‘डोडो’ परत येईल का?

माणसाच्या नैसर्गिक परिसरावरील आक्रमणामुळे किंवा होऊ घातलेल्या बदलांमुळे गेल्या शतकार्धापासून हजारो जीवजाती कायमच्या नष्ट झाल्या आहेत व हजारो नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
Dodo
DodoDainik Gomantak
Published on
Updated on

कमलाकर द. साधले

‘ज्युरेसिक पार्क’ हा पहिला गाजलेला चित्रपट ६० लक्ष वर्षांपूर्वी समूळ नाहीशा झालेल्या महाकाय सरड्यांच्या जगात प्रेक्षकाला घेऊन जातो. त्यातील वैज्ञानिक या सरड्यांची पुनर्निर्मिती करण्यासाठी एक कल्पनारंजक घटना पेश करतो.

६० लक्ष वर्षांपूर्वी एक डास डायनासोरला चावून एका झाडावर बसतो. झाडाच्या बाहेरील सालीला झालेल्या जखमेतून डिंक वाहत येतो आणि त्यात तो डास पूर्णपणे बुडून जातो. निसर्गाच्या लक्षावधी उलथापालथीतून तो डिंकाचा गोळा व त्यात अडकलेला डास तसाच राहतो. तो गोळा त्या वैज्ञानिकाला सापडतो.

त्या डासाच्या शरीरात साठविलेल्या रक्तातील डायनासोरचे जनुक अजून स्थिर असावे आणि त्याचे क्लोनिंग करून जिवंत डायनासोरची निर्मिती अशी ही वैज्ञानिक कविकल्पना. अशा अनेक कल्पनारंजक गोष्टी विज्ञानकथांतून वाचायला मिळतात.

प्रयोगशाळेतून बनविलेली जिवंत मेंढीपासून कृत्रिम जीवनिर्मिती हा विज्ञानाचा नवा वास्तव अध्याय, चंद्राची सफर केलेला, अंतरिक्षात तरंगण्याचे प्रात्यक्षिक करून आलेला माणूस ही प्रत्यक्ष घडलेली जादूगरी आणि हजारो किलोमीटर अंतरावरील माणसाला आपण पाहिजे तेव्हा पाहू शकतो, त्याच्याशी बोलू शकतो.

यंत्रमानव, कृत्रिम बुद्धिमत्ता ही विज्ञानभवनातील एकामागोमाग एक अशी खोलली जाणारी नवनवी दालने डोळे दीपवून टाकतात. त्या प्रत्यक्ष अनुभवातून बनलेल्या विज्ञानश्रद्धेची अंधश्रद्धा कधी बनते हे कळतच नाही. तंत्रज्ञानातून काहीही अशक्य नाही अशी श्रद्धा. तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे असे मानूया. व्यवहार्य आहे का?

चंद्रावर माणूस जाऊन आला. पृथ्वीवर विनाशाची लाट आली म्हणून मानवजातीचे स्थलांतर चंद्रावर शक्य आहे का? तांत्रिक सुविधांमुळे माणसाचे आयुर्मान बरेच वाढले. पण माणूस अमर होईल का? बरेचसे रोग नियंत्रणाखाली आणले.

पण कधी नव्हते असे नवीन रोग आलेच ना? तांत्रिक प्रगतीतून सुखसोयींची रेलचेल झाली. माणूस सुखीसमाधानी झाला का? सुखांच्या संग्रहासाठी चाललेल्या घोडदौडीत जीवनानंद कुठे हरवला? खून, आत्महत्या, बलात्कार यांचे सत्र अमाप का वाढले?

पहिला मानवी तंत्रातून निर्माण केलेला प्राणी म्हणजे ‘डॉली’ हे नाव दिलेली मेंढी. या मेंढीच्या निर्मितीतील मूळ घटक म्हणजे संपूर्ण शरीर, त्याची जीवनप्रक्रिया याची पूर्ण सर्किट असलेला डीएनएधारक एक जनुक, याच्यापासून. हा जनुक निसर्गाने निर्माण केलेला. मोठ्या खटाटोपाने बनविलेली ही मेंढी.

निसर्गाच्या निर्मिती सत्रात कळपामध्ये सहजासहजी मेंढ्यांची निर्मिती होत असते. कुठल्यातरी व्यवस्थेशिवाय ती निसर्गात वाढते व नवीन मेढ्यांना जन्म देते. आपल्या जीवजातीचे सातत्य अविरत कायम राहते.

अशा असंख्य जीवजातींचे सातत्य अविरत चालू असते. हे तुटले किंवा या बुद्धिमान माणसाच्या करणीने तोडले गेले तर काय होते, याविषयी ‘डोडो’ पक्ष्याचे उदाहरण उद्बोधक ठरेल.

या पक्ष्याची जात केवळ मडागास्करजवळील मॉरिशस बेटावर होती. शहामृगाप्रमाणे छोटे पंख असलेला, उडता न येणारा, तीन फूट उंचीचा, वीस किलो वजनाचा मोठा जड पक्षी. त्याला तेथे शत्रू कोणी नव्हता. युरोपियन देशांच्या समुद्र मोहिमा निघाल्या तेव्हा डच व पोर्तुगीज तेथे पोहोचले. माणूस त्याचे क्रौर्य माहीत नसल्याने तो माणसापासून दूर पळून जात नव्हता.

पळून जाण्याची चपळाईही त्याच्याकडे नव्हती. कारण तेथील सृष्टिव्यवस्थेनुसार त्याला त्याची गरज नव्हती. तेथे आलेल्या जहाजांतील खलाशांना तो आयता मांसाहार मिळाला. त्यांनी त्यांची अनिर्बंध शिकार केली. त्याशिवाय या परकीय मनुष्यवस्तीबरोबर कुत्री, मांजरे, डुकरे उंदीर हे प्राणी आले.

त्यामुळे तेथील सृष्टिव्यवस्थेत त्यांची ढवळाढवळ सुरू झाली. डोडोंच्या अंड्यांचा फडशा पाडला जाऊ लागला. डोडो पूर्णपणे नामशेष झाला. शेवटचा डोडो १६८१मध्ये पहिल्याचा उल्लेख मिळतो. हा पक्षी नाहीसा होणे हा तेथील परिस्थितीकीवर (ईकोसिस्टिम) एक आघात होता. तेथील बऱ्याच फलवृक्षांच्या बीजांवरील प्रक्रिया व वितरण डोडोमार्फत होत होते.

Dodo
President Draupadi Murmu: राष्ट्रपतींच्या आगमनाने चैतन्य

ते थांबले. त्यामुळे डोडो नाहीसा झाल्यानंतर त्या जातीची नवीन रोपे उगवणे बंद झाले. त्यातून काही जीवजातींचा अधिवास नाहीसा झाला. स्थानविशिष्ट अशा निम्म्या फलवनस्पती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत; त्याबरोबर काही जीवजातीही.

कारण तेथील अन्नसाखळी विस्कटली गेली, अधिवासही विस्कटला गेला. त्याबरोबर काही जीवजातीही नष्ट होऊ लागल्या. तेथील सृष्टीवर तो एक मोठा आघात ठरला. विनाशाची एक साखळी प्रक्रिया सुरू झाली.

जनुकतंत्रज्ञांनी डोडोची पुनर्निर्मिती करता येईल का, याचा अभ्यास केला. त्यासाठी डोडोच्या शरीरातील पेशींची म्हणजे त्यातील डीएनए ज्यात जनुकांची रचना समाविष्ट असते, निदान त्यांची क्रमवारी पक्ष्याच्या अवशेषातून सुस्थितीत सापडेल का? ती सापडली आणि डॉली मेंढीप्रमाणे क्लोनिंग तंत्राने जिवंत डोडो पक्षी तयार केला तरी तो परिसरात टिकेल का, हा मोठा प्रश्‍न आहे.

Dodo
President Draupadi Murmu: राष्ट्रपतींकडून आझाद मैदानावरील स्मारकाला भेट; हुतात्म्यांना आदरांजली

तो प्रयोगशाळेत किंवा प्राणिसंग्रहालयात अत्यंत काळजी घेऊन टिकू शकला म्हणून खुल्या परिसरात टिकेल का? सर्कशीतील आणि प्राणिसंग्रहालयातील प्राणी व पक्षी खुल्या परिसरात टिकत नाहीत. पिल्लाला आईकडून हे शिक्षण मिळत असते. हे शिक्षण असलेले प्राणी व पक्षीसुद्धा बराच काळ पिंजऱ्यात राहिले की मूळ सवयी विसरतात.

शिवाय नर व मादी ही जोडी असल्याशिवाय प्रजावृद्धी होऊ शकत नाही. त्यानंतर मोठा प्रश्‍न येतो तो म्हणजे आज चारशे वर्षांनंंतर डोडोच्या अनुपस्थितीत बिघडलेला परिसर त्याला मानवेल का? आज अरण्याचा सराव असलेल्या चित्त्यांना नामीबियांतून भारतात आल्यानंतर येथील परिसर मानवला नाही.

बरे, ७५ वर्षांपूर्वी या परिसरात भारतीय चित्ता येथे राहत होता. त्यावेळीच हा परिसर बिघडल्यामुळे चित्ता नाहीसा झाला का, हाही एक प्रश्‍न उभा राहतो. परिसर बदलासंबंधात माणूस थोडा चिवट प्राणी आहे. तरीही धरणप्रकल्पातील विस्थापित आदिवासी लोकांना परिसर बदलामुळे केवढा त्रास सहन करावा लागतो! काहींचे जीवनच उद्ध्वस्त होते.

Dodo
Goa HIV Cases: चिंताजनक! गोव्यात 6 महिन्यांत 119 एचआयव्ही रूग्णांची नोंद; सर्वाधिक रूग्ण बार्देश तालुक्यात

माणसाच्या नैसर्गिक परिसरावरील आक्रमणामुळे किंवा होऊ घातलेल्या बदलांमुळे गेल्या शतकार्धापासून हजारो जीवजाती कायमच्या नष्ट झाल्या आहेत व हजारो नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे निसर्गाने रचलेले निरनिराळ्या जीवजाती, वनस्पती यांचे संतुलित प्रमाण बिघडले आहे. अन्नसाखळी विस्कटलेली आहे.

त्यामुळे वन्यपरिसर प्राणिमात्रांना पोसू शकत नाही. गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकापासून भारतभर अरण्यांतील पशू मानवी वस्तीत घुसण्याचे प्रमाण वाढत आहे. गोव्यातील गवे जंगलातून बाहेर पडून पाळी, उसगाव या गावांत उतरले. त्यानंतर आता खांडेपार नदी ओलांडून खांडेपार, कुर्टी, बेतोडा या गावांत घुसले आहेत.

कवळे, बांदिवडेपर्यंत पोहोचले आहेत. काळतोंडी वानरे फोंडा शहरातसुद्धा धुडगूस घालत आहेत. लालतोंडी माकडे, शेकरू, साळिंदर यांनी शेती बागायतीत उच्छाद मांडलेला आहे. ‘यावर उपाय नाही निघाला तर शेती बागायती सोडून द्यावी लागेल’, असे शेतकरी, बागायतदार उद्वेगाने बोलत आहेत.

अरण्यांतील जैव-असंतुलन हा केवळ पर्यावरणाचा विषय नाही. डोडो परत येणार नाही. आहेत ते प्राणी, वनस्पती अरण्ये आणि एकूण पर्यावरणीय संतुलन नको का सांभाळायला?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com