

श्यामकांत नाईक
एकेकाळी गोव्याचा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या ह्या व्यवसायात आता मोजकेच लोक राहिले आहेत. प्रकाश धाकलो शेटकर हे त्यापैकी एक आहेत. मातीकामाचा आपला पारंपरिक व्यवसाय ते आजही जोपासत आहेत.
गेली चाळीस वर्षे ते करत असलेल्या या त्यांच्या व्यवसायात त्यांची पत्नी व मुले त्यांना साथ देत असतात. ज्या घुमट वाद्याच्या तालावर गणेश चतुर्थी उत्साहाने साजरी होते, त्या वाद्यासाठी लागणारी विशिष्ट मडकी तयार करण्यात त्यांचा हातखंडा आहे.
प्रकाशचे वडील पूर्वी या व्यवसायात होते. लहान असताना त्यांना प्रकाश या कामात सहकार्य करीत असे. लहानपणापासून या व्यवसायात असल्याने, वीज खात्यात नोकरी करत असतनाही आवडीमुळे ते या व्यवसायाशी जुळून राहिले. वीज खात्यातून निवृत्त झाल्यानंतर आता त्यांनी या कामाला आपला पूर्ण वेळ दिला आहे.
मातीच्या वस्तू तयार करण्यासाठी बरीच मेहनत लागते. सर्वात प्रथम शेतातून माती आणावी लागते. ती अगदी बारीक करून तिचा गाळ करावा लागतो व नंतर त्यात पाणी मिसळून, तिची चिकण माती बनवून, तिला आकार देण्याचे अखेरचे काम करावे लागते.
या साऱ्या प्रक्रियेला बराच वेळ लागतो. या कामात लागत असलेल्या शारीरिक श्रमामुळे हे काम बरेच कष्टदायक बनते. या कारणामुळे बऱ्याच लोकांनी हा व्यवसाय सोडून दिला आहे. आता मोजकीच कुटुंबे आता या पारंपरिक व्यवसायात आहेत.
गणेश चतुर्थी जवळ येताच घुमट वाद्याला बरीच मागणी निर्माण होते. त्यामुळे या दिवसात इतर भांड्याबरोबर घुमट बनवण्यामध्ये प्रकाश शेटकर व्यस्त आहेत. राज्यातील वेगवेळ्या भागांतून घुमट खरेदी करण्यासाठी लोक खास शिरवई गावात येत असतात.
वर्षाला साधारणपणे १२५ ते १५० घुमटे ते बनवतात. अर्थात त्यावर चामडे मात्र ते चढवत नाहीत. गणेश चतुर्थीच्या काळात हिंदु बांधवांकडून घुमट अधिक संख्येने विकत घेतले जाते. त्याशिवाय कुंकळी येथील फेस्तात ख्रिश्चन बांधव ते विकत घेतात. जांबावली शिगमोत्सवातही त्यांची चांगली विक्री होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.