शक्तिशाली भाजपाचा गोव्यात उदय

एक कठीण आव्हान गोव्यातील भाजपने पेलले. भाजपचे पतन होऊन काँग्रेसला लाभ मिळेल ही अटकळ खोटी ठरली.
Goa Assembly Election Result 2022
Goa Assembly Election Result 2022Dainik Gomantak

डॉ.मनोज कामत-

नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणूक निकालांमुळे अनेकांना धक्का बसला, अपवाद असलाच तर तो भाजपमधील नेत्यांचा. आपल्या पक्षाला जितक्या जागा मिळतील म्हणून नेते सांगत होते, त्या आकड्याच्या जवळपास तो पक्ष पोहोचला. विस्कळीत विरोधकांमुळे भाजपाला प्राप्त झालेला स्पष्ट जनादेश आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या राजकीय विश्लेषकांच्या भाकितांचा उडालेला फज्जा यामुळे ही निवडणूक अन्य निवडणुकांपेक्षा वेगळी ठरते. २० जागा मिळवलेला भाजप महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे दोन सदस्य आणि तीन अपक्षांच्या पाठबळावर सलग तिसऱ्यांदा सत्ता प्राप्त करील, हे निश्चित. प्रतिकुल परिस्थितीतून भाजपला हे जे यश लाभले आहे त्याचे श्रेय निर्विवादपणे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, संघटनमंत्री सतीश धोंड आणि विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाच जाते. या यशांत अन्य राजकीय पक्षांनी शिकण्यासारखे बरेच काही आहे.

यावेळी गोव्यात बहुतेक ठिकाणी अटीतटीच्या पंचरंगी लढती झाल्या. एरवी भाजप आणि काँग्रेस अशा दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत झूंज व्हायची, यावेळी त्या मर्यादित जागेत अनेकांची भाऊगर्दी झाली. संसाधनांच्या बाबतीत श्रीमंत आणि माध्यमस्नेही असलेला तृणमूल तसेच गोव्यातील वास्तव्याचा गेल्या सात वर्षांचा अनुभव असलेला सुसंघटीत असा आम आदमी पक्ष यामुळे चित्र अधिक अस्पष्ट आणि गोंधळाचे बनले. या नव्या पर्यायांच्या नादी आपला मतदार लागू नये याची दक्षता घेण्याचे आव्हान भाजपपुढे होते. त्यातच मगो पक्षाकडले संबंध बिघडले आणि नवे आव्हान उभे राहिले. दहा वर्षांच्या सत्तेतून आलेल्या प्रस्थापितविरोधी लाटेला पुरून उरत भाजपने (BJP) आपली ३३ टक्क्यांची मतपेढी राखलेली आहे. तेवढ्याच मतांनिशी २०१७ साली भाजपाला केवळ १३ जागा मिळाल्या होत्या. यावेळी विरोधकांमधला विसंवाद भाजपच्या पथ्यावर पडला, यात शंका नाही. पण केवळ विरोधकांमधील लाथाळ्यांवर विसंबून न राहाता भाजपने प्रत्येक मतदारसंघासाठी वेगळी रणनीती तयार करून तिची अंमलबजावणीही केली. (Goa Assembly Election 2022)

संघटनात्मक शक्ती पाठीशी असल्यामुळेच भाजप या राजकीय चक्रव्युव्हातून पार होऊ शकला. आप आणि तृणमूल हे हिंदू विरोधी पक्ष असल्याची कुजबूज मोहिम भाजपाला आपल्या नाराज हिंदू मतदाराला पकडून ठेवण्यासाठी उपयोगाची पडली. भाजपच्या याआधीच्या कोणत्याच प्रदेशाध्यक्षाने घेतले नसतील अतके श्रम विद्यमान प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी घेतले तर संघटन सचिव सतीश धोंड यांच्यामुळे विनय तेंडुलकर, दिलीप परुळेकर यांच्यासारखे महत्वाकांक्षी इच्छुक केवळ गप्पच बसले नाहीत तर त्यांनी उमेदवारांच्या विजयासाठीही काम केले. प्रचंड संसाधने, अचुक सर्वेक्षणे, देवेंद्र फडणवीस व सी.टी. रवी यांच्यासारख्यांची कुशल निवडणूक हाताळणी आणि बी.एल. संतोष यांची सर्व ठिकाणी पोहोचणारी घारीची नजर यांच्याआधारे भाजपाने परिस्थितीवर मांड मिळवली. मनोहर पर्रीकरांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीत हा पक्ष निवडणूक लढवत होता, हेदेखील येथे लक्षात घ्यायला हवे.

Goa Assembly Election Result 2022
'बुलडोजर रिटर्न' भाऊ योगी आदित्यनाथ यांच्या विजयावरती बहीण शशीची प्रतिक्रिया

पक्षाने पर्वरी व पेडणेतले संभाव्य बंड निष्ठुरपणे मुळातच निपटले. बाबू आजगावकरांसारख्या वाचाळांना नवी कुरणे दाखवली. सांगेतील बाबू कवळेकरांच्या पत्नीला उमेदवारी देण्याचा विषय अतिशय शांतपणे, बाबूंना न दुखवता हाताळला. तुलनेने संथगती असलेल्या प्रविण झाट्ये, कार्लुस आल्मेदा आणि एलिना साल्ढाणा यांना दयामाया न दाखवता बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला तर तळागाळात संपर्क असलेल्या दीपक पाऊसकर, इजिदोर फर्नांडीस यांना अत्यंत काळजीपूर्वक निरोप दिला. अटीतटीच्या लढतीत प्रमोद सावंत, रवी नाईक, सुभाष फळदेसाई, निलेश काब्राल, रमेश तवडकर, गोविंद गावडे यांना निवडून आणत भाजपने आपली संघटना म्हणजे नित्य वंगण वगैरे लावून सज्ज असलेले, निवडणुका जिंकणारे यंत्र बनवली आहे. उत्पल पर्रीकर, मायकल लोबो आणि लक्ष्मीकांत पार्सेकरांच्या बंडाची संयत, शांत हाताळणी केल्यामुळेच भावना अधिक उद्दिपीत झाल्या नाहीत आणि संबंधितांना काही भावनिक भांडवलही उभे करता आले नाही.

भाजपात अंतर्गत कलह होता आणि त्यावर मात करत पक्ष यशस्वी झाला, हेही लक्षात घ्यावे लागेल. काही मंत्र्यांची दुःसाहसे, कोविड हाताळणी, सदोष नोकरभरती, वित्तीय गैरव्यवस्थापन, दशकभराची खाणबंदी यामुळे भाजपसमोरचे आव्हान खडतर झाले होते. तरीही मये, साखळी, कुडचडे, सावर्डे, वाळपई आणि साखळी हे खाणपट्ट्यातले सहा मतदारसंघ भाजपने खिशात टाकले, यातच त्या पक्षाची मतदार हाताळणी नजरेत भरते.

आपला ३३ टक्क्यांचा वाटा अबाधित राखताना भाजपने २०१७च्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी १७ नवे मतदारसंघ काबीज केले. पक्षाने या निवडणुकात पक्षांतर केलेल्या १२ जणांना उमेदवारी दिली आणि जिंकण्याची क्षमता या निकषांवर ५ जणांची आयत्यावेळी आयात केली. ४० पैकी ३३ जागांवर गांभिर्यपूर्वक लढत देणाऱ्या भाजपचे १७ ठिकाणचे चेहरे हे अन्य पक्षातून आणले होते. यातील काँग्रेसमधून केलेली आयात पक्षाला लाभदायक ठरल्याचे दिसते. नव्या आयातीबरोबरच रोहन खंवटे, विश्वजीत राणे यांची मतपेढी यामुळे भाजपाने प्रस्थापितविरोधी जनभावनेच्या संकटावर मात केली. दिव्या राणे, प्रविण आर्लेकर, दाजी साळकर, उल्हास तुयेकर असे नवखे चेहरे विजयी झाले. तुयेकर यांचा नावेलीतला विजय तर पक्षाच्या सर्वकश तयारीकडेच बोट दाखवतो. पक्षाने २०१७ सालच्या निवडणुकांत पराभूत झालेल्या ५ माजी आमदारांना तिकीट दिले होते. यातले गणेश गावकर, सुभाष फळदेसाई आणि रमेश तवडकर विजयी झाले. म्हणजेच त्यांची निवड योग्य होती. जे भाजप उमेदवार पराभूत झाले त्यातले दोन उपमुख्यमंत्र्यांसह अर्धेअधिक आयात केलेले होते. मात्र, त्यांनी आपली मतपेढी भाजपकडे वळवत पक्षाची टक्केवारी अभंग राखली.

Goa Assembly Election Result 2022
"लडकी हूॅं लड सकती हूँ": काँग्रेससह सर्वपक्षीय महिलांनी दाखवून दिलं...

भाजपाला आता अनेक नव्या चेहऱ्यांनिशी आपल्या विधीमंडळ पक्षाच्या चेहऱ्याला नवी झळाळी देता येईल. अपक्ष उमेदवार रेजिनाल्ड लॉरेन्स भाजपाच्या अंतस्थ पाठिंब्याशिवाय निवडले गेले असे कुणीच समजू नये. त्यांना मंत्रीपद देत भाजपा सासष्टीत आणखीन खोलवर जायचा प्रयत्न निश्चितपणे करील. काही वर्षांआधी आवेर्तान फुर्तादो यांना मंत्रीपद देत नावेलीत केलेला प्रवेश आज त्या मतदारसंघातून पक्षाला एक आमदार देता झाला. नव्या चेहऱ्यांच्या आधारे पक्षाचे जनमानसातले अधिष्ठान अधिक मजबुत करणे शक्य होईल.

एक कठीण आव्हान गोव्यातील भाजपने पेलले. भाजपचे पतन होऊन काँग्रेसला लाभ मिळेल ही अटकळ खोटी ठरली. भाजपला मिळालेला जनादेश आणि चार दिशांना विखुरलेले विरोधक यामुळे कोणताच राजकीय पर्याय नजिकच्या काळात तरी समोर येणे सोपे नाही. यातून पक्षांतरांना आणि पक्षद्रोहाला मूठमाती मिळेल, अशीही अपेक्षा आहे. स्पष्ट जनादेशामुळे नव्या मुख्यमंत्र्यांना राजकीय आणि आर्थिक आयाम असलेले निर्णय विशेष दबावाविना घेता येतील. विधीमंडळातल्या कुणाचा धसमुसळेपणा सहन करायची आवश्यकता भासणार नाही. बेरोजगारी, वित्तीय संकटाचे व्यवस्थापन, स्वंयपोषख खाण व्यवसायाचे आव्हान यावर गांभिर्याने निर्णय घेता येतील. सर्वार्थाने सक्षम बनलेले भाजप सरकार आता गोव्यापुढील गंभीर विषयांना हाताळू लागेल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com