...तर गोमंतकीय मुलींचे खूनच होतील

हळदोणे येथील तरूणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी कळंगुट पोलिसांनी कोणत्याही दबावाखाली न येता करावी, असा आग्रह ‘गोमन्‍तक’ने याच स्तंभातून धरला होता.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पोलिसांच्या चौकशीविषयी नागरिकांना काय वाटते, याचा प्रत्यय सोमवारच्या मेणबत्ती मोर्चाने दिला आहे. आपल्या संथगतीच्या आणि एकतर्फी अन्वेषणामुळे आपण आम जनतेच्या नजरेत गुन्हेगार ठरत आहोत, याचे भान कळंगुट पोलिसांना अजूनही येत नाही, हे दुर्दैव.

या प्रकरणातल्या बऱ्याच गोष्टी तर्कबुद्धीला पटत नाहीत. आपली जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय सदर अभागी मुलीने घेतला असेल, तर मग अंगावरील वस्त्रे उतरवण्याची आवश्यकता काय? असा प्रश्न ‘गोमन्‍तक’ने याआधीही केला होता आणि तो अद्याप अनुत्तरीत आहे. कळंगुट पोलिस जर आत्महत्येकडे निर्देश करत असतील, तर मग तिच्या कपड्यांचे गूढ त्यांनी उकलायला हवे. तिची मनःस्थिती अस्‍थिर होती, असे आता सांगितले जात आहे. त्याला कोणताही पुरावा नाही आणि तिला आपण पाहिल्याचे जो बसवाहक सांगतो त्यानेही या विधानाला पुष्टी दिलेली नाही. या वाहकाला त्याचा मालक लगोलग नोकरीवरून काढून टाकतो, हीदेखील अस्वस्थ करणारी घटना आहे. हा पोलिसांच्या चौकशी करण्याच्या पद्धतीवरील अविश्वास की कोणाची तरी भीती, याचा शोध पोलिसांनी घ्यायलाच हवा. एरवी कायदा- सुव्यवस्थेच्या रक्षणात कुणी नागरिकाने आपली भूमिका पार पाडल्याच्या कारणास्तव जर त्याच्या रोजगारावर गदा आणली जात असेल, तर तो अक्षम्य गुन्हाच ठरतो.

Goa Crime News
Murder Case: बस कंडक्टरला माहिती देणे पडले महाग!

‘आपले प्रेतच तुमच्या नजरेस पडेल’ असे मयत मुलीने आपल्या वडिलांना सांगितल्याची जबानी पोलिसांकडे असल्याचे आता सांगण्यात येते. या कथनात तथ्य असेल, तर तिला अपमृत्यूकडे नेणारी काही कारणपरंपरा असल्याचेच त्यातून सिद्ध होते. ऐन उमेदीतल्या या तरुण मुलीवर कोणता दबाव होता? तिला वाममार्गाकडे नेण्याचा यत्न कुणीतरी ब्लॅकमेलिंगचे तंत्र वापरून करत नव्हता ना? विवस्त्रावस्थेतील तिचा मृतदेह ब्लॅकमेलिंगकडेही निर्देश करतो आणि तिच्या वस्त्रांचे गूढही. त्या मुलीचे कथित भाष्य म्हणजे आत्महत्‍येचे सूतोवाच, असा सोयीस्कर समज पोलिस का करून घेताहेत, हेच कळत नाही. तिच्या गायब होण्याच्या आणि तिचा मृतदेह सापडण्याच्या कालावधीत ती कुठे गेली होती, याचा ढोबळ का होईना, अंदाज पोलिसांना आलेला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजवरून बरीच माहिती उपलब्‍ध होण्याची शक्यता आहे. पण, यासाठी कष्ट घेण्याची तयारी कळंगुट पोलिसांकडे आहे, असे दिसत नाही.

वाऱ्यावर काहीबाही पुड्या सोडून देण्याकडचा कल मात्र लपून राहात नाही. हे व्यावसायिक अपयश डोळ्यांत खुपणारे आहे. कळंगुटसारख्या आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या क्षेत्रावर नियंत्रण असलेल्या पोलिस स्थानकात अव्वल दर्जाचे कर्मचारी असणे आवश्यक आहे. तिथे वशिल्याची तट्टें नेमली तर अपयशाचे पाढेच वाचले जातील. एरवीही येथील नियुक्त्या पाहाता व्यावसायिक कौशल्यापेक्षा हप्तेवसुलीतले आणि सत्ताधाऱ्यांचे उष्टे झेलण्याचे कौशल्य हाच निकष आहे की काय? अशी शंका येते. अशावेळी पोलिस प्रशिक्षणाच्या नावाने वाळपई प्रशिक्षण केंद्रात काय दिवे लावले जातात आणि नाशिकसारख्या परगावात प्रशिक्षणासाठी गेलेले कोणते कौशल्य आत्मसात करतात, असा प्रश्न पडतो. लोकांना हवी तितकी बोंब मारू द्यात, आमचे गॉडफादर पाठीशी असल्यामुळे कोणाचीच भीती नाही, अशाच अविर्भावात कळंगुटचे पोलिस अधिकारी आताही वावरताना दिसतात.

Goa Crime News
Murder Case: हा तर नियोजित हल्ला? कुटुंबियांना ‘पोस्टमॉर्टम रिपोर्ट’ का दिला नाही?

बाणावली पाठोपाठ घडलेल्या या प्रकरणाने गोव्यातील महिलावर्गाची असुरक्षितता अधोरेखित झालेली आहे. ‘बायलांचो साद’सारख्या संघटनानी लावून धरलेला हा मुद्दा आता संपूर्ण गोव्याने उचलून धरायला हवा. आज जे अभागी सिद्धीच्या वाट्याला आले ते भविष्यात कुणाही मुलीच्या वाट्याला येऊ शकते, हे ओळखून समाजातून अशा तीव्र प्रतिक्रिया यायला हव्यात की, प्रशासनाला त्यांची दखल घ्यावीच लागेल. एखाद्या तरुणीने एकट्याने गोव्यात फिरणे धोक्याचे होतेच, तिने आपल्या मित्रासोबतही फिरणेही आता प्राणघातक ठरू शकते. युगुलांना वाटेत गाठून लुटण्याचे आणि तरुणींचा विनयभंग करण्याचे प्रकार गोव्यात वरचेवर घडत आहेत, फक्त लोकलज्जेस्तव त्यांचा भब्रा होत नाही आणि पोलिसांपर्यंत तक्रारी जात नाहीत. पण, याचा अर्थ असा नव्हे की, पोलिसांना या प्रकारांची कल्पना नाही. अशा स्तरापर्यंत तरुणांची टोळकी जातात.

याचे कारण पोलिस यंत्रणेचा दरारा आणि वचक राहिलेला नाही, असे आम्ही याच स्तंभातून याआधीही म्हटले होते. या संदर्भात ‘बायलांचो साद’च्या एका कार्यकर्त्या महिलेला आलेला विदारक अनुभव येथे कथन करणे क्रमप्राप्त ठरते. गावगुंडांच्या छेडछाडीला कंटाळून तिने जेव्हा पोलिसांत धाव घेतली, तेव्हा तिच्या तक्रारीकडे नेहमीच्या पोलिसा खाक्याला अनुसरून दुर्लक्ष करण्यात आले. ती पोलिसांत गेल्याचे कळताच चेव चढलेल्या टोळक्याने तिला वाटेत अडवून तिचा विनयभंग केला आणि तिचे पैसे लांबवले. पुन्हा जेव्हा ती पोलिसांत गेली, तेव्हा तीच गुन्हेगार असल्यासारखे पोलिसांचे वर्तन होते. मुलीला सोबत घेऊन आरोपींच्या घरी जाण्याचा पराक्रमही पोलिसांनी केला. अन्वेषणाची ही पद्धती गुन्हेगारांना अभय देणारी की निरपराध नागरिकांना सुळावर चढवणारी? या पोलिसी कृत्यामागे विकृती आहे की, सरळ सरळ गुन्हेगारांशी केलेली हातमिळवणी? हीच मानसिकता जर पोलिसांत पसरत असेल, तर मग तीच्यासारख्या अनेक निष्पाप गोमंतकीय मुलींचे खूनच पडतील आणि ती आत्महत्येची प्रकरणे म्हणून फाईलबंद होतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com