गेले काही दिवस संशयाच्या आणि अस्वस्थतेच्या भोवऱ्यात भिरभिरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर देशातील बुजुर्ग नेते आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेला निवृत्तीचा निर्णय एखाद्या तडिताघाताप्रमाणे कोसळला. ‘लोक माझे सांगाती’ या आत्मवृत्ताच्या दुसऱ्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना अचानक पवार यांनी ‘आपण पक्षाध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची’ घोषणा करून ‘बॉम्ब’च टाकला होता!
त्यानंतर सुरू झाले ते मिनत्या आणि आर्जवे यांचे पर्व. पवार गेली 63 वर्षं राजकारणात आहेत आणि ऐंशीच्या उंबरठ्यावर असताना, त्यांनी अंगावर पावसाच्या सरी झेलत केलेल्या भाषणामुळे या महाराष्ट्र देशीच्या राजकारणालाच एक नवा आयाम मिळाला होता.
त्यामुळे पवार कधी निवृत्त होतील, हे ना कधी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनात आले होते; ना त्यांच्या कट्टर विरोधकांच्या. मात्र, त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आठ-पंधरा दिवसांपर्वीच सूचित केलेली ‘दोन भूकंपां’ची भविष्यवाणी आणि पवार यांचेच पुतणे तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार काही नवा डाव मांडण्याची चर्चा, या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी स्वत:च ‘आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे!’ असे सांगत आपल्या पक्षातील अनेकांना अस्वस्थ करून सोडले होते.
त्यानंतर त्यांनी अचानक हा दणदणीत बॉम्ब फोडला आहे. मात्र, त्यामुळे केवळ महाराष्ट्राच्याच राजकीय रंगमंचावर नव्हे तर देशाच्या पातळीवरील राजकारणातही अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न अर्थातच आता या पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व कोण करणार, हाच आहे.
त्याचे उत्तर शोधणे हे महाकाय काम तर आहेच; त्याचबरोबर पवारांचा उत्तराधिकारी हा पवार कुटुंबातीलच असेल की अन्य कोणी, हा तिढाही आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांना तातडीने सोडवावा लागणार आहे.
केवळ पवार यांच्याच राजकीय चातुर्यामुळे 2019 मधील विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या ‘महाविकास आघाडी’चे भवितव्य काय, हाही प्रश्न आता आ वासून उभा आहे. राज्याला भाजून काढणाऱ्या उन्हाळ्याचे कारण पुढे करून, महाविकास आघाडीच्या पुढील तीन ‘वज्रमूठ’ सभा रद्द झाल्याचे वृत्तही नेमके बुधवारीच आल्यामुळे तर त्याबाबत भले मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशभरात सुरू असलेल्या विरोधकांच्या ऐक्याच्या प्रयत्नात अग्रभागी असलेल्या पवार यांचे आता नेमके स्थान काय असेल, हाही लाखमोलाचा प्रश्न आहे.
असे अनेक प्रश्न पवार यांच्या या ‘खेळी’मुळे अनेक पोटप्रश्नांची मालिका उभी करून सामोरे आले आहेत. अर्थात, पवार यांनी आपल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत असे धक्के अनेकांना अनेकदा दिले आहेत आणि त्या धक्क्यांतून आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन पुढे यशस्वी वाटचाल करण्याचे कामही त्या त्या वेळी पवार यांनी अगदी सहजपणे केले आहे. त्यामुळे हा ‘बॉम्ब’ही त्यांनी पुढील दिशा निश्चित करूनच फोडला असेल, असे म्हणता येते.
नेतृत्वाबाबतचे ऐक्य!
शरद पवार यांनी 1999 मध्ये सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा उल्लेख केल्यानंतर काँग्रेसने त्यांना ‘बेदखल’ केले, तेव्हा त्यांनी तातडीने केवळ ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ची स्थापनाच केली असे नाही, तर महाराष्ट्र काँग्रेसमधील अनेक बडे नेते आपल्यासोबत आणले. शिवाय, राज्य काँग्रेसपुढे मोठे आव्हान उभे करून लढवलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर त्याच काँग्रेसशी आघाडी करून चक्क15 वर्षे शर्थीने हे राज्यही राखले.
मात्र, त्याच्या पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये असेली सुप्त स्पर्धा आणि मुख्यमंत्रिपदाची मनीषा ही कधीच लपून राहिली नव्हती. तरीही हे सारे नेते पवारांच्या निवृत्तीनंतर थेट नेतेपदाच्या शर्यतीत न उतरता, ‘पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा!’ या मागणीसाठी एकदिलाने ठाम राहिल्याचे चित्र मंगळवारी मुंबईतील नरीमन पॉईंटवर असलेल्या ‘चव्हाण सेंटर’मध्ये उभे राहिले.
त्यामुळे संपूर्ण पक्ष हा आपल्याबरोबरच आहे, हे तर पवार यांनी दाखवून दिलेच, त्याचबरोबर पवार हे आपल्या पक्षापेक्षाही मोठे आहेत, याचीच प्रचीतीही त्यामुळे आली. महाविकास आघाडी आणि देशातील विरोधकांच्या राजकीय ऐक्याच्या प्रक्रियेत पवारांची भूमिका कोण बजावणार हा प्रश्न समोर आणला जो राजकारणातील पवारमाहात्म्य अधोरेखित करणारा आहे.
अर्थात, हे पक्षातील ऐक्य सामोरे येत असतानाच, अजित पवार यांनी घेतलेली वेगळी भूमिका सगळ्यांनाच प्रकर्षाने जाणवली. पवारांच्या साक्षीनेच नेतृत्वबदल झाला तर नव्या नेतृत्वाला पवार यांच्याकडून काही ‘युक्तीच्या चार गोष्टी’ समजून घेता येतील, असं अजित पवार सांगत होते तेव्हा सर्वांना पवारांची निवृत्ती हा धक्का असला तरी पवार कुटुंबात यावर आधीच सहमती झाली असावी, अशा तर्काला पुष्टी मिळते.
तसं असेल तर पवार राजीनाम्याच्या निर्णयापासून मागे येण्याची शक्यता संपते. या शक्यतेने निर्माण झालेली अस्वस्थता पक्षात स्पष्ट आहे. पक्षाध्यक्षपदावर पवारांऐवजी कोणीही आले तरी या नव्या नेत्यासोबत इतरांची समीकरणे कशी असणार हा प्रश्न असेल.
पवार यांचा निर्णय स्वीकारावा, असे सांगणारे अजितदादा आणि तो मागेच घ्यावा, यासाठी आग्रह असणारे काही नेते हे पक्षातील निरनिराळ्या प्रवाहांचे प्रतिनिधित्व करतात.
पवार निर्णय घेण्याच्या स्थानी आहेत, तोवर हे प्रवाह एकमेकांसोबत सुखांने नांदणे स्वाभाविक होते. ते पुढे तसेच राहील काय, हा पक्षासाठी कळीचा प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवे नेतृत्व पवार यांच्या घरातून उभे राहिले काय किंवा बाहेरून, विरोधकांना त्यामुळे टीकेची संधी आयतीच मिळणार, हे उघड आहे.
खरा प्रश्न हा सोनिया वा राहुल गांधी यांच्याप्रमाणेच नवा अध्यक्ष नेमल्यानंतरही पवारच पक्षातील अंतिम शब्द म्हणून नेहमीप्रमाणे लक्ष घालणार का, हा आहे. त्याचे उत्तर अर्थात काळच देणार आहे.
दरम्यान, पक्षातील काही पदाधिकाऱ्यांचा आग्रह पवारच अध्यक्ष राहावेत, असा कायम असून काहींनी थेट राजीनामासत्र सुरू केले आहे. मात्र, पवार तूर्तास तरी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचेच चित्र उभे आहे.
राज्य आणि राष्ट्र
एकीकडे ‘महाविकास आघाडी’च्या भवितव्याबाबत पवार यांच्या या निर्णयामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे तर राष्ट्रीय पातळीवरही पवार थेट राजकारणात नसणे, याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. ‘महाविकास आघाडी’चा घाट घालून पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा बाजच पुरता बदलून टाकला होता.
उद्धव ठाकरे हे केवळ त्यामुळेच मुख्यमंत्री होऊ शकले होते. शिवाय, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कशी रणनीती आखावयाची याचा आदर्शच तेव्हा पवारांनी देशाला घालून दिला होता.
त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरही तीच मोहीम तडीला न्यायची असेल, तर पवार यांनी थेट राजकारणात राहणे गरजेचे आहे, असे हा विचार मानणाऱ्या बिगर-भाजप पक्षांच्या नेत्यांना वाटणार, हे उघड आहे.
त्यामुळे यासंबंधातही काही विचार पवार यांनी केलाच असणार. पवार यांचे नेतृत्व हे अनेकार्थांनी मोठे मानले जाते, याचे कारण 1999 असो 2019 असो - थेट विरोधकांशी हातमिळवणी करून आपल्या पक्षाला तसेच सहकाऱ्यांना सत्तेचा वाटा मिळवून देण्याचे काम त्यांनी करून दाखवले आहे. त्यामुळे आजमितीला ‘महाविकास आघाडी’ टिकून राहावी, याची गरज सर्वात अधिक ही उद्धव ठाकरे यांनाच वाटत असणार.
‘महाराष्ट्र दिना’च्या मुहूर्तावर मुंबईत झालेल्या ‘वज्रमूठ’ सभेत भाजपला या आघाडीने एकमुखाने खडे आव्हान प्रथमच दिले होते. त्यानंतरच्या काही तासांतच पवारांनी हा ‘बॉम्बस्फोट’ केल्यामुळे सर्वात नाराज उद्धव ठाकरे झाले असणार.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाल्यानंतरही ही आघाडी टिकवून ठेवण्याची जबाबदारी पवार यांना पार पाडावी लागणार आहे.नव्या नेतृत्वाने ती जबाबदारी पार पाडावी, अशी भूमिका घेतली तर त्यामुळे अनेकांच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न उभा राहू शकतो.
अर्थात, पवार यांच्यासारख्या हातात कायम ‘हुकमाचा एक्का’ ठेवून राजकारण करणाऱ्या या बुजुर्ग नेत्याच्या मनात हे सारे प्रश्न निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना आलेच असणार, यात शंकाच नाही.
त्यामुळे पवार यांनी त्यासंबंधात काय आणि कोणती उतारी कधी करावयाची हेही ठरवून ठेवलेले असणार. एकमात्र खरे. पवार यांचा हा निर्णय केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशपातळीवरील राजकीय रंगमंचावर नवे नेपथ्य उभे करणार काय, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
मुख्य म्हणजे पवार यांच्या या खेळीनंतर काय, या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या समर्थकांपेक्षाही त्यांचे विरोधकच अधिक उत्सुकतेने शोधत असणार. पवार यांच्या आजवरच्या राजकारणाचे वैशिष्ट्यही नेमके हेच आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.