Goa Scandal: प्रश्‍न सरकारच्या चारित्र्याचा...

सेक्स स्कँडल असो-नसो, परंतु विवाहबाह्य संबंध व सत्तेचा गैरवापर, सत्तेचा माज आणि त्यातून होत असलेले महिलांचे शोषण हा मुद्दा जरूर गुंतला आहे.
 Goa Scandal
Goa ScandalDainik Gomantak

Goa Scandal गोव्यातील एका मंत्र्यांवर झालेल्या कथित सेक्स स्कँडलच्या आरोपांचा धुरळा बराच खाली बसला आहे. प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण काही दिवस लावून धरल्यानंतर ही आग काही दिवस धुमसत होती. कारण कॉंग्रेस कार्यकारिणीचे सदस्य गिरीश चोडणकर यांनी आरोपाचे पिल्लू सोडून तेथून काढता पाय घेतला.

यात सेक्स स्कँडल असो-नसो, परंतु विवाहबाह्य संबंध व सत्तेचा गैरवापर, सत्तेचा माज आणि त्यातून होत असलेले महिलांचे शोषण हा मुद्दा जरूर गुंतला आहे. कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षांनीही ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती.

परंतु चारित्र्यवान व्यक्ती मंत्री होण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. भाजपच्या मुख्यमंत्र्यांकडूनही लोकांनी काही अपेक्षा बाळगल्या होत्या. गिरीश चोडणकर यांनी अशाच आणखी एका आरोपावरून एका मंत्र्याला यापूर्वी धडा शिकविला आहे, परंतु त्यावेळी एक चित्रफीत प्रसिद्ध झाली होती.

त्यात गुंतलेल्या महिलेने तरी या प्रकरणातून अंग काढून घेतले व मंत्र्याला शुद्ध चारित्र्याचे प्रमाणपत्र दिले, तरी त्याचे मंत्रिपद भाजपला काढून घ्यावे लागले होते. त्यावेळी असे म्हणतात की, पक्षाच्या सुकाणू समितीने मंत्र्यांच्या राजीनाम्याचा आग्रह धरला होता.

सुकाणू समितीत पक्षाचे जुनेजाणते संघटन सदस्य आहेत. ते निवडून येत नसले तरी त्यांनी सरकारला योग्य मार्ग दाखवावा, अशी अपेक्षा असते. त्यानंतर भाजपने सदर मंत्र्याला उमेदवारी दिली होती, परंतु लोकांनी विशेषतः महिला मतदारांनी त्याला घरी पाठवले.

त्याही वेळी एका स्वतंत्र संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात मुरगाव मतदारसंघातील महिलांनी त्या मंत्र्याच्या विवाहबाह्य लैंगिक संबंधांबद्दल कानावर हात ठेवले होते. प्रबळ मंत्र्याविरोधात, सत्ताधारी आमदाराविरोधात गोव्यात तरी कोणी बोलण्याचे धाडस करीत नाहीत.

गोव्यात विरोधी पक्षांचे अस्तित्वही नगण्य आहे. त्यातील अनेक नेते सरकारला ‘मिळालेले’ आहेत. या परिस्थितीत सत्ताधारी नेत्यांची बऱ्याच प्रमाणात दंडशक्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोक बोलत नाहीत.

पणजीसारख्या सुशिक्षित मतदारसंघात खराब रस्त्यावर लोक अवाक्षर काढत नाहीत, तेथे पुरावे नसलेल्या प्रकरणात अनैतिकतेविरोधात बोलायला धैर्य लागते. हे धैर्य विरोधी राजकीय नेता दाखवू शकत नाही, तेथे सर्वसामान्य माणूस ते कोठून गोळा करणार?

त्याशिवाय गोव्याच्या जनमानसाचीही राजकीय विभागणी कधीच झाली आहे. मंत्र्याच्या पाठीराख्यांनी निर्लज्जपणे ज्या पद्धतीने पत्रकार परिषदा घेण्याचा सपाटा चालवला व महिलांच्या अब्रू रक्षणाचा मुद्दा करीत एका नामांकित गायिकेनेही आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला.

वास्तविक तिने या प्रश्‍नात नाक खुपसलेले अनेकांना आवडलेले नाही. महिलांच्या प्रश्‍नावर या गायिकेने कधी आवाज उठविलेला नाही. पत्नीचे समर्थन करण्यासाठी कथित पीडितेचा नवरा ज्या पद्धतीने सामोरे आला, तो प्रकारही तुच्छतेचा विषय झाला.

मंत्र्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत थांबावे लागते. नवरा म्हणाला, माझ्या बायकोला उशीर झाला तर कार्यालयाची गाडी घरी सोडायला येईल आणि मंत्र्यानेसुद्धा म्हटले, तो स्वतःही कधी-कधी तिला घरी सोडायला येईल. शिवाय या नवऱ्याने मंत्र्याची तुलना देव दामोदराशी केली.

गोव्यात अनेक मंत्री देवाहूनही थोर झाले आहेत. त्यांच्या काही पाठीराख्यांना ते देवासमान वाटतात. देशात अनेक साधू आणि तथाकथित संतपुरुषांनी स्वतः देव बनून आपल्या भक्त महिलांचे केलेले शोषण सतत गाजत असते. हे संत किंवा उच्चपदस्थ देवाप्रमाणे वागतात तेव्हा ठीक.

परंतु त्यांच्यातील वासना कधी चाळवेल व देव पुरुषांच्या डोक्यावर कधी दानव किंवा सैतान स्वार होईल, ते सांगणे कठीण. म्हणूनच आजच्या युगातील देव पुरुषांचेही वर्तन साधनशुचितेच्या कसोटीवर तपासले गेले पाहिजे.

दुर्दैवाने खासगी कार्यालयामध्ये ‘विशाखा समिती’ आहे, अशी कोणतीच व्यवस्था राजकीय यंत्रणेला निर्माण करता आलेली नाही. सरकारच्या विश्‍वासार्हतेचाही प्रश्‍न असतो. तो दिल्लीपासून गल्लीपर्यंत डळमळीत झालेला आपण पाहतो. त्यामुळेच अनेक मंत्री विवाहबाह्य संबंधामुळे किंवा त्यांच्या चारित्र्यामुळे जनतेच्या तुच्छतेचा विषय ठरले आहेत.

सार्वजनिक जीवनात अशी अनैतिकता उफाळली असली व महिलांना भोगवस्तू म्हणून वापरण्याची बलाढ्यांची मानसिकता कमी झालेली नसली, तरी अशा गोष्टी समाजाने कधी स्वीकारलेल्या नाहीत.

गेल्या आठवड्यात मंत्र्यांच्या ‘कामलीला’ चर्चेचा विषय बनल्या असतानाच गोव्यात किमान दोन चिमुरड्यांवर अत्याचार झाल्याची प्रकरणे समोर आली. शाळकरी मुलींवर अत्याचार झाल्याची प्रकरणे गोव्याला नवी नाहीत. पी.टी. शिक्षक किंवा स्विमिंग प्रशिक्षक मुलींकडे विकृत नजरेने बघतात, तेव्हा पालकांना धक्का बसतो.

परंतु अशी अत्यंत कमी प्रकरणे उघडकीस येतात. दुर्दैवाने या प्रकरणांना अद्याप चाप बसलेला नाही. गोव्यात राजकीय क्षेत्रात अनेक नेते बलशाली बनून सत्तेचा माज मिरवतात, तेव्हा महिलाच त्यांच्या पहिल्या भक्ष्य बनतात.

दयानंद नार्वेकर प्रकरण लोक अद्याप विसरलेले नाहीत. नार्वेकर त्यावेळी विधानसभेचे अध्यक्ष होते. विधानभवनाचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यांनी आपल्याच दालनात तात्पुरत्या कालावधीसाठी कामावर असलेल्या एका महिला-कर्मचाऱ्याला आपल्या वासनेचे बळी बनविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला.

त्यावेळचे अनेक तरुण मंत्री महिला कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या खात्यांतून आपल्या कार्यालयात बदलीवर आणत असत. गोव्यात त्या काळात कामलीलांची ही चर्चा जोरात होती. त्यामुळे पहिला पुरावा मिळताच त्या काळी विधानसभेच्या अध्यक्षांविरुद्ध मोठे आंदोलन उभे राहिले.

आजच्याप्रमाणे त्या काळीही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता. वृत्तपत्रांनी हे प्रकरण लावून धरले. त्या काळी ‘गोमन्तक’ने तर या लढ्याचे नेतृत्वच केले होते.

राजकीय नेते मूग गिळून गप्प बसतात, विरोधी नेते सरकारला सामील असतात आणि एकूणच राजकीय प्रवृत्तीबद्दल जनतेमध्ये संशय निर्माण होतो, तेव्हा-तेव्हा गोव्यातील प्रसारमाध्यमांनीच अशा प्रकरणांना वाचा फोडली आणि ती धसास लावण्यासाठी जिकिरीने लढा दिला.

त्यामुळे गिरीश चोडणकर यांनी आरोप करून काढता पाय घेतला - वृत्तप्रतिनिधींचे फोन घेणेही बंद केले - त्यानंतर कित्येक दिवस वृत्तपत्रे या बातम्यांना उजाळा देत होती. समाज कार्यकर्त्या तारा केरकर या एकट्याच आझाद मैदानावर येऊन आरोपांच्या फैरी झाडत होत्या.

परंतु त्यांच्या समर्थनार्थ इतर संघटना उतरल्या नाहीत की राजकीय पक्षांच्या महिला नेत्यांनी आझाद मैदानावर येऊन त्यांचे समर्थन केले नाही. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा, असा आवाज घुमणे आवश्यक होते.

समाजमाध्यमांवर ज्या प्रकारे या मंत्र्यांची महिलांबरोबरची छायाचित्रे प्रसिद्ध झाली, ती योग्य होती का, हा प्रश्‍नसुद्धा समोर आला. समाजमाध्यमे अनेकदा सभ्यतेच्या मर्यादा ओलांडतात. अनेकजण सूडबुद्धीने, वैयक्तिक आकसातून किंवा राजकीय हेव्यादाव्यातून दुसऱ्यांवर चिखलफेक करण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करीत आले आहेत.

एकेकाळी देशात अशा पीतपत्रकारितेला उधाण आले होते. युरोप-अमेरिकेत अजूनही अशा वृत्तपत्रांना मागणी आहे, परंतु त्यांनी भल्याभल्या नेत्यांचे मुखवटे ओढून-पिंजून काढले आहेत.

त्यामुळे त्यांचा एक दरारा आहे. गोव्यात समाजमाध्यमांनी बऱ्याचदा आपली पायरी सोडून चिखलफेक करण्याचे तंत्र विकसित केले असले तरी हासुद्धा एक जबरदस्त दबावगट आहे.

येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे भल्या भल्या लोकांनी मंत्र्याची या महिलेबरोबरची छायाचित्रे पुढे पाठवली. मंत्री त्या महिलेच्या खांद्यावर हात टाकतो, तिला खेटून उभा आहे हा प्रकार विचित्र वाटला.

सरकारमधील नेत्याने या प्रकरणात मंत्र्याला का बरे खडसावले नाही? त्यामुळे नेते करू शकले नाहीत ते काम समाजमाध्यमांनी केले, अशी भावना गोव्यात आहे. समाजाचीही विचित्र मानसिकता आहे. सत्तेला निकट जाऊन असली भलीबुरी कामे करून घेण्याची लोकांची मानसिकता बनली आहे.

महत्त्वाकांक्षी महिलांना त्यात काही वावगे वाटत नाही, परंतु त्यातून सुक्याबरोबर ओलेही जळते. साऱ्याच महिलांचे शोषण करण्याचा आपल्याला अधिकार आहे असा काही उच्चपदस्थांनी समज करून घेतला आहे. मंत्र्यांना तर तो आपला अधिकारच वाटतो.

नेत्यांविरुद्ध राजकीय टीकाटिप्पणी केलेल्यांवर ताबडतोब कारवाई होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांच्याविरोधात केलेली टीका सहन न होऊन पोलिसांनी असे अनेक गुन्हे दाखल केलेले आहेत. परंतु सायबर गुन्हे विभाग किती सक्षम आहे?

मंत्र्यांविरोधात सतत चालू असलेली मोहीम त्याची छायाचित्रे मिळवून ती समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करणे, आदी प्रकार भाजपच्या अंतर्गत राजकारणाचाच भाग असल्याचा आरोप होतो. गोवा सरकारातच सध्या अनेक तट पडले आहेत.

अनेक मंत्र्यांच्या वर्तनाला धरबंध राहिलेला नाही. त्यामुळे सरकारची विश्‍वासार्हता धोक्यात येते. वास्तविक सदर मंत्र्यांविरुद्ध होणाऱ्या आरोपांची ताबडतोब चौकशी होणे जरुरीचे होते.

हा प्रश्‍न सरकारच्या चारित्र्याशीही गुंतला आहे. सत्तेचा गैरवापर हा मुद्दासुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे, मुख्यमंत्र्यांनी त्यावर कठोर होणे आवश्यक आहे.

अमेरिका हा मोकळा-ढाकळा व महिला संबंधांबाबत खूपच ‘पुढारलेला’ देश आहे असे आपण ऐकतो, परंतु मंत्री किंवा अध्यक्षांच्या खाजगी जीवनातही त्याने साधनशुचिता, पावित्र्य राखले पाहिजे, आपल्या पत्नीशी ‘पतिधर्म’ पाळला पाहिजे अशी समाज अपेक्षा बाळगतो व राजकारणात त्या गोष्टींना कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे.

याचा दाखला म्हणून अमेरिकेत अजूनही २० वर्षांपूर्वीच्या क्लिंटन-मोनिका लॅविन्स्की प्रकरणाकडे बोट दाखवले जाते. ही २१ वर्षांची नवखी कॉलेजातून बाहेर पडलेली मुलगी बिल क्लिंटनच्या कार्यालयात इंटर्न म्हणून लागली होती.

तिथे दोन वर्षे तिचे ‘प्रेमप्रकरण’ अमेरिकी अध्यक्षांबरोबर चालले व या स्कँडलमुळे क्लिंटन यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द संपलीच नाही तर त्याला अभूतपूर्व अशा अध्यक्षांवरील न्यायालयीन खटल्याला तोंड द्यावे लागले. आणखीही महिलांनी क्लिटंनविरोधात लैंगिक छळाचे आरोप केले.

‘‘सत्तेच्या माजातून आपला छानशौकीपणा जोपासणारा अध्यक्ष, त्यात त्याने आपल्या मैत्रिणींनाच ओढले असे नाही तर सत्तेच्या वापरातून अनेकांवर जाळे टाकून त्यांच्यावर स्वतःला लादले, त्यांची लैंगिक पिळवणूक केली’’, असे मत ‘टाईम’ मासिकाने क्लिंटनविरोधात नोंदविले आहे.

क्लिंटनने आपल्या अध्यक्षीय निवडणुकीत निधी देणाऱ्या एका महिलेलाही वासनेचा शिकार बनविले होते. तो कोणालाच सोडत नसे.

अमेरिकी अध्यक्ष त्याच्या खाजगी जीवनात कसा वागतो, हे या देशाच्या नागरिकांना का सोयरसुतक असावे, असाही क्लिंटन यांचा दावा होता, जो लोकांनी कधी मान्य केला नाही. या बदफैली वागणुकीसह अमेरिकेत सार्वजनिक पातळीवर मोठी चर्चा झाली.

प्रसारमाध्यमांनी त्यात जोरदार भूमिका निभावली. शेवटी साक्षीपुराव्याच्या आधारे या प्रकरणाच्या मुळाशी गुप्तचर यंत्रणा गेली तेव्हा क्लिंटनना आपण लॅविन्स्कीबरोबर अयोग्य (सलगी) निकटचे संबंध जोडले होते हे मान्य करावे लागले. हे संंबंध अयोग्य होते किंबहुना हे चुकीचे संबंध होते’’, असे क्लिंटन म्हणाला. क्लिंटनना त्याबद्दल नामुष्कीप्रत दोषी निश्‍चित करण्यात आले.

एक काळ असा होता, कॉंग्रेस पक्षाकडे लोकांची मते खेचून घेण्याची ताकद होती. त्यामुळे त्या पक्षाच्या आडोशाला असे अनेक ताकदवान व नतद्रष्ट नेतेही आले. पक्ष प्रभावी बनतो व सतत सत्तेवर राहतो, तेव्हा गुळाच्या ढेपेला मुंगळे डसावेत, तशा भल्याबुऱ्या प्रवृत्ती सत्ताधारी पक्षाला चिकटत असतात.

 Goa Scandal
Porvorim Fatal Accident: राज्याला अपघातांचे ग्रहण! पर्वरीत भरधाव कारने घेतला तिघांचा बळी; दोघांची प्रकृती गंभीर

सत्ताधारी भाजपवर गेल्या काही वर्षांत असे कितीतरी आरोप झाले आहेत. लैंगिक लांच्छन लागलेल्या एका मंत्र्याला पक्षाची उमेदवारी देऊनही लोकांनी घरी पाठविले. आणखी काही मंत्र्यांवर आणि राजपुत्रांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत.

त्याला न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. या मंत्र्यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीत केलेले वक्तव्य पणजीकर अजून विसरलेले नाहीत. हा जिंकून आला तर पणजीतील महिलांना रस्त्यावर मोकळे हिंडणे मुश्कील होईल. त्यानंतर मांडवी पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.

पणजीतील एका सायबर कॅफेमध्ये तरुण निष्पाप मुलींचे शोषण होत असल्याच्या एका प्रकरणाचा २० वर्षांपूर्वी बराच गाजावाजा झाला होता. त्यात एक नेता, एक विधिज्ञ व त्यांचे काही बगलबच्चे सामील असल्याची चर्चा झाली होती.

परंतु पुढे काही घडले नाही, भाजपचेच नेते हा प्रश्‍न धसास लावतील, अशा समजुतीत असतानाच लोकांना पुढे सतत राजकीय धक्के बसत गेले. कारण ज्यांच्यावर संशय घेतला जात होता, तेच सरकारात सामील होत गेले आणि उच्चपदस्थांच्या मांडीला मांडी लावून बसू लागले.

सरकारच्या निर्णयप्रक्रियेचा भाग बनले. त्यावेळी समाजमाध्यमे आजच्यासारखी प्रखर नव्हती, परंतु या संशयितांची होत असलेली उठबस हा चेष्टेचा विषय झाला होता.

 Goa Scandal
Sudin Dhavalikar: शापूर - चिरपुटेसाठी भुयारी मार्ग, जनतेच्या मागणी प्रतिसाद

सत्ताधारी भाजपचे वैशिष्ट्य म्हणजे या पक्षाचा महिला विभागही दणकट आहे. जे कॉंग्रेसला जमले नाही, ते भाजपने करून दाखविले, याचे कारण अनेक उच्चभ्रू महिलांना या पक्षाची दारे उघडी झाली.

आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग दिसला, कारण या पक्षात चारित्र्यवान नेते आहेत आणि रक्षाबंधनाला ते केवळ राख्या बांधून घेत नाहीत, वैयक्तिक जीवनातही त्यांचे चारित्र्य संशयातीत आहे, असा विश्‍वास महिलांना वाटत होता.

आज त्याच भाजपकडे पाहिले तर राजकीय निरीक्षकांना धक्का बसेल एवढा तो बदललेला आहे. पणजीचेच उदाहरण द्यायचे झाल्यास अनेक प्रामाणिक महिलांनी घरी बसणे पसंत केले आहे.

 Goa Scandal
Goa Crime: गुन्हेगारीविरुद्ध आमदार विजय सरदेसाईंनी सुचवला मुख्यमंत्र्यांना चारसूत्री उपाय

भाजपच्या एका ज्येष्ठ, अभ्यासू संघटनात्मक नेत्याकडे मी बोलत होतो. तो म्हणतो आम्हाला सकाळचे वृत्तपत्र न्याहाळताना कधी-कधी शरमेने मान झुकवावी लागते. कारण कोणत्या नेत्याच्या काय उचापती प्रसिद्ध होतील, याची शाश्‍वती नसते.

परंतु नेत्यांना आणि पक्षश्रेष्ठींनाही कोणाचे चारित्र्य किंवा सचोटीचे पडलेले नाही. पक्षातील नेते म्हणतात, आता पक्ष वाढतो आहे, तसे निरनिराळे घटक प्रवेश करणारच. अडवाणी-वाजपेयींचा पक्ष आता राहिलेला नाही. दुर्दैवाने नवा भाजप बाहेरून आलेल्या ताज्या दमाच्या नेत्यांनी ताब्यात घेतल्यात जमा आहे.

केंद्रीय नेत्यांनाही कायमचे सत्तेवर राहण्याची खुमखुमी असल्याने अशा साऱ्या संशयास्पद चारित्र्याच्या नेत्यापुढे गालिचे टाकणे सुरू आहे. सत्ता आली की माणूस ‘पतीत’ होतो, हे म. गांधींचे भविष्य सध्या खरे करून दाखविण्याचा सपाटाच साऱ्या सत्ताधीशांनी चालविला आहे

गांधींना न मानणाऱ्या पक्षानेदेखील गांधींना खरे करून दाखविण्याचा चंग बांधला आहे. सत्तेचा महिलांवरील अत्याचार आणि अबलांचे शोषण हा सध्या राजसत्तेचा दिमाख दाखविण्याचाच प्रकार ठरतोय!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com