार्ईंड सलीम दोड्डामणी याच्या विरोधात या प्रकरणात अफरातफरीचा गुन्हा नोंद झालेला असतानाच मडगाव पोलिस स्थानकात त्याच्या विरोधात अशाचप्रकारे कागदपत्रांचा फेरफार करून नावेली येथील एका व्यावसायिकाची गाडी बनावटगिरी करून आपल्या नावावर हस्तांतरीत केल्याची तक्रार देण्यात आली आहे.
सध्या मडगाव पोलिस त्याला दवर्ली जमीन हडप प्रकरणात शोधत असून तो गोव्याबाहेर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
यापूर्वी अशाचप्रकारे एक गाडी बनावटरीतीने आपल्या नावावर केल्याच्या आरोपाखाली मायणा-कुडतरी पोलिसांनी या दोड्डामणीला अटक केली होती. ज्या मुसा सालेह महम्मद याने आपली जमीन हडप केल्याची तक्रार नोंदविली आहे.
त्याच्याच मालकीची एक कारगाडी संशयिताने कागदपत्रात फेरफार करून आपल्या नावे केल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी मायणा-कुडतरी पोलिस स्थानकाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक मोहन गावडे यांनी त्याला अटक केली होती.
आता याच सलीम दोड्डामणीच्या विरोधात नावेली येथील व्यावसायिक फ्लाॅईड कुतिन्हो यांनी काल मडगाव पोलिस स्थानकात नवीन तक्रार दिली आहे.
आपल्या मालकीची कारगाडी संशयिताने बनावट कागदपत्रांच्या आधारे आपल्या नावे करून ती गोकुळ अर्बन सहकारी पतसंस्थेकडे तारण म्हणून ठेवल्याचे कुतिन्हो यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
कार पतसंस्थेत ठेवली गहाण
कुतिन्हो हे सध्या युकेमध्ये असून युकेत जाण्यापूर्वी ही गाडी सलीमला चार लाखात विकण्याचे तोंडी ठरले होते. दोड्डामणी याने आपल्याला त्यातील फक्त एक लाख रुपये दिले. सहा महिन्यांत बाकीचे तीन लाख देण्याचा वायदा झाला होता. आपण युकेत जात असल्यामुळे गाडीची कागदपत्रे त्याच्याकडे दिली होती .
पण नंतर सलीमने राहिलेले पैसे दिलेच नाहीत आणि आपली परवानगी न घेता ही गाडी आपल्या नावे करून नंतर ती परस्पर पतसंस्थेकडे गहाणही ठेवली, असे कुतिन्हो यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मडगाव पोलिसांनी या प्रकरणी अजून गुन्हा नोंद केलेला नाही.
जमीन हडप प्रकरणातील संशयित भूमिगत
दवर्ली जमीन हडप प्रकरणातील संशयित भूमिगत झाले आहेत, अशी माहिती मडगाव पोलिसांनी दिली. सलीम दोड्डामणी हा सध्या उत्तर भारतात असून त्याचे शेवटचे ठिकाण अजमेर येथे आढळून आले हाेते.
दुसरा संशयित राजदीप कुंडईकर याचा फोन पोलिसांना बंद अवस्थेत सापडत होता. ही बनावटगिरी करताना कुंडईकर यांनी कागदपत्रांवर आपला पत्ता नावेली येथील नमूद केला होता. मात्र, प्रत्यक्षात तो पुलवाडा-बाणावली येथे रहात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.