आपल्या कर्तृत्वाची अमीट छाप सोडणारे पुंडलीक नायक झाले सत्तर वर्षीय

'त्यांच्यासारखी अद्वितीय प्रतिभा आपल्याला जपावी लागेल'
Pundalik Narayan Naik
Pundalik Narayan Naik Dainik Gomantak
Published on
Updated on

-राजू नायक

गुरुवार ता. 21 मार्च रोजी पुंडलीक नारायण नायक सत्तर वर्षांचे झाले. गोमंतकीय विचारविश्व आंदोळून टाकणाऱ्या या वादळाची सत्तरी खरे तर आपण एक सोहळा म्हणून साजरा करण्याची आवश्यकता होती. पुंडलीक नायक यानी प्रसवलेल्या साहित्याच्या कालसापेक्ष असण्याची सामाजिक, सांस्कृतिक आणि अन्य अंगांनी चर्चा करता आली असती, व्यवस्थेची चिरफाड करणाऱ्या त्यांच्या नाटकांचे नव्या संकल्पनांतून सादरीकरण करता आले असते आणि यातून गोमंतकीय जनमानसातल्या स्वाभिमानाच्या स्वत्वाच्या जाणिवेवर पसरलेल्या राखेला फुंकर मारून उडवण्याची संधी मिळाली असती. पुंडलीक नायकांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी गोमंतकीय साहित्यिकांची रीघ त्यांच्या घरी लागायला हवी होती. त्यांच्या साहित्यातून आत्मभानाची ऊर्जा मिळवलेल्या बहुजन समाजाने या दिवसाचे परिवर्तन एका पर्वणीत करायला हवे होते.

Pundalik Narayan Naik
ग्रंथ आपले सोबती...

भाषा- लिपी यांच्या अभिनिवेशाच्या पल्याड जाऊन त्यांच्या साहित्याच्या श्रेष्ठत्वाला मानवंदना द्यायला हवी होती. दुर्दैवाने तिथे गोवा कमी पडला. हा करंटेपणा आपण नेहमीच दाखवत आलो आहोत. एखाद्या राजकारण्याचा वाढदिवस पदरमोड करूनही साजरा करतो, पण अक्षय साहित्याने आमचे समाजजीवन समृद्ध करणाऱ्या लेखक- विचारवंतांना गृहित धरून जातो. अस्मितेचा शोध आणि नंतर जतन करताना आपण पिढ्याच्या पिढ्यांना रक्त आटवायला लावले. पण तेथे चाचपडताना आपला हात धरून मार्ग दाखवणाऱ्यांप्रती साधी कृतज्ञताही व्यक्त करताना आपली अडचण होते.

नायक यांच्या सन्मान सोहळ्यात राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी हीच गोव्याची दुखरी नस पकडली. केरळचे प्रख्यात साहित्यिक वासुदेवन नायर यांना ज्ञानपीठ मिळाला, तेव्हा संपूर्ण केरळ राज्यात आनंदोत्सव साजरा होत होता, तर गोव्याला मावजोंना तो पुरस्कार मिळाला तेव्हा सोयरसुतक नव्हते. अंथरुणाला खिळलेल्या एका युवा साहित्यिकेला पुरस्कार मिळाला तेव्हाही तिच्या घरी विचारपूस करायलाही कोणी गेले नाही! या कोडग्या मनोवृत्तीने आपले मन खिन्न झाल्याचे ते म्हणाले.

पुंडलीक नायक यांचा उल्लेख मी सुरुवातीलाच एक वादळ म्हणून केला. पण वादळ तात्कालिक असते, अल्पायुषी असते. पुंडलीक नायकांच्या कर्तृत्वाचा भर आज ओसरल्यासारखा दिसत असला तरी त्यांनी उमेदीच्या काळात जे काही केले, त्याला गोव्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि साहित्यिक इतिहासात तरी तोड नाही आणि संवेदना शिल्लक असलेला गोवा त्या कर्तृत्वाच्या भोवळीतून अद्यापही बाहेर येऊ शकणार नाही. प्रतिभा, प्रज्ञा आणि प्राज्ञा या गुणत्रयीच्या बळावर त्यांनी गोव्याचे सार्वजनिक जीवन काही तपांसाठी तरी झाकोळून टाकले होते. सामाजिक विषमतेचे चटके सोसलेल्या पार्श्वभूमीतून आल्यामुळे त्यांच्या या क्षमता अधिक अप्रुपाच्या वाटतात. मध्यमवर्गाच्या सुरक्षिततेच्या भ्रामक आवरणाला फाडणारी त्यांची प्रतिभा त्याआधी गोमंतकीय साहित्याने अनुभवलीच नव्हती.

कुणाच्याही ध्यानीमनी नसताना निरुपद्रवी साहित्य प्रसवणाऱ्या अभिजनांच्या पंक्तींत त्यांचा 'बांगर बैल' धसमुसळेपणा करत घुसला. आणि, त्या बैलाच्या डरकाळ्या ऐकूनच पंक्तीला त्याच्या हवाली करण्याची वेळ अभिजनांवर आली. आजही त्यांचे साहित्य गोव्यात घाम गाळणाऱ्या नव्वद टक्क्यांचे प्रतिनिधित्व करते आणि त्यांचे नेतृत्व अस्मितेचा अभिमान बाळगणाऱ्या शंभर टक्क्यांचे. पण आज संध्याछाया दाटताना या कर्तृत्वाची कदर आपल्या 'प्रगत' जाणिवांना राहिलेली नाही. हा तद्दन कृतघ्नपणा झाला.

गोव्यातल्या साहित्यिक प्रतिभेला मुक्ती चळवळ आणि त्यानंतर आलेल्या अस्मितासंवर्धक स्थित्यंतरांच्या अंगाने तपासावे लागते. रायटर आणि फायटर अशा दुहेरी भूमिकेत वावरताना लेखनसामर्थ्याला चळवळीसाठी वापरत प्रतिभेच्या अन्य अाविष्कारांना दुर्लक्षिण्याचा त्याग अनेकांना करावा लागला. रवीन्द्र केळेकरांच्या पिढीला याची पहिली झळ सोसावी लागली. पण चळवळीची आणि हालअपेष्टांची स्वातंत्र्यसंगर ते मुक्तिलढा अशी प्रदीर्घ पार्श्वभूमी असलेल्या केळेकरांच्या पिढीला झळा सोसणे हे विशेष श्रमांचे असे कधी भासलेच नाही.

चळवळींसाठी वेळ काढताना आपल्या प्रतिभेला जमेल तसा न्याय देत ही पिढी कार्यरत राहिली. तुलनेने दुसऱ्या म्हणजे पुंडलीक नायकांच्या पिढीसमोरच्या आव्हानांची व्याप्ती बरीच मोठी होती. ओपिनियन पोलमधून तावून सुलाखून निघालेल्या विरोधकांची निर्णायक लढतीसाठीची तयारी भरभक्कम होती. राजभाषा आंदोलनातून ती पदोपदी जाणवली. आजच्या पिढीला तेव्हाच्या ताण्याबाण्यांचा अंदाजही करता येणार नाही, इतकी मने दुभंगली होती.

त्यातून सत्याचा अपलाप करण्याचा आणि बहुजनांना एका विशिष्ट कंपूत ढकलण्याचा यत्न तर जाणिवपूर्वक चाललेला. अशा वेळी मातीचा गंध असलेले नेतृत्व अस्मितेच्या चळवळीला मिळणे अत्यावश्यक होते. तेच पुंडलीक नायकांच्या रूपाने मिळाले. विशेष म्हणजे चळवळीला पूरक आणि पोषक अशा नेतृत्वगुणांसह पुंडलीक नायकही समर्थपणे रिंगणात उतरले आणि शेवटपर्यंत टिकून राहिले. कोकणी अस्मितेला पृथकतेची जाणीव शणै गोंयबाबांनी दिली आणि रवीन्द्र केळेकरांनी तो वसा पुढे नेला. तोपर्यंत तरी वैचारिक वाद- प्रतिवादांवरच चालले होते.

ओपिनियन पोलचा टप्पा महत्त्वाचा असला तरी त्याला परावलंबित्वाच्या विरोधाचीही किनार होती आणि म्हणूनच भाषेच्या राजकारणापलिकडे जाऊन अनेकांनी विलीनीकरणाला नकार दिला होता. राजभाषा चळवळीचा बाज पूर्णतः निराळा होता- दंड- बेटकुळ्या दाखवण्याशिवाय पर्यायही नव्हता. पुंडलीक नायकांना शणै गोंयबाब आणि रवीन्द्र केळेकरांचे वारस म्हणताना या परिस्थितीला डोळ्यांसमोर ठेवावे लागते आणि त्यातूनच त्यांच्या नेतृत्वाचे बावनकशी सोने चमकून उठते. राजभाषा चळवळीचे नेतृत्व करण्याची क्षमता अन्य जाणत्यांकडेही होती. उदय भेंब्रे तर त्यावेळी विधानसभेतले आमदार होते. लोकनियुक्त प्रतिनिधी या नात्याने त्याना नेतृत्व दिले असते, तर कुणी हरकत घेतली असती, असे वाटत नाही.

पण रवीन्द्र केळेकरांनी अत्यंत धोरणीपणाने पुंडलीक नायक यांची निवड केली आणि अन्य जाणत्यांनी ती उचलून धरली. चळवळीच्या कालखंडातले नायक यांचे कर्तृत्व पाहिल्यास या निर्णयाचा अभिमानच वाटावा. कोकणीच्या महत्तेला तळागाळापर्यंत भिडवण्याचे काम सोपे नव्हते. आंदोलनाला लोकशिक्षणाची आणि प्रबोधनाची वरवर सहजगत्या न दिसणारी जोड देत हे काम करावे लागले. त्याचे परिणाम आज कोकणीच्या काजासाठी बहुजन समाजातून सरसावणारे हात देत असतात. हे पुंडलीक नायक यांच्या नेतृत्वाचे खरे यश. गोव्याचा आकार लहान आणि जनजीवनावरला मराठीचा प्रभाव लक्षणीय.

इथला साहित्यिक कोकणीबरोबर मराठी साहित्याच्या वाचन- परिशिलनातूनही आपल्या संवेदना तीक्ष्ण करत असतो. पुंडलीक नायकही याच प्रक्रियेतून गेले. पण जेव्हा प्रतिभाविलासाची वेळ आली तेव्हा त्यानी आपल्या नैसर्गिक उर्मीलाच वाट मोकळी करून दिली. एक सशक्त भाषा म्हणून कोकणीचे सामर्थ्य काय आहे, याचा प्रत्यय नायकांच्या साहित्यनिर्मितीतून येतो. हे साहित्य गोमंतकीय बहुजन समाजाचे अंतरंग उलगडणारे आणि म्हणूनच अस्सल आहे. तिथे वंचितांच्या वेदनेचे कथन आणि त्या वेदनेतून फुललेल्या अंगारांचे स्तवन आहे. त्याचे सामर्थ्य कालसापेक्ष आहे.

नायक यांच्या 'अच्छेव'ची उंची गोव्यात सोडा, राष्ट्रीय पातळीवरल्या समकालीन साहित्यातही अव्वल म्हणावी अशी. नायक यांच्या साहित्यिक कर्तृत्वाचा वरवरचा आढावा जरी घ्यायचा झाला तरी एक प्रबंध लिहून होईल. इथे ते प्रयोजन नाही. त्यानी ज्या ज्या साहित्यप्रकारास हाताळले तेथे आपली अमीट नाममुद्रा सोडली इतके सांगितले तरी पुरे. या अम्लान साहित्यसंपदेचा गौरव ज्ञानपीठ पुरस्काराद्वारे फार आधी व्हायला हवा होता. नायकांची प्रतिभा गगनाला गवसणी घालत असताना हा गौरव झाला असता तर तो पुरस्कारच मोठा झाला असता. तिथे कोण कमी पडले याचा विचार कधी तरी व्हायलाच हवा.

कोकणीची वकिली करण्यासाठी हयात खर्चणाऱ्यांच्या साहित्यिक उंचीची वकिली करण्याचा पत्कर कुणी घ्यायचा, हे आज ना उद्या कोकणी विश्वाला ठरवावे लागेलच. गोव्यात साहित्यिक हा निव्वळ लेखक नसतो तर त्याला अनेक भूमिकांतून वावरावे लागते. तो कार्यकर्ता असतो, नेतृत्वही त्याला स्वीकारावे लागते. त्याच्या प्रभावळींत त्याच्याकडे आदर्श म्हणून पाहिले जाते. सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातील त्याच्या आचरणाकडून आदर्शांची अपेक्षा केली जाते. वंचितांच्या, पीडितांच्या वेदनेला त्याने पत्रकाराच्या हिरीरीने वाचा फोडावी अशी अपेक्षा असते.

Pundalik Narayan Naik
बनवेगिरी प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी केला गुन्हा नोंद

समाजाच्या सुस्त पर्यावरणीय जाणिवांना त्याने चेतना द्यावी अशी अपेक्षाही बाळगली जाते. पुंडलीक नायक यांच्याकडून तर फारच मोठ्या अपेक्षा होत्या आणि आपल्या परीने त्याना न्याय देण्याचा आटोकाट यत्न त्यानी केला. इथे त्यांनी पेललेल्या संस्थात्मक जबाबदाऱ्यांचा विषय येणे अपरिहार्य आहे. विशेषतः सरकारप्रणित कोकणी अकादमीवरली त्यांची कारकीर्द. या काळातील त्यांच्या कार्यशैलीचा मी टीकाकार होतो आणि दयामाया न दाखवता त्यांच्यावर शाब्दिक कोरडेदेखील ओढले आहेत.

पण तो दोष त्यांचा नव्हे. कष्ट करणाऱ्यांनी त्याची फळेही चाखावीत या मानसिकतेतून भाषिक चळवळीतल्या यशानंतर अनेकांची पावले श्रेयसाच्या शोधात गेली. साहित्यसेवेसाठी सरकारी नोकरी त्यागणाऱ्या पुंडलीक नायकांनी काही तरी वेगळे करता येईल म्हणूनही तोच मार्ग चोखाळणे संयुक्तिकच होते.

यामुळे त्यांच्या सर्जनशिलतेवर शैथिल्याचा तवंग चढला, चौकटींतल्या कार्यबाहुल्यामुळे साहित्यनिर्मितीतली अभिजात अस्सलता क्षीण होत गेली. अनेकदां ते सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनल्याचेही दिसले. नित्य बोलणाऱ्यांचे मौनही बोचरे असते. राजकारण्यांच्या पातळीवर उतरण्याचा बेरकीपणा त्यांच्यात मुळातच नव्हता, त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याची वेळ आली. यातून त्यांचे पाय किती मातीचे आहेत, हे सांगत अनेकांनी तोंडसुख घेतले. पण खरे तर त्यात कोकणीचेच नुकसान होते आणि आहे. उन्नत प्रतिभेला सुरक्षित व सुशोभित मखरांत स्थानापन्न करणे हे समाजाचे कर्तव्यच असते.

तिथे एक समाज म्हणून आपण कमी पडलो तर मग परिणामांचीही आपणच जबाबदारी घ्यायला हवी. तरी देखील एकदा अनुभव घेतल्यानंतर पुंडलीक नायक यानी पुन्हा कोकणी अकादमीत जाणे योग्य होते का, हा प्रश्न राहातोच. साहित्यिक आणि साहित्य हा सद्यकालीन समाजाच्या आस्थेचा विषय नव्हे, हेदेखील मान्य करायला हवे. आपली अवलोकन क्षमता अर्ध्या तासाच्या प्रक्षेपणात पंधरा मिनिटांचा जाहिरात ब्रेक घेणाऱ्या मालिकांना पूरक अशी बनलेली आहे. तासन् तास वाचावे, वाचलेले मनात घोळवावे, त्यावर मनातल्या मनात खल करावा ही सगळी निरुद्योगी माणसाची लक्षणे मानणारा हा सद्यकाल. त्याला अभिजात साहित्याची जाण असण्याची शक्यता कमीच.

येथे बेताची बुध्दिमत्ता असलेले राजकारणी रात्रीत शिक्षणमहर्षी होतात आणि शाळा- महाविद्यालयांवर त्यांच्या नावाच्या पाट्या चढतात. प्रतिभा आणि प्रज्ञेचा हा अपमान उच्चशिक्षितांनाही खटकत नसतो, इतकी बधिरता आलेली आहे. येथे बा. भ. बोरकर किंवा महादेवशास्त्री जोशी या दिवंगत दिग्गजांचे नाव एखाद्या सांस्कृतिक कार्यासाठी वाहिलेल्या सरकारी वास्तूला द्यावे असेदेखील आपल्याला वाटत नाही. तर मग पुंडलीक नायक यांच्या हयातीत त्यांचे नाव देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

पण पुंडलीक नायक यांची तेवढी उंची आहे, हे किमान साहित्यविश्वाने तरी तारस्वरात सांगायला नको का? उलट आपण उंची कमी दाखवण्याचीच धडपड करत असतो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनसत्रास निमंत्रित केले तरी आमचा पोटशूळ उठतो. महाराष्ट्राने हा वाद आणि त्यातून उठलेला कडवटपणा कधीच विस्मृतीत ढकलला आहे, पण आम्हाला खपल्या काढण्यातच आनंद वाटतो.

तेथे पुंडलीक नायकांची प्रतिभा- मग ती कितीही उत्तुंग असली तरी- कशी दिसायची? त्याहीपुढे जाऊन विचारायचें तर स्वकियांनाच ती उंची दिसली नाही तर अन्यांनी कशाला मुद्दामहून दाखवून द्यायची? पुंडलीक नायक आज थकले आहेत. प्रकृतीच्या तक्रारींमुळे सर्जक अभिव्यक्ती खुंटली आहे. उत्तुंग भराऱ्या मारणारी प्रतिभा कुंठीत झाल्याचे जाणवते.

वयपरत्वे ते साहजिकच असले तरी अशी शक्तिस्थळे दुर्लक्षित होऊ न देणे हे सुसंस्कृत समाजाचे कर्तव्य. पुंडलीक नायकाना आपल्या सत्तरीचे अप्रुप नसण्याचीच शक्यता अधिक. आणि त्यांची साहित्यिक थोरवी साजरी करण्यासाठी आपल्याला तरी वेळ- मुहुर्त का लागावा? गोवा त्यांच्या कर्तबगारीला कधीही मानवंदना देऊ शकतो. ती देण्याचा संकल्प आज- आत्ताच का सोडू नये? शांतलेले स्फुल्लिंग त्या निमित्ताने झळाळून उठले तर तोही मोठा लाभच म्हणावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com