ग्रंथ आपले सोबती...

'लसीकरण करून कुणाला वाचनाची आवड निर्माण करू शकत नाही'
Books are our real friend
Books are our real friendDainik Gomantak
Published on
Updated on

- मुकेश थळी

जागतिक पुस्तक दिनानिमित्त काल कार्यक्रम झाले. दोन वर्षं असल्या कार्यक्रमाना खीळ बसली होती. आता परत मोकळेपणी श्वास घेत पण कोविडची दक्षता घेत कार्यक्रम सुरू झाले. प्रत्येकाला असतं एकेक वेड. छंद असतो, आवड असते. ती जीवनाला चालना देत असते. जगण्याला उत्साह आणि कारण देत असते. आमच्यासारख्यांना वेड, व्यसन एकच- पुस्तकं! ऑनलाईन विक्री सुरू झाल्यापासून बरं झालं. इंग्रजी, हिंदी, मराठी पुस्तकं ऑनलाईन स्तरावर मिळू लागली. मोबाईलवरून ऑर्डर करा, तीन दिवसांत पुस्तक घरपोच घरी. बरं, पुस्तकाची परीक्षणेही इंटरनेटवर वाचायला मिळतात. तंत्रज्ञानाची ही क्रांती आहे. सगळीच नसली तरी अनेक पुस्तके मोफत वाचायला मिळतात. हीसुद्धा डिजिटल युगाची किमया आहे.

Books are our real friend
धारगळ येथे आज ‘हँड्स अप’ सादर करण्यात येणार

वाचनाचं दारिद्र्य दूर व्हावं म्हणून शालेय स्तरापासून प्रयत्न हवेत. लसीकरण करून कुणाला वाचनाची आवड निर्माण करू शकत नाही. पण ज्यांना मुळातच आवड आहे त्यांची भूक वाढवायला हवी. ज्यांना भूक आहे त्यांची उपासमार होऊ नये. सुरुवातीला चिठोऱ्यांपासून, वृत्तपत्रांमधल्या जाहिरातींपर्यंत, चण्यांच्या पुडीच्या कागदावरून काहीही वाचायची सवय आम्ही अनभुवलेली आहे. पुढे पुढे आम्ही वाचनाच्या बाबतीत अति चोखंदळ होत गेलो. पुस्तकांचा शोध अनंतच असतो. तो निरंतर चालू असतो. मला कुठलाही विषय तसा वर्ज्य नाही. विद्यापीठात कोंकणी विश्वकोश विभागात काम केलं. तिथं विविध कोशांचे ढीग पाहिले. चाळले. वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी पुस्तके भेटली. त्यांनी बोलावलं. आम्ही त्यांना जवळ केलं. वाचली. त्यांची पारायणे केली. कुतूहलाच्या सीमा वाढत वाढत विस्तारत गेल्या. जिज्ञासा ही न सरणारी गोष्ट असली पाहिजे. कधीही शमवू शकत नाही अशी तहान.

पुस्तकांनी जीवनात गुणवत्ता आणली. दर दिवशी संगीत ऐकावं, थोडंसं वाचावं तेव्हाच जीवनात बहार येते. वेगळ्या संगीत - श्रुती झंकारू लागतात. उल्हासरूपी विचारांचे झरे प्रस्फुटू लागतात. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे, म्हणतात त्या प्रमाणे वाचनवेड असलेल्यांनाच हा आनंद ठावा.

गोंयकार चार भाषांतून वाचू शकतो. कोंकणी, मराठी, हिंदी व इंग्रजी. हल्लीच रा. चिं. ढेरे यांचं ललीतबंध हे पुस्तक वाचलं. सध्या संत बहिणाबाईंचं, बहिणाबाईंचा गाथा, हे पुस्तक वाचत आहे. छान आहे. किती तरी वर्षांअगोदरचं लेखन आपण पुस्तकातून वाचत असतो. वेगवेगळी भावविश्वं या प्रक्रियेतून, वाचन समाधीतून उलगडत जातात. सुफी संतकवी जलालुद्दीन रूमींच्या दृष्टांतांवर आधारीत एक इंग्रजी पुस्तक ऑनलाईन मागवलं होतं. तेही सुंदरच आहे.

ग्रंथाच्या सहवासात या पुस्तकात अनेक मान्यवरांचे आणि लेखकांचे, पत्रकारांचे वाचन व ग्रंथ या विषयावर अनुभव आहेत. सतीश काळसेकर याचं वाचणाऱ्याची रोजनिशी हे पुस्तकही छान आहे. बाकीचे लेखक किती वाचतात, काय वाचतात त्या कथा रोमांचक आहेत.

हल्ली विदेशात ऑडियो बुक्स फारच लोकप्रिय होत आहेत. ऑफिसला जाताना आनी परत येताना लांब अंतर असेल तर पेन ड्राईव्हवर साठवलेलं ऑडियो बूक ऐकता येतं. म्हणजे पुस्तकं वाचायची गरज नाही. डोळ्यांना त्रास नाही. फक्त ऐकायची. काही लेखक स्वत: आपलं साहित्य - निवेदन करतात. पण तसं करण्याअगोदर ते वाचण्याचं, बोलण्याचं व्यवस्थित, पध्दतशीर ट्रेनिंग घेतात. लेखक नसेल तर व्यावसायिक निवेदक पुस्तकाचं निवेदन करतो. पुस्तक दोन दिवसांत ऐकून संपतं. ऑडियो पुस्तकात किंचित योग्य तो वाचिक अभिनय दिल्यानं व पार्श्वसंगीत दिल्यानं ते श्रोत्याला जास्त श्रवणीय होतं.

भारतात ऑडियो बूक संकल्पना प्रादेशिक भाषांतील प्रकाशकांनी सुरू केली आहे. वैयक्तिक खाजगी प्रयत्न होतच असतात. युट्यूबचा वापरही पुस्तक व कविता सादर करण्यास होतो.

“Reading gives us some place to go when we have to stay where we are”- जेव्हा आम्हाला एकाच ठिकाणी थांबायचं असतं तेव्हा वाचन आम्हाला कुठं तरी जायची जागा दाखवतं.- हे शब्द आहेत अमेरिकेचे सुप्रसिध्द सुविचार लेखक मेसन कुली यांचे. कोविड काळांत त्यांनी हे लिहिले. कारण कोविड काळांत वाचन हाच एक विरंगुळा होता घराच्या भिंतीत वेळ सारण्याचा. नव्या गोष्टी, नव अनुभव, नव्या संस्कृती यांची चाहूल वाचनाने मिळते. कल्पनाशक्ती, विचारशक्ती यांना इंधनासारखं, वंगणासारखं बळ मिळतं. एकाग्रता, स्मरणशक्ती यांना बळकटी येते. एकंदरीत वाचकामध्ये आत्मविश्वास वाढतो.

कितीही डिजिटल क्रांती झाली तरी कागदी पुस्तकांचं महत्त्व राहणारच. पुस्तकांना एक छान सुगंध येतो. तो हुंगूनच आपण वाचनास प्रारंभ करतो. पुस्तकांची, वाचनाची आवड नसेल तर त्याच्यापेक्षा दुसरी शिक्षा असू शकेल का?

Books are our real friend
बनवेगिरी प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी केला गुन्हा नोंद

कधी कधी एका पुस्तकांत पुढच्या पुस्तकांचे धागे मिळतात. त्या सुताच्या धाग्यावरून पुढच्या पुस्तकांच्या स्वर्गांच्या वाटा खुल्या होतात. पुढचे लेखक सापडतात. त्यांचं नवनवं जग दिसू लागतं. सजगपणे ती दूरदृष्टी मात्र विकसित करावी लागते. रियाझ करणाऱ्या गायकाला जसे स्वर अधिक स्पष्ट, स्वच्छ दिसू लागतात तसे.

इंग्रजी भाषेतीलही वाचन हवं. कारण जागतिक साहित्य चाखायचं असेल तर आपणाला हा एक एकमेव पूल आहे. डोह आहे. इंग्रजीशिवाय पर्यायच नाही. मूळ इंग्रजी नाटकं, कविता, निबंध तसेच इतर भाषांतून अनुवादित साहित्य इंग्रजीत उपलब्ध आहे.

वाचताना अकस्मात आपणाला एक किस्सा, माहिती, शब्द वा काव्यमय प्रयोग भेटतो की वाऽ ऽ असे आनंदाचे उद्गार येतात. वाचन उथळ, वरवरचं नसावं. वैचारिक विषय असावेत. ललीत, काव्य सर्व घनगर्भ विषयांकडे चाणाक्ष, चोखंदळ वाचकाने प्रिती करावी.

अमेरीकेचे माजी राष्ट्राध्यक्ष लिंकन व्यासंगी वाचक. ते म्हणायचे, ज्या दिवशी मी भरीव, आतून समृध्द करणारं काही वाचत नाही त्या रात्री मला माझा चेहरा आरशात पाहवत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com