Goa Rape Case: दोष त्या महिलांचाच!!

बाणावली येथील बलात्कार प्रकरणातील ‘कथित आरोपीं’ना त्या कृत्यासाठी प्रवृत्त कुणी केले असेल तर ते रात्रीच्या समयी घराबाहेर पडलेल्या बलात्कारितेने.
Goa Rape Case
Goa Rape CaseDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्याच्या (Goa) माननीय मुख्यमंत्र्यांनीही (CM Pramod Sawant) याच कळीच्या मुद्द्यावर नेमके आपले सुबक बोट ठेवलेय. ती पीडित मुलगी चुकीच्या वेळी, चुकीच्या ठिकाणी गेली नसती तर तिच्याबर बलात्कार झालाच नसता, हेच या प्रकरणातले अंतिम सत्य. अन्य बलात्कारांच्या बाबतीतही तेच म्हणावे लागेल. ते ज्या-ज्या ठिकाणी घडले त्या-त्या ठिकाणी पीडित महिलांना असण्याचे काहीच कारण नव्हते. ज्या प्रकरणाने अख्ख्या देशाला मुळासह हादरवून टाकले त्या दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणातही ‘निर्भया’ला सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्याचे काहीच कारण नव्हते. येथे घरांत घुसूनही बलात्कार करणारे नराधम आहेत, नाही कोण म्हणतोय? पण ते जेव्हा घरांत घुसतात तेव्हा घरातल्या बायकांना घरात राहाण्याचे काही कारण आहे का? बसमधून प्रवास करणाऱ्या बायकांचे विनयभंग होतात; याचे कारण त्या बसमधून प्रवास करतात. त्यांचा बसप्रवास हेच विनयभंगाचे कारण; तद्वतच बाणावलीच्या पीडितेचे अवेळी घराबाहेर असणे हेच तिच्यावरल्या अत्याचाराचे कारण! त्याचे खापर बिचाऱ्या पुरुषवर्गावर का फोडता? (Goa Gangrape Case: Reason for abuse that victim was out of house)

गोव्यातील तमाम महिला वर्गाला आमची हात जोडून विनंती आहे; त्यांनी यापुढे स्वत:ची सुरक्षा स्वत:च करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत. अर्थात, सुरक्षेचा एकूणच रोख बचावाकडे असावा. म्हणजे त्यांनी घराबाहेर शक्यतो पडूच नये. तसे केले तर कुणा वासनांधांच्या दृष्टीस त्या पडतील आणि त्यांच्यावर आगळीक होऊ शकेल. तेव्हा त्यांनी घरीच बसून राहावे. एरवीही चूल आणि मूल याशिवाय कोणताही विचार स्त्रीने करू नये, असे आपली विचारपरंपरा मानते. स्वतंत्रपणे विचार करण्याचे, पुरुषसत्ताक परंपरेला नाकारण्याचे जे वेड आजच्या महिलेला लागलेले आहे त्यामुळे सगळाच समतोल बिघडलेला आहे. तो समतोल पुन्हा प्रस्थापित व्हावा, यासाठी महिलांनी स्वत:ला घराच्या चार भिंतीत कोंडून घ्यायला हवे. घराबाहेर पडू नका. अगदीच अनिवार्य झाले तर नखशिखान्त पेहराव करा; असा पेहराव की आत पुरुष आहे की महिला याचा पत्ता पाहाणाऱ्याला लागणार नाही आणि आयाबहिणींवर आगळीक होणार नाही. आपादमस्तक पेहराव करून अंगाचा इंचन् इंच झाकला तर कसलीच भीती नाही.

Goa Rape Case
आसामी युवतीवर गोव्यात बलात्कार

ह्या, ह्या स्वत:ला प्रगत समजणाऱ्या समाजातील स्त्रियांचे वस्त्रभान आणि घराबाहेर पडण्याची सवय गोव्याला बलात्काराची भूमी बनवते आहे. हे कुठेतरी थांबायलाच हवे.अनेक माता-भगिनींना आमचे हे निवेदन मध्ययुगीन वाटण्याची शक्यता आहे. कुणाला ही पुरुषप्रधान संस्कृतीची गरळ वाटेल. आम्ही जे सांगतोय त्यात मध्ययुगीन मानसिकता असल्याचा आरोप आमच्यावर होऊ शकतो, याचीही आम्हाला जाणीव आहे. पण आम्ही जळजळीत सत्यच तर मांडत असतो, आमच्या परम आदरणीय सरकारसारखे! कुणी आम्हाला विचारील की गोव्यांत घरंदाज महिलांना पुरुषी वासनेची शिकार व्हावे लागण्याची एकही घटना घडलेली नाही का. कुणी विचारील, एवढ्याशा सात- आठ वर्षांच्या चिमुरडीला लैंगिक अत्याचारांची शिकार व्हावे लागल्याच्या घटना घडल्यात, त्याचे काय आहे, आमच्याकडे अशा प्रकारच्या प्रश्नांवरही उत्तरे आहेत. जगातील सर्व समस्यांचे मूळ ‘स्त्री’च आहे असे आमची विचारपरंपरा सांगते. वासनेच्या पोटी असाहाय्य स्त्रीवर अत्याचार करण्यासाठी लागणारे शारीरिक सामर्थ्य आणि सामाजिक वर्चस्व पुरुषांपाशी असल्यामुळे त्याने वाममार्गाला जाणेही त्याच ओघात आले. त्यात त्याला दोष देण्यापेक्षा त्याच्या वासनेला चेतवणारे कारणच नष्ट करणे योग्य नव्हे काय?

आमची तमाम महिला संघटनानांही हात जोडून विनंती आहे; उगाच स्त्रीमुक्ती, महिला सक्षमीकरण असे विचार मांडून त्यांनी महिलांना चिथावू नये. हे विचार उपरे आहेत, या मातीतले नव्हेत. सोसणे हा भारतीय नारीचा धर्म आहे; तिने मुकाट्याने पुरुषी अत्याचार सोसायला हवेत. आमच्या पोथ्या- पुराणांनी बायकांचे मोठेपण सांगणारे काही श्लोक- आर्या- वचने लिहून ठेवलीयत; ती पुरेशी आहेत. उगाच मर्यादाभंग नको. आताही बाणावलीच्या त्या पीडितेला त्यांनी पोलिसांत जाण्यापासून परावृत्त करावे. बिचाऱ्या पोलिसांना अन्य कामे नाहीत का? दिलेल्या आर्थिक लक्ष्याचा पाठपुरावा करतानाच त्यांची दमछाक होतेय; त्यात त्यांना गुन्ह्यांच्या अन्वेषणाकरिता जुंपायचे म्हणजे काय? उठसूट पोलिसांत जाण्याने सरकारची बदनामी होत असते, सरकारच्या धुतल्या तांदळासारख्या चारित्र्याला हकनाक काळा डाग लागत असतो. येथे महिला सुरक्षित नसल्याची हाकाटी होते आणि मग गुळगुळीत राष्ट्रीय मासिकांचे पुरस्कार गोव्याला मिळत नाहीत. केवढे हे राज्याचे नुकसान! बलात्कार काय, सगळीचकडे होत असतात. त्यांचा काय बाऊ करायचा? एखादीवर झालेल्या अत्याचाराची दखल घ्यायला सरकारला काय उद्योग नाहीत काय? तिकडे निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यांच्या खर्चाची तजवीज करायची आहे, थैलीवाल्यांच्या नाकदुऱ्या काढायच्या आहेत, खाणींची वतने द्यायची आहेत. किती कामे पडलीत! त्यात बलात्काराचे प्रकरण कुठे घुसडता?

पाकिस्तानचे थोर पंतप्रधान इम्रान खान यांनी हल्लीच महिलांवरील बलात्काराचे कारण त्या परिधान करत असलेला पेहराव असे म्हटल्याचे वाचकांना स्मरत असेलच. पाकिस्तान काय आणि गोवा काय; तिथले वजिर-ए- आझम काय आणि इथले मुख्यमंत्री काय? वस्तुस्थितीवर बोट ठेवणारे ते बोल बावनकशीच आहेत!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com