Saptakoteshwar Temple: गोव्याचे राज्य-दैवत सप्तकोटेश्वर

महाशिवरात्रीचे पर्व आणि शिवजंयतीच्या सोहळ्यापूर्वी श्रीसप्तकोटेश्वर मंदिराचा आगळावेगळा लोकार्पण सोहळा यशस्वी होण्यातच गतकाळातल्या इतिहासाला नव्याने उजाळा लाभणार आहे.
Saptakoteshwar Temple |
Saptakoteshwar Temple |Dainik Gomantak

राजेंद्र केरकर

दीपवती बेटावरच्या नार्वे गावातला शिवशंभो हा केवळ धार्मिक श्रद्धेचा संकेत नसून तो इथल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संचिताचा अविभाज्य घटक आहे. ऐतिहासिक किल्ल्यांवरच्या जलकुंभांनी अन् राजे सरदारांच्या वंशजांच्या उपस्थितीने मंगलमय सोहळ्याला गत इतिहासाची पार्श्वभूमी लाभणार आहे!

सुमारे आठशे वर्षांपूर्वी गोवा - कोकणातल्या बऱ्याच मोठ्या प्रांतांचे सत्ताधीश असलेल्या कदंबांचे राजदैवत म्हणून सन्मान लाभलेला सप्तकोटेश्वर खरे तर राज्यदैवताच्या स्थानावरती विराजमान आहे.

प्राचीन काळापासून पंचगंगांच्या संगमाद्वारे निसर्गदत्त निर्माण झालेल्या दीपवती बेटावर स्वामी ठरलेल्या सप्तकोटेश्वरावरती यावनी आणि युरोपियनांचे वारंवार विध्वंसक हल्ले झालेले असताना या दैवताचे अस्तित्व आणि महत्त्व यांचे समूळ उच्चाटन करणे शक्य झाले नाही.

सह्याद्रीतल्या दऱ्याखोऱ्यात वावरणाऱ्या निर्भयी आणि दख्खनच्या पठारावरती राहणाऱ्या कष्टकरी माणसांच्या पाठबळावरती जेव्हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी अद्वितीय संघर्ष करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची यशस्वी स्थापना करून, गोवा - कोकणातल्या प्रांताला आपल्या छत्रसावलीखाली आणले,

Saptakoteshwar Temple |
Nagesh Karmali: नागेश करमली : एक सच्चा ‘गोंयकार’

तेव्हा त्यांनी मांडवी नदीपल्याड धर्मांध पोर्तुगिजांची झोपमोड करण्यासाठी डोंगर टेकडीच्या पायथ्याशी जांभ्या दगडाच्या गुंफासदृश ठिकाणी विकल स्थितीत असलेल्या सप्तकोटेश्वर मंदिराचा 1668 साली जीर्णोद्धार केला.

मरगळलेल्या तनामनांत शिवप्रभूंच्या आगमनाने जणू वीर अक्षौहिणीचे सामर्थ्य निर्माण केले आणि त्यामुळेच भतग्राम, सत्तरी, अंत्रुज आणि परिसरातल्या प्रांतांवरती पोर्तुगिजांना आपली सत्ता सहजासहजी स्थापन करणे जमले नाही. यात खरी प्रेरणाशक्ती श्रीसप्तकोटेश्वराची ठरली होती.

कोणाचा शिरच्छेद, कोणाचे हातपाय तोड अशाप्रकारे क्रौर्याचे अपरिमित सीमोल्लंघन करणाऱ्या पोर्तुगिजांच्या जुलमी पंथसमीक्षण संस्थेवरती शिवाजी - संभाजीबरोबर मराठा साम्राज्याने अंकुश लावला आणि त्यामुळेच श्रीसप्तकोटेश्वर दैवताच्या मंदिराच्या जीर्णोद्धारामुळे गोव्याच्या भूमीचे एकंदर भारतीय संस्कृतीशी असलेले नाते अक्षय राहिले आणि त्यामुळे ख्रिस्तीकरणाचा वरवंटा निर्दयपणे फिरवला जात असतानादेखील गोमंतभूमीला भारतापासून तोडण्यात पूर्णपणे यश लाभले नाही.

मांडवी जुवारीच्या पाण्याने चोहीबाजूने वेढलेल्या ‘सुजलाम्, सुफलाम्’ बेटावरती गास्पार कुरैया या पोर्तुगीज ग्रंथकारांच्या मते श्रीसप्तकोटेश्वराच्या मंदिराप्रमाणे अन्य वैभवसंपन्न अशी मंदिरे पोर्तुगिजांची इथे सत्ता स्थापन होण्यापूर्वी अस्तित्वात होती.

इटालियन प्रवासी आंद्रे कोर्साली यांनी दीपवती बेटावरती भव्यदिव्य अशा ऐतिहासिक वास्तूचा जो विध्वंस पोर्तुगिजांनी केला असल्याचे नमूद केले त्याचे साधर्म्य सप्तकोटेश्वराच्या कदंबकालीन मंदिराशी आढळते. गोव्या संदर्भातल्या ऐतिहासिक दप्तरात श्रीसप्तकोटेश्वराच्या मंदिरासमोरच्या तळीस ‘कोटी तीर्थ’ ही संज्ञा असल्याचे कळते.

Saptakoteshwar Temple |
Nagesh Karmali: गोव्याला राष्ट्रवादाचं मुल्य देणारे महान राष्ट्रप्रेमी नागेश करमली...

छत्रपती शिवाजी महाराजांनी पंचगंगेच्या पावन पवित्र स्थळी श्रीसप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख ‘श्री शिवराज्याभिषेक -कल्पतरू’ या शिवकालीन संस्कृत ग्रंथात आढळतो.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांत उगम पावणाऱ्या नद्यांच्या पंचगंगा संगमस्थळी वसिष्ठ ऋषीसारख्या प्रभृतींनी सात कोटी वर्षे उग्र तपोसाधना केल्यावर प्रसन्न झालेला शिवशंभो, ‘सप्तकोटेश्वर’ म्हणून नावारूपास आला.

प्राचीन काळापासून प्रसिद्धीस पावलेल्या शिवस्थानात दीपवतीवरच्या नार्वेच्या सप्तकोटेश्वर मंदिराचा समावेश व्हायचा. गोवा कदंब राज्यकर्त्यांच्या बाराव्या आणि त्यानंतरच्या लेखांत श्रीसप्तकोटेश्वर लब्ध वरप्रसाद यांच्याप्रमाणे निजाराध्य श्रीसप्तकोटेश्वर देव, असे उल्लेख आढळतात.

शिवचित्त पेरमाडीदेवीची पट्टराणी कमलादेवीने हळशी राजधानीच्या अखत्यारीत येणाऱ्या देगावे ब्राह्मणास अग्रहार करून देताना या दानाबाबत श्रीसप्तकोटेश्वर देवाच्या पायाजवळ दीपवती बेटावर उदक सोडल्याचे शिलालेखात म्हटलेले आहे. 1187च्या किरिहळसिंगेच्या शिलालेखात जयकेशी तृतीय नित्य श्रीसप्तकोटेश्वराच्या पूजनात रममाण असल्याचे म्हटलेले आहे.

गोव्यात कदंबांच्या सत्तेचा अस्त झाल्यानंतर दिल्लीच्या खिलजी सुलतानाच्या सरदारांनी आणि दक्षिणेतल्या बहामनी सुलतानाच्या अधिकाऱ्यांनी धनदौलतीच्या लालसेपायी दीपवती बेटावरच्या श्रीसप्तकोटेश्वर मंदिरावर घाला घातला. परंतु त्यानंतर विजयनगरच्या माधवमंत्र्याने मंदिराची पुन्हा निर्मिती केली.

Saptakoteshwar Temple |
Nagesh Karmali: एक न विझणारे यज्ञकुंड

सोळाव्या शतकात जेव्हा पोर्तुगीज सत्ता तिसवाडी महालावरती प्रस्थापित झाली तेव्हा त्यांनी सप्तकोटेश्वराचे शिवलिंग विहिरीच्या काठावर ठेवून नवख्रिस्ती समाजाला त्याची विटंबना करण्यास भाग पाडले. परंतु असे असतानादेखील एक दिवस आकस्मिकरीत्या भाविकांनी हे शिवलिंग मांडवी नदीपल्याड आणून लाटंबार्सेत स्थानापन्न केले.

तेथून कालांतराने त्याची विधियुक्त स्थापना हिरवळ आणि बारमाही खळाळते पाणी वाहणाऱ्या निसर्गसंपन्न अशा हिंदळे गावात केली. श्री सप्तकोटेश्वराच्या आगमनाने भतग्रामातला हिंदळे गाव ‘नार्वे’ नावाने प्रसिद्धीस पावला.

छत्रपती शिवाजी महाराजानी डिचोलीतल्या नार्वेत छोटेखानी असलेल्या जांभ्या दगडातल्या श्रीसप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून भारतीय धर्म- संस्कृतीच्या आत्मसन्मानाच्या प्रक्रियेलाच नवा उजाळा देण्याची महत्त्वपूर्ण अशी कामगिरी केली.

2018 साली या मंदिराचा जीर्णोद्धार केल्यास साडेतीनशे वर्षे पूर्ण झाल्याने गोवा सरकारच्या पुरातत्त्व खात्याने या संरक्षित ऐतिहासिक वास्तूच्या गतवैभवाचे संवर्धन करण्याच्या कार्याचा आरंभ केला. कोविड -19 महामारीच्या संकटाला सामोरे जाताना अत्यंत नियोजनबद्धरीत्या मंदिराच्या स्थापत्यकलेच्या विविधांगी पैलूंचे जतन करताना घुमटाशी ताळमेळ साधत जाणारा भुयारी मार्ग दृष्टीस पडल्याकारणाने शिवकालीन वारशाचे दर्शन घडले.

पूर्वाश्रमीच्या जांभ्या दगडांनीयुक्त परिसराचा कल्पकतेने उपयोग करून एकंदर मंदिराचे बांधकाम करताना नियोजित कौशल्याचा साक्षात्कार दृष्टीस पडलेला आहे.

मंदिराचे मूळ गर्भगृह, सभामंडप, प्रवेशद्वार आणि आता पाऊल ठेवताच दृष्टीस पडणारा मंदिराचा जीर्णोद्धाराच्या शिवाज्ञेचा शिलालेख यांचे संवर्धन करताना, तिथल्या भिंतीची शान असणाऱ्या कविकलेचा वारसा जतन करण्याचे आव्हान पेलणे सोपे नव्हते.

Saptakoteshwar Temple |
Mahadayi River: म्हादईबाबत न्यायालयीन नव्हे, राजकीय तोडगा हाच उपाय

पाने, फुले, दगडगोटे यांच्यातल्या नैसर्गिक रंगरंगोटीद्वारे कविकलेतल्या कमल पुष्प, वृक्षवेली यांच्या शैलीचा अभ्यास करून समूर्त करण्याची कामगिरी कारागिरांनी यशस्वी केलेली आहे. महाशिवरात्रीचे पर्व आणि शिवजंयतीच्या सोहळ्यापूर्वी श्रीसप्तकोटेश्वर मंदिराचा आगळावेगळा लोकार्पण सोहळा यशस्वी होण्यातच गतकाळातल्या इतिहासाला नव्याने उजाळा लाभणार आहे.

दीपवती बेटावरच्या नार्वे गावातला शिवशंभो हा केवळ धार्मिक श्रद्धेचा संकेत नसून तो इथल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संचिताचा अविभाज्य घटक आहे. ऐतिहासिक किल्ल्यांवरच्या जलकुंभांनी अन् राजे सरदारांच्या वंशजांच्या उपस्थितीने मंगलमय सोहळ्याला गत इतिहासाची पार्श्वभूमी लाभणार आहे!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com