Nagesh Karmali: नागेश करमली : एक सच्चा ‘गोंयकार’

एक प्रखर राष्ट्राभिमानी, देशी भाषांचे पुरस्कर्ते, कोकणीचे जाज्वल्य पुरस्कर्ते आणि एक सच्चा ‘गोंयकार’ आपल्यातून निघून गेला आहे. नागेशबाबांना कोटी कोटी नमन!
Nagesh Karmali
Nagesh KarmaliDainik Gomantak

सखाराम बोरकर

नागेश करमली काल दुपारी गेले. वयाची नव्वदी त्यांनी हल्लीच पार केली होती. स्वातंत्र्यसैनिक, लोहियावादी, चळवळी, लेखक ते आकाशवाणी पणजीचे ज्येष्ठ निवेदक अशी विविधांगी बिरुदे, उपाधी असलेले भारदस्त व्यक्तिमत्त्व आमच्यातून निघून गेले, हे कोकणी चळवळीचे अतोनात नुकसान आहे. ही एक पोकळी आहे, भरून न येण्याजोगी.

नागेश करमलींना सर्व गोमंतकीय आदराने पाहत होते. गोमंतकातील सर्व स्थित्यंतरांचे साक्षीदार, इतकेच नव्हे तर गोवा मुक्ती लढा, जनमत कौल, राजभाषा आंदोलन, घटकराज्य, भाषा चळवळ यात हिरिरीने भाग घेतलेले नागेशबाब ही गोमंतकातील शेवटची व्यक्ती होती. गोव्याचा सर्व इतिहास, उत्क्रांत झालेला भूगोल त्यांना मुखोद्गत होता.

नागेशबाब म्हणजे एक ऊर्जा, तरुणाईला लाजवणारी. सत्यावर आधारलेली सडेतोड मते आणि ती मते प्रत्यक्षात उतरविण्यास केलेले तितकेच प्रामाणिक प्रयत्न.

सामाजिक क्षेत्रांत कार्यरत राहूनसुद्धा आपल्यातील सृजनशक्ती जिवंत ठेवण्यास यशस्वी ठरलेला रसिक कवी, उत्कृष्ट वाचक, लेखक आणि गोव्याच्या मुक्तीसंग्रामातल्या शौर्यगाथा आपल्या आठवणीच्या कुपीत साठवून हसतमुख जगणारा नागेशबाब!

Nagesh Karmali
Nagesh Karmali: गोव्याला राष्ट्रवादाचं मुल्य देणारे महान राष्ट्रप्रेमी नागेश करमली...

नागेशबाबांचा जन्म 1933 साली काकोडा येथे झाला. शिकताना त्यांचा संपर्क बाकीबाब बोरकरांकडे आला, जे त्यांचे शिक्षक होते. एका खाण कंपनीत सुपरवायजर म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. पण त्यांना गोवा मुक्तीचा ध्यास लागला होता. त्याचे कारण बाकीबाब होते. 1952साली त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली.

त्यांना 15 फेब्रुवारी 1954 रोजी अटक झाली आणी आणि रेइश मागूश इथल्या कैदेत ठेवण्यास आले. तिथे त्यांना आपल्या मातृभाषेचा साक्षात्कार झाला आणि ते ’जोत’ नावाचे हस्तलिखित प्रसिद्ध करू लागले. गोवा स्वातंत्र्यानंतर 1966 साली ते आकाशवाणी पणजी केंद्रात ‘स्टाफ आर्टिस्ट’ म्हणून रुजू झाले. तेथेच बाकीबाबसुद्धा सेवेत होते.

1972साली त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते ताम्रपट देण्यात आला. आकाशवाणीत असताना नेहमीच त्यांनी कोकणीचा पुरस्कार केला. सरकारी अधिकारी असल्यामुळे जरी प्रत्यक्ष त्यांना कुठल्याही चळवळीत भाग घेता येत नसले तरी मागे पडद्याआड राहून त्यांनी कोकणी चळवळीला चोख मार्गदर्शन केले.

कोकणीचा गावोगावी प्रसार व्हावा या उद्देशाने सुरू केलेल्या ’लळितकाचे’ ते मुख्य आधारस्तंभ होते. हीच भूमिका त्यांनी ’उगतें मळब’ या मासिक काव्यसंध्येविषयी घेतली होती.

Nagesh Karmali
Nagesh Karmali: एक न विझणारे यज्ञकुंड

त्यांनी सृजनशील साहित्याबरोबरच कोकणीची बाजू मांडणारे पुष्कळ लेख वर्तमानपत्रात लिहिले. त्यांचे शिक्षण जरी औपचारिक स्तरावर जास्त झालेले नसले तरी पुष्कळ कष्ट घेऊन त्यांनी इंग्रजी, मराठी, उर्दू, पोर्तुगीज भाषा आत्मसात केल्या होत्या. त्यांचे ’जोरगत’, ’सांवार’, ’वंशकुळाचे देणे’, ’थांग अथांग’ असे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.

हल्लीच त्यांनी खलील जिब्रान कोकणीत आणला होता. मोहन राकेश यांचे ’आधे अधुरे’ हे नाटक त्यांनी कोकणीत आणले आहे.

गजल हा प्रकार कोकणीत आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांना 1992 साली ’वंशकुळाचे देणे’ या काव्यसंग्रहास साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. 1993साली त्यांना गोवा सरकारचा सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त झाला होता.

Nagesh Karmali
Mahadayi River: म्हादईबाबत न्यायालयीन नव्हे, राजकीय तोडगा हाच उपाय

1996साली कोची केरळ येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय कोकणी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले. नागेशबाब म्हणजे कोकणी असे समीकरण तेव्हा झाले होते. त्यांचे मळा -पणजी येथील घर म्हणजे कोकणी प्रेमींची हक्काची जागा होती. कित्येक तरुणाईने तिकडे कोकणीची दीक्षा घेतली. ‘गोवा कोकणी अकादमी’, ‘कोकणी भाषा मंडळ’, अशा कोकणी संस्थांच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.

गोवा स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे ते काही काळ अध्यक्ष होते. जुने गोवे येथील पोर्तुगीज कवी कामोइश यांचा पुतळा हटविण्यासाठी, तसेच ़फुंदासांवच्या क्रौर्याबद्दल जागृती करणारी आंदोलने त्यांच्या नेतृत्वाखाली झाली होती.

एक प्रखर राष्ट्राभिमानी, देशी भाषांचे पुरस्कर्ते, कोकणीचे जाज्वल्य पुरस्कर्ते आणि एक सच्चा ‘गोंयकार’ आपल्यातून निघून गेला आहे. नागेशबाबांना कोटी कोटी नमन!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com