तो अवघ्या पाच मिनीटात तुमचे प्रत्यक्ष चित्र (Art), म्हणजेच लायव्ह स्केच काढून तुमच्या हातात देऊ शकतो. तो कॅन्व्हसचा (Canvas) दिवाना आहे आणि कॅन्व्हस त्याचा. तो चित्र काढायला जेव्हा सुरू करतो, तेव्हा त्याच्या हातचा ब्रश जणू काही जादूची कांडी असल्यासारखा भासत होता. भरगच्च माणसाच्या गर्दीत, आपल्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य कायम ठेवुनही, पुढ्यात साकारणाऱ्या चित्रात तो एकाग्र असतो. बरोबरीने वाजत असलेल्या बॅकग्राऊंड म्युझिकसह, त्याच्या ब्रशची गती वाढत जाते..आणि काही क्षणातच चित्र तयार होते. कलाकाराला आपल्या कलेची नशा कशी असते याचे तो प्रत्यक्ष उदाहरण आहे.....गुरुदत्त!
गुरूदत्त 3 ते 5 मिनिटात समोर असलेल्या माणसाचे हुबेहुब स्केच काढतो. ब्रश झटकण्यापासून ते कॅन्व्हसवर तो फिरविण्याची त्याची कला निराळीच आहे. रणधीर कपूर यांच्या मास्टरक्लास दरम्यान त्यांनी त्यांच्या समोरच अभिनेता राज कपूर यांचे चित्र काढले. यावेळी सभागृहात असलेल्या प्रेक्षकांनी त्याचे भरभरून कौतुक केले. राज कपूर यांचें चित्र काढण्यापुर्वी त्याने अभिनेता संजीव कपूर यांचेही येथे चित्र काढून दाखवले.
गुरूदत्त वांतेकर केरी-सत्तरी येथील हरहुन्नरी चित्रकार. मामाच्या घरी गणेश चतूर्थीनामित्त गणपतीच्या मुर्ती करता करता त्याला रंग व चित्रकलेची आवड तयार झाली. 2007 साली त्याने फाईन आर्टसचा अभ्यासक्रम गोवा कला महाविद्यालयातून पूर्ण केला. त्यानंतर आंतरराष्र्टीय ख्यातीचे डेव्हीड गेरीबेल्डी यांचे ‘स्पिड पेन्टींग’ त्याने एकदा पाहीले आणि चित्रकारीतेतली ही कला आपण शिकलीच पाहीजे असे त्याने ठरवले. गोव्यात अशाप्रकारची कला शिकवणारे तेव्हा कोणीच नव्हते. त्यामुळे तो स्वतःच ही कला शिकला. ती शिकण्यासीठी त्याला सात वर्षाचा अवधी लागला. आपण जे काही करू ते परफेक्ट असायला पाहीजे या हेतूने, आपल्या चुकींचे बारकाईने निरीक्षण करून त्यात कालांतराने त्याने सुधारणाही केल्या. आवड होतीच...मार्गदर्शन करणारे मात्र कोणीही नव्हते. त्याने मनाशी म्हटले, ‘लेटस बी सेल्फ मोटिव्हेटेड’ आणि वाटचालीला सुरुवात केली.
यंदा इफ्फीच्या माध्यमातून त्याने पहिल्याचवेळी सरकारी मंचावर आपली ही कला सादर केली आहे. केरी सत्तरी येथील स्वामी विवेकानंद ज्ञान मंदीरमध्ये तो चित्रकलेचा शिक्षक आहे. गोव्याशिवाय मुंबई, पुणे, बंगळूर येथेही त्याने आपली कला सादर केली आहे. ‘स्पिड पेंन्टींग’शिवाय तो हायपर रिएलिस्टीक रांगोळी, अॅक्रेलीक पेंन्टींग, ओईल पेंन्टींग व अन्य शैलीतली चित्रकला करतो.
‘स्पिड पेन्टींग’सारख्या कलेला अजून बहरण्यासाठी सरकारने काय करायला पाहीजे असे गुरुदत्तला विचारले असता तो मिश्कीलपणे हसला. दोन क्षण स्तब्ध राहीला अन त्यानंतर म्हणाला..."गोंयच्या गावगिऱ्या कलाकाराक सरकारान समजोन घेवपाक जाय. खरे सांगु तुका? ..म्हजी कला पळोवपाक खास दुसऱ्या राज्यातले लोक येतात. ते म्हजी तोखणाय करतात. हे सगळे खुप बरे दिस्ता. मात घरच्याच मनशांकल्यानच जेन्ना शाबासकेची थाप फाटीर मेळना, तांचे खुप वायट दिसता."
- रश्मी नर्से जोसलकर
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.