President Draupadi Murmu: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंगळवारी तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यासाठी राज्यात आगमन झाले. त्यांनी येथे आगमन करताच गोवा मुक्तिलढ्यात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना आझाद मैदानावर आदरांजली वाहिली. त्यानंतर त्या राष्ट्रपती झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात आल्याने त्यांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते राजभवनच्या दरबार हॉलमध्ये नागरी सत्कार करण्यात आला.
बुधवारी (ता.२३) सकाळी त्या गोवा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला हजर राहतील. तर सायंकाळी विधानसभेत आयोजित कार्यक्रमात लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करतील.
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मंगळवारी (ता.२२) सायंकाळी राज्यात आगमन झाले. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी राष्ट्रपतींचा राज्याच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. पुढील दोन दिवस त्या राज्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या आगमनाने राज्यात एक चैतन्य निर्माण झाले आहे.
पर्यटकांचे आवडते ठिकाण असण्यासोबतच गोवा हे शिक्षण, व्यापार आणि वाणिज्य, उद्योग, तंत्रज्ञान आणि नौदल संरक्षण यांचेदेखील महत्त्वाचे केंद्र आहे. गोव्याच्या कॉस्मोपॉलिटन संस्कृतीमध्ये स्त्री-पुरुष समानतेची परंपरा आहे.
गोव्याच्या उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये विद्यार्थिनींचा ६० टक्क्यांहून अधिक सहभाग आहे. गोव्याच्या ‘वर्क फोर्स’मध्ये महिलांच्या सहभागाचे प्रमाण आणखी वाढवण्याची गरज आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजभवनावरील कार्यक्रमात सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले की राष्ट्रपतीजी, आपण देशवासीयांसाठी आदर्श व्यक्तिमत्त्व आहात. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये मार्ग काढत आपण उच्च शिक्षण प्राप्त केले आणि आज या देशाच्या अत्युच्च ठिकाणी पोहोचला आहात. कठीण परिस्थितीत संघर्ष करणाऱ्यांसाठी आपण आदर्श आहात.
गोमंतकीयांना आनंद : मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, आपण आमच्या राज्यात आला आहात. आपले स्वागत आणि नागरी सत्कार करताना तमाम गोमंतकीयांना विशेष आनंद होत आहे
गावातील पहिल्या उच्चशिक्षित
राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई म्हणाले, राष्ट्रपतींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून शिक्षण प्राप्त केले. त्या त्यांच्या गावामधील पहिल्या उच्चशिक्षित महिला आहेत. त्यानंतर आमदार, समाजसेवक, झारखंडच्या राज्यपाल आणि आता राष्ट्रपती बनल्या.
महात्मा गांधींनी राजकीय, आर्थिक स्वातंत्र्याबरोबर सामाजिक स्वातंत्र्यासाठी आग्रह धरला होता. अस्पृश्यता नष्ट व्हावी हा त्यांचा यामागील उद्देश होता. गावांचा विकास होण्याबरोबर अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे यासाठी त्यांचा आग्रह होता.
स्वयंपूर्ण गोव्याचे कौतुक
राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या मिशनबरोबर राज्य सरकारने सुरू केलेला ‘स्वयंपूर्ण गोवा’ हा उपक्रम गोव्यासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगत विशेष कौतुक केले.
यांचा राष्ट्रपतींकडून गौरवोल्लेख
राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात गोव्याच्या विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेकांचा विशेष उल्लेख केला. ब्रह्मानंद शंखवाळकर, भक्ती कुलकर्णी, चित्रकार लक्ष्मण पै, मारियो मिरांडा, विनायक खेडेकर, ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज व लोंबर्ट मास्कारेन्हस यांचा विशेष उल्लेख केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.