

Toddy Tapping From Coconut Tree माडावर चढून माडाची सूर कशी काढली जाते (टेडी टेपिंग) याचे प्रात्यक्षिक देण्यासाठी मला अनेक वेळा निमंत्रित केले जाते. या प्रात्यक्षिकात माडावर कसे चढावे, माडाची पोय (वरच्या टोकाला असलेला विशिष्ट भाग) कशी कापावी, नारळ कसे पाडावेत या गोष्टी मी उपस्थितांना समजावून सांगते.
माडावर चढण्याच्या कामात कष्ट अवश्य आहेत पण नोकरीच्या मागं न लागता हे कष्ट उपसण्याची तयारी ठेवली तर त्यातून चांगली कमाई होणे शक्य आहे. जर तुम्ही दहा माडांचा निरा नेहमी जमा करू शकला तर वर्षाला अडीच ते तीन लाख रुपयाची मिळकत होऊ शकते.
हे माड तुमचे स्वतःचे असू शकतात किंवा दुसऱ्याचे असले तरी त्यांची किंमत अदा करून तुम्ही चांगल्या प्रकारे कमाई करू शकता.
आजच्या जीवनशैलीमुळे आम्ही गोमंतकीय अधिकच सुस्त बनत चाललो आहोत त्यामुळे परंपरागत असलेली कष्टाची कामे करण्यासाठी आम्ही तयार नसतो. माडाची सूर उतरवणे तर कष्टाचेच असते.
दर दिवशी दोन वेळा माडावर चढावे लागते. कष्ट आणि असले काम करण्यासाठी वाटणारा संकोच यामुळे अनेक जण हे काम करायला तयार होत नाहीत.
पण माडांच्या नवीन प्रजाती अधिक उंच नसतात. जमिनीवर उभे राहून किंवा माडाला शिडी टेकवून नारळ उतरवणे किंवा त्यांची निरा काढणे शक्य आहे.
पूर्वीच्या काळी पायात दोरी अडकवून रेंदेर माडावर चढायचे. पण आता क्लाइंबिंग मशीनच्या सहाय्याने माडांवर चढणे सोपे बनले आहे आणि त्यात फार जोखीमही नसते. व्यावसायिक नसल्या तरी काही मुलीही क्लाइंबिंग मशीनच्या साह्याने माडावर चढतात हे मला ठाऊक आहे.
अगदी कालच कुडतरी गावातली एक मुलगी माझ्याकडे मार्गदर्शनासाठी आली होती. माडावर चढण्यासाठी ती उत्सुक होती. प्रयत्न केल्यास आपण माडावर चढू शकतो हा विश्वास तिच्याकडे होता.
माड हे आम्हा गोमंतकीयांचे एक ओळख-चिन्ह आहे. प्रत्येकाला आपल्या जेवणात नारळ आवश्यक असतो. शक्य असेल त्याप्रमाणे आपल्या घरासमोर प्रत्येकाने माड लावावेत. त्यावर स्वतः चढणे शक्य झाल्यास हे माड नक्कीच अनेक प्रकारे आपल्या उपयोगाचे ठरू शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.