Gol Gumbaz Bijapur - Vijapur: गोलघुमट व ‘बिजली पत्थर’

आदिलशाही घराण्याने उत्कृष्ट इस्लामी इमारतींचा वारसा जपला, ज्यात दख्खन शैलीतील गोलघुमट असलेल्या थडग्याचा समावेश आहे.
Gol Gumbaz Bijapur - Vijapur
Gol Gumbaz Bijapur - VijapurDainik Gomantak

सर्वेश बोरकर

बिजापूर ज्याला विजापूरदेखील म्हणतात हे भारतातील प्रारंभिक मुस्लीम काळापासून इस्लामिक वास्तुकलेचे प्रमुख ठिकाण होते. इ.स. १२९४पर्यंत जेव्हा हे शहर बहमनी सल्तनतची प्रांतीय राजधानी बनले व पुढे इ.स १४८९मध्ये युसूफ आदिलशाह पहिला याच्या आगमनाने आदिलशाही सुलतानाच्या वर्चस्वात गोव्याचा समावेश झाला व तिथे गोव्यात शाही नौदल ठेवण्यात आले.

आदिलशाही घराण्याने उत्कृष्ट इस्लामी इमारतींचा वारसा जपला, ज्यात दख्खन शैलीतील गोलघुमट असलेल्या थडग्याचा समावेश आहे. विजापूर येथे स्थित गोलघुमट हे सर्वांत प्रसिद्ध स्मारकांपैकी एक. या भव्य वास्तूमध्ये ४४ मीटर किंवा १४४ फूट व्यासाचा जगातील दुसरा सर्वांत मोठा घुमट आहे.

इथे अशी रचना केली आहे की विशाल घुमटाच्या आत सुमारे ३७ मीटर अंतरावर एक मंद कुजबुज, टाळ्या किंवा अगदी कागदाचा खडखडाटसुद्धा ऐकू येतो आणि हाच आवाज सात वेळा प्रतिध्वनीत होतो.

मोहम्मद आदिलशाह (इ.स १६२७- इ.स १६५६) यांनी बांधलेल्या गोलघुमटाचे काम त्याच्या हयातीत पूर्ण होऊ शकले नाही. कारण ते मोहम्मद आदिल शाहच्या शेवटच्या काही वर्षांत हाती घेण्यात आले होते.

गोलघुमटाचे बांधकाम हाती घेतल्यानंतर वीस वर्षांनी इ स १६५९मध्ये बांधकाम थांबवण्यात आले. तथापि, अनेक दंतकथा आणि आख्यायिकांचा विषय असलेल्या गोलघुमटाला एक असामान्य पैलू आहे, ज्याकडे सामान्यतः स्थानिक लोक आणि स्मारकाला भेट देणारे लाखो पर्यटक दुर्लक्ष करतात.

गोलघुमटाबद्दलच्या अनेक प्रचलित आख्यायिकांपैकी एक अशी आहे की मुहम्मद आदिलशाहने पाठलाग करून विजेचा एक उल्कापिंड पकडला जो स्मारकापासून थोड्या अंतरावर आदळला होता.

मुहम्मद आदिलशाह यांना विश्वास होता की उल्कापिंड किंवा सिडिलू राज्याला आणखी विस्तारण्यास मदत करेल व भाग्य मिळवून देईल या आशेने त्याने गोल घुमटासमोर उल्कापिंडाचा तुकडा टांगला.

स्मारकाच्या दर्शनी भागात सुशोभितपणे टांगलेल्या आजही विजेचा हा उल्कापिंड पाहायला मिळतो. दर्शनी भागाचे बारकाईने निरीक्षण केले तरच दिसत असल्याने, या खडकाचे परीक्षण करणाऱ्या इतिहासकारांनी आणि पुरातत्त्व शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की हा उल्कापिंडाचा तुकडा आहे जो विजापूरच्या हद्दीत पडला होता.

या उल्कापिंडाचे रूपांतर ’वीज’ मध्ये कसे झाले याबद्दल स्थानिक आख्यायिका अशी आहे की, ज्या गावात गोल घुमट बांधला जात होता तिथे एक उल्कापिंड कोसळला. ही बातमी कळताच, गोल घुमट बांधणारे मोहम्मद आदिल शाह हे स्वतःहून एका भव्य मिरवणुकीतून उल्कापिंडाचा तुकडा आणण्यासाठी घटनास्थळी गेले.

ज्योतिषशास्त्रावर दृढ विश्वास ठेवणारे, मोहम्मद आदिल शाह यांना वाटले की हा एक शुभशकून आहे आणि जर तो उल्कापिंड सुरक्षितपणे जतन केला गेला तर त्यांचे राज्य आणखी विस्तारण्यास मदत होईल. त्यामुळे त्याने उल्कापिंड आणून गोल घुमटच्या दर्शनी भागावर टांगला.

Gol Gumbaz Bijapur - Vijapur
Banastarim Bridge Accident: खाकी वर्दीनंतर आता गोव्याच्या प्रतिष्ठेलाही काळिमा

त्याच्या ज्योतिष्यांनी त्याला असेही सांगितले की हा खडक त्याला त्याच्या राज्याचा विस्तार करण्यास आणि विजापूरला अधिक समृद्धीकडे नेण्यास मदत करेल. तथापि, ज्योतिष्यांनी त्याला इशारा दिला की जर त्याचे व विजापूरचे भवितव्य समृद्ध ठेवायचे असेल तर खडक काळजीपूर्वक जतन करावा लागेल.

मुहम्मद आदिल शाहने मग तो उल्कापिंड शुभशकून म्हणून वापरायचे आणि गोल घुमटाच्या दर्शनी भागावर टांगायचे ठरवले.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुहम्मद आदिल शाहने खडक (ज्याला ‘बिजली पत्थर’ असेही म्हणतात) आणून दक्षिण दरवाजावर किंवा गोल घुमटाच्या मुख्य प्रवेशद्वारावर टांगल्यानंतर लगेचच मुघल सम्राट शहाजहानने अधिकृतपणे राज्याचा शासक म्हणून मान्यता दिली व मुहम्मद आदिल शाहला केम्पे गौडा यांचा पराभव करण्यात यश आले.

बंगळूर आणि जिंजीचा नायक ज्यांच्याकडून त्याने प्रचंड लूट जप्त केली व शहरालाही वेठीस धरण्यात यश आले, तसेच मुहम्मद आदिल शाहने मुघलांशी युती करण्यावरही शिक्कामोर्तब केले.

पुढे जेव्हा मुघल सम्राट औरंगजेबाने आदिल शाही राज्य इ. स १६६८ मध्ये विलीन केले व मुघल आणि मराठे विजापूरवर ताबा मिळवण्यासाठी युद्ध करत होते,तेव्हा आदिल शाही घराण्याच्या ग्रहणानंतर उल्कापिंडदेखील जवळजवळ विस्मृतीत गेला.

Gol Gumbaz Bijapur - Vijapur
जरा विसावू या वळणावर...

तथापि कालांतराने हेन्री कोसेन्स (इ.स १८५४ - इ.स १९३३) इकडचे ब्रिटिश अधिकारी बनले, ज्यांनी पश्चिम भारताचे मुख्य पुरातत्त्व अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांनी इ.स. १८९१मध्ये गोल घुमटाचा सिडलू किंवा बिजली पत्थर पुन्हा शोधला आणि त्यांची नोंदणी केली.

कोसेन्सने त्यांच्या विजापूर शहराचे अवशेष या पुस्तकात विजापूर आणि तेथील स्मारकांचे वर्णन केले आहे. मे १८९१मध्ये याकूत महालमधील संग्रहालयाचे आयोजन करण्यासाठी कोसेन्सने प्रथमच विजापूरला भेट दिली.

तथापि, इ.स १८९६मध्येच कोसेन्सने त्यांच्या विजापूर शहराचे अवशेष मध्ये विजापूरमधील गोल घुमट येथे उल्कापिंड पुन्हा शोधण्याविषयी सांगितले आहे.

त्याने या खडकाचे परीक्षण केले आणि म्हणाले, हा बिजली पत्थर किंवा उल्कापिंड एक दुर्मीळ खडकांचा तुकडा आहे आणि ज्यांच्याकडे तो आहे त्यांना राज्य आणखी विस्तारण्यास मदत होईल असा विश्वास असल्यामुळेच मोहम्मद आदिल शाहने गोल घुमटासमोर आणून लटकवले असावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com