राजू नायक
नवे रस्ते, शाळा, नवी अद्ययावत शिक्षण केंद्रे, पर्यटनाच्या सुखसोयी व नेत्रदीपक वस्तू संग्रहालय उभारण्याचे आव्हान सरकारपुढे असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिवाडी येथे सप्तकोटेश्वर मंदिर उभारण्याची घोषणा केली आहे. एक सप्तकोटेश्वराचे मंदिर उभारून झाले, त्यावर सरकारचे साडेसात कोटी रुपये खर्च झाले आहेत.
मंदिर भव्यदिव्य आणि शिवाजी महाराजांची आठवण काढण्यास पुरेसे ऐश्वर्य त्याला लाभले आहे. तरीही आणखी एक सप्तकोटेश्वराचे मंदिर बांधण्याचा सोस सरकारने बाळगला आहे.
मंदिरे बांधणे हा सध्या भारताच्या राष्ट्रवादी नेत्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे. विकासपुरुष म्हणून गणले जाण्यासाठी मोठमोठे प्रकल्प उभे करणे ठीक आहे; परंतु तेवढाच निधी खर्च करून सरकारी पैशाने मंदिरे उभारण्याची टूम निघाली आहे.
गोव्यात पोर्तुगीजांच्या काळात बरीच मंदिरे तोडण्यात आली. पोर्तुगीजांना ख्रिस्ती धर्माचा प्रसार करायचा होता. त्यासाठी त्यांनी हिंदू देवतांची मंदिरे उद्ध्वस्त केली. सुरुवातीला धाक निर्माण करणे आणि हिंदूंच्या स्वाभिमानाची आणि संवर्धनाची केंद्रे ठरलेल्या देवळांच्या जागी ख्रिस्ती चर्चेस भव्य दिव्य प्रमाणात उभ्या करणे, हा त्यांच्या कार्यक्रमाचा भाग होता. त्यानंतर बऱ्याच स्वाभिमानी गोवेकरांनी देवळांचे पुनर्निर्माण केले, हा त्याग आणि शौर्याचाही, स्वाभिमानाचा इतिहास आहे. लोकांनी देव राखले.
संस्कृती राखली. इन्क्विझिशनच्या काळातील काळ्या व रक्तलांच्छित इतिहासालाही आपले पूर्वज पुरून उरले. त्यावेळी मंदिरांची आवश्यकता होती. त्यांना खऱ्या अर्थाने समाजमंदिराचे स्वरूप होते. लोकांनी त्याग व बलिदानांचे रक्त सांडत त्यांचे निर्माण केले;परंतु त्यानंतरही ठिकठिकाणी मंदिर निर्माणाचे पेव फुटले आणि आजही होतच आहे.
गोव्यात भाऊसाहेब बांदोडकरांचे सरकार गोवा मुक्तिनंतर उभे झाले. त्यावेळी बांदोडकरांना ठिकठिकाणी जाऊन मंदिरे उभारण्याचा सोस जडला होता. ज्येष्ठ संपादक माधव गडकरी यांनी भाऊसाहेबांना एकदा हाच प्रश्न विचारला होता. हा किस्सा गडकरींच्या पुस्तकात त्यांनी सांगितला आहे.
भाऊसाहेब कुठेही गेले तरी मंदिरे बांधून देण्याचे वचन द्यायचे. निवडणुकीच्या काळात ते गावोगावी फिरत तेव्हा लोक त्यांच्यासमोर हात पसरून उभे असत आणि मंदिरे बांधून देण्याचा शब्द दिला की नारळावर हात ठेवून त्यांच्या पक्षाला मत देण्याचे वचन देत.
गडकरींनी मंदिरे बांधण्याऐवजी शाळा बांधा, बहुजन समाजाला उच्च शिक्षणाची दीक्षा द्या, असे आवाहन केले होते.
आजही तोच प्रश्न आहे. संपूर्ण देशाच्या तुलनेने गोवेकर शिक्षणात फारसा प्रगती करत नाही. राष्ट्रीय स्पर्धात्मक परीक्षेत गोवेकराचा निभाव लागत नाही. आपण आपली सार्वजनिक शैक्षणिक कर्तबगारी निर्माण करू शकलो नाही. कारण शैक्षणिक पातळीवर कौशल्य प्राप्तीचे प्रशिक्षण गोव्यात उपलब्ध नाही. परिणामी बेरोजगारीत आपण देशात सर्वांत उच्च पातळीवर आहोत.
प्रमोद सावंत सरकारने दिवाडी बेटावर- जेथे सप्तकोटेश्वराचे मूळ मंदिर उभे होते- असा कयास आहे तेथे ते पुन्हा उभारण्याचा संकल्प सोडला आहे. जी मंदिरे ठिकठिकाणी जमीनदोस्त करण्यात आली, ती पूर्ववत उभारून देण्यापेक्षा एकच भवदिव्य- जी गोमंतकाची शान आणि मान पुनर्प्रस्थापित करेल, असे मंदिर उभे करणे अनेकांना आवडू शकेल;
परंतु एक सप्तकोटेश्वराचे मंदिर तेवढ्याच दिमाखदार पद्धतीने उभे केल्यानंतर सरकारी खर्चाने आणखी एक मंदिर का बरे उभे करावे, या प्रश्नावर चर्चा होणे आवश्यक आहे.
अनेक टीकाकारांनी सावंत सरकारच्या या घोषणेवर टीका करताना लोकांच्या दैनंदिन प्रश्नांपासून त्यांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी ही कल्पना पुढे आणल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ 50 वर्षांपूर्वी भाऊसाहेबांच्या काळात जी जनमानसाची मानसिक स्थिती होती- मंदिरे बांधली की गावचे सर्व प्रश्न सुटले. तिच्याच मोहात सावंत पडले आहेत.
लक्षात घेतले पाहिजे या काळात गोव्यात धड एक पूल नव्हता. चिंचोळे रस्ते होते. लोकांना तासनतास होड्यांमधून प्रवास करावा लागायचा. गावात उच्च शिक्षणाची सोय नव्हती. इस्पितळेही नव्हती. आरोग्याच्या साध्या साध्या कारणांमुळे माणसे दगावत असत.
मागच्या 50-60 वर्षांत मंदिरे बांधली गेली आणि त्यात कित्येक पटीने वाढ झाली. आज प्रत्येक गावात किमान सात-आठ वेगवेगळी मंदिरे उभी आहेत. छोट्या घुमट्यांची ऐसपैस मंदिरे बनली आहेत. जे पुरूस म्हणून ओळखले जायचे, त्यांना आपण ईश्वर बनवले. देवचार आणि राखणदार नग्न अवस्थेत आपल्या मूळ स्वभावानुसार उभे राहून चुकल्या-माकलेल्यांना वाट दाखवायचे. त्यांनाही आता कपडे घालून मंदिरांमध्ये थाटामाटात उभे करण्यात आले आहे.
मंदिरे ही एकेकाळी समाजाच्या प्रतिष्ठेची लक्षणे असायची. समाजातील सर्व स्तरांतील लोकांना तेथे मानमरातब मिळायचा. काही मंदिरांमध्ये विशिष्ट देणग्या देऊन सभासद केले जायचे आणि त्यांचे सामाजिक स्थानही उंचावले जायचे. मंदिरांनी सामाजिक-सांस्कृतिक पुनरुत्थानाचे काम केले आहे.
दुर्दैवाने सध्या मोठमोठ्या इमारती उभ्या करणे आणि देव आणि मंदिरांमार्फत स्वतःची सत्ता गाजवणे हे एकच ध्येय उरले आहे. मंदिराच्या निवडणुका आज अहमहमिकेने लढविल्या जातात. भ्रष्टाचार आणि अनाचार माजला आहे. अनेक गावांमध्ये मंदिरे सत्तास्थाने बनली तेथे हिंसाचारही होऊ लागला आहे. मंदिरेही माणसाच्या उन्नतीची सामाजिक-सांस्कृतिक केंद्रे असल्याचा समज हळूहळू लोप पावत आहे.
या पार्श्वभूमीवर दिवाडी येथे आणखी एक मंदिर बांधण्याच्या सरकारच्या संकल्पनेचे कोणत्याही प्रकारे समर्थन होऊ शकत नाही.
दिवाडी येथे नक्की कोणत्या जागी सप्तकोटेश्वराचेच मूळ मंदिर होते याचा पुरावा अद्याप कोणी पुढे आणलेला नाही. आता ज्याला नार्वे म्हटले जाते ते हिंदळे येथील नवे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखालील भागात उभे राहिले. मूळ मंदिर दिवाडी येथील नार्वे वाड्यावर होते.
त्याच भागात कोटीतीर्थ आणि माधवतीर्थ अशी दोन तळी आहेत; परंतु दिवाडी बेटावर नक्की कुठे सप्तकोटेश्वराचे मंदिर होते, याचा कोणताही पुरावा सरकारला अद्याप सापडू शकलेला नाही. जी मोठी तळी दिवाडी येथे भग्नावस्थेत आहे, तेथेच सप्तकोटेश्वराची मूळ जागा आहे काय? या संदर्भात तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत.
काही संशोधकांच्या मते दिवाडी येथील तळी कृष्णाच्या मंदिराची असू शकते. या बेटावरच कृष्णाची सर्वांत मोठी जत्रा भरवली जायची; परंतु 1545 मध्ये पोर्तुगीजांनी हे बेट ताब्यात घेतले त्यावेळी ती बंद केली. आता ती पैलतीरी हिंदळे गावी नवीन नार्वे येथे होते. कृष्ण आणि गणपतीच्या मूर्ती सध्या नव्या सप्तकोटेश्वर मंदिरात आहेत. या देवळात अष्टमी साजरी होते.
सप्तकोटेश्वर मंदिराविषयी वेगवेगळ्या अख्यायिका आहेत. सात ऋषींनी कोटी वर्षे तपश्चर्या केली, त्यातून हे लिंग उत्पन्न झाले, अशी ही अख्यायिका सांगते. हे शिवलिंग पंचधातूचे मुळातच होते काय की लिंग उद्ध्वस्त केल्यानंतर ते पंचधातूंचे बनविले, यासंदर्भात मतभेद आहेत.
हे मूळ मंदिर पोर्तुगीजांच्या आगमनापूर्वी मलिक कफूर यांच्या सरदारांनी उद्ध्वस्त केल्याची वदंता आहे. 1310 मध्ये त्यांनी चांदर या कदंबच्या राजधानीवर हल्ला केला. तेथे मोहम्मद तुघलक (1327) यांची जुनी नाणी सापडली आहेत. दुसरी स्वारी 1328 मध्ये तुघलकांच्या सरदारांनी केली. मलिक कफूर हा अल्लाउद्दीन खिलजींचा सरदार होता.
तो स्वतः एक बाटगा हिंदू, पण त्यामुळे अधिकच तिरस्काराने तो हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करीत सुटला होता. अल्लाउद्दीन खिलजी यांच्या मृत्युनंतर कफूरने स्वतःकडे सूत्रे घेतली; परंतु पुढे आपल्या सरदारांकडून तो मारला गेला. त्याच्या मृत्यूनंतर तुघलकांकडे सत्ता आली.
मलिक कफूर यांच्या आगमनापूर्वी 1310 मध्ये येथे यादवांचे अधिपत्य होते. कदंब हे यादवांचे दंडनायक. कदंब हे पश्चिमी चालुक्यांचे कारभारी होते. त्यानंतर यादवांची मांडिलकी पत्करली. 1395 मध्ये यादवांचा मलिक कफूरने पराभव केला.
रामचंद्र यादवांची पत्नी-कन्या यांना मलिक कफूरने उचलून नेले. 1313 मध्ये जेव्हा यादवांच्या जावयाने मलिकविरुद्ध बंड करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा उकळत्या तेलात त्याची चामडी सोलून काढण्यात आली होती. त्याचे मस्तक देवगिरीच्या किल्ल्याच्या वेशीवर लटकवून ठेवण्यात आले होते. याच काळात मलिक कफूरने पहिल्यांदा सप्तकोटेश्वरचे मंदिर उद्ध्वस्त केले असावे अशी शक्यता आहे.
त्यानंतर हे मंदिर तिच्या मूळ स्थानी- म्हणजे जेथे कांदेलेरिया चर्च आहे, त्याच्या आसपास असू शकते- पुन्हा बांधण्यात आले असावे असा कयास आहे. हिंदू पद्धतीमध्ये एकवेळा उद्ध्वस्त करण्यात आलेले मंदिर त्याच ठिकाणी पुन्हा बांधण्यात येत नाही.
तेथे मंदिर तोडताना आणखी काही हीन कृत्ये केली असण्याची शक्यता असते ज्याने त्या जागेचे पावित्र्य भंग होते, असे मानले जाते. त्यामुळे त्यांनी मूळ मंदिराच्या आसपास माधवतीर्थाच्या पश्चिमेकडे कुठे तरी देऊळ उभारले असावे, असे अनुमान काढतात.
या मंदिराची शोकांतिका अशी की परचक्र आले तेव्हा तेव्हा तिच्यावर हातोडा बसला. बहामनींनी गोव्यावर स्वारी (1357-1366) केली, तेव्हाही त्यांनी हे मंदिर तोडले; परंतु यावेळी त्यांनी ते संपूर्णतः उद्ध्वस्त केले नसावे. पहिल्यांदा मलिक कफूरच्या सैन्याने हे मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांनी लूट करणे पसंत केले होते. देऊळ पूर्णतः तोडले नव्हते.
आक्रमकांना बेल्लूर येथे दक्षिणेकडची देवळे लुटण्यासाठी व हौसला यांचे राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी जायचे होते, वाटेत त्यांनी सप्तकोटेश्वरावर हल्ला केला त्यावेळी त्यांनी मंदिरातील लिंग उपटून काढले.
त्यानंतर 1357 ते 1366 या काळात बहामनीच्या सैन्याने देऊळ संपूर्णतः उद्ध्वस्त केले; परंतु याचे फारसे पुरावे सापडत नाहीत. या विषयावरचे अभ्यासक काही पुसटशा नोंदीवरून काही अनुमाने काढतात. या पुरातन मंदिराबाबतही अशीच निरीक्षणे काढण्यात आली आहेत.
मधल्या काळात विजयनगरच्या साम्राज्याने (1370) या भागावर कब्जा केला. विजयनगरच्या राजाने कदंबांना बरोबर घेऊन मुस्लिम राजवटींबरोबर युद्धेही केली. गोव्यावर अंमल झाला तेव्हा मात्र कदंबांकडे राजवट न सोपवता राज्याचे प्रमुखपद माधव मंत्री यांच्याकडे सोपवून विजयनगर साम्राज्याने या देवळाची पुनर्स्थापना केली. आज तेथे कांदेलेरिया चर्च आहे, तीच ती जागा असावी असा उल्लेख पोर्तुगीज दप्तरात आहे. अभ्यासकांना ते मान्य नाही.
वास्तविक नवे देऊळ उभारायचेच ठरविले तर तेथे उभ्या असलेल्या चर्चला बाधा येता कामा नये असेच अनेकांचे मत असेल. त्यामुळे वाद निर्माण होतील आणि पुन्हा दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते. वास्तविक पोर्तुगीजांनी तोडलेल्या देवळांचे पुनर्निर्माण करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली तेव्हा हीच भीती व्यक्त करण्यात आली होती. या मंदिरांच्या जागी पोर्तुगीजांनी जर चर्चेस उभारल्या असतील तर त्यांना हटवून नवीन मंदिरांचे निर्माण केले जाईल काय?
दुसरी गोष्ट, इतिहासकार पुन्हा वाद निर्माण करतील. नक्की जागा कशी शोधणार? सप्तकोटेश्वराचे मूळ मंदिर कोठे होते? ज्या वेगवेगळ्या काळात त्यावेळी गोवा जिंकून घेतलेल्या राजवटींनी ते तोडले होते, तेव्हा कोणत्या जागी ते होते, आणि पोर्तुगीजांनी त्याच जागी चर्च उभारले होते का, याचा दस्तावेज कोणी धुंडाळण्याचा प्रयत्न केलेला नाही.
अनेक इतिहासकारही मानतात की पोर्तुगीजपूर्व काळातील दस्तावेज उपलब्ध नसला तरी पोर्तुगीजांनी ज्या काही बऱ्या-वाईट घटना केल्या, त्यांचे संपूर्णतः दस्तऐवजीकरण केले आहे. हे दस्तावेज पोर्तुगालमध्ये उपलब्ध असून त्यांचा धांडोळा घेऊन ते गोव्यात आणले गेले पाहिजेत.
नव्याने बांधण्यात आलेल्या सप्तकोटेश्वर मंदिरात असलेल्या कृष्णाच्या मूर्तीसंदर्भातही अनेक प्रश्न आहेत. छत्रपती संभाजी महाराज स्वतः कृष्णाच्या अष्टमीच्या जत्रेला उपस्थित राहिले होते. या पंचक्रोशीतील तो एक मोठा उत्सव होता.
पोर्तुगीज 1510 मध्ये गोव्यात आल्यानंतर त्यांनी 1540 मध्ये या बेटावरील हिंदू नागरिकांना ही जागा खाली करण्याचे फर्मान काढले. हजारोंच्या संख्येने धर्मांतर झाले. 1540 ते 1554 या काळात देवळाचा विध्वंस सुरू झाला व त्यात हे मंदिरही भग्न करण्यात आल्याचा उल्लेख पोर्तुगीजांच्या दप्तरात सापडतो. त्यानंतर तेथील लिंग उपटून नजीकच्या विहिरीच्या बाजूला उलटे टाकून दिले होते, ज्याच्यावर पाय ठेवून विहिरीचे पाणी काढले जाई.
ते नारायण सूर्यराव सरदेसाई यांच्या नजरेस पडले. लिंगाचे पावित्र्य भंग होत असल्याच्याच रागाने त्यांनी ते तेथून पलीकडे नेण्याचा संकल्प केला. गावात- जेथे सध्या नवीन मंदिर उभारलेले आहे- आणून त्यांनी एका गुफेत ठेवले. या मोहिमेत पोर्तुगीजांच्या सैन्याची गोळी लागून सरदेसाईंचा एक भाऊ मरण पावला. त्याची समाधी याच नवीन मंदिरालगतच्या एका भागात बांधलेली असावी असा सरदेसाई कुटुंबीयांचा समज आहे.
कारण नारायण सरदेसाई यांचीही समाधी तेथेच आहे. आताच्या मंदिराच्या स्थानी ते लिंग आणण्यापूर्वी सुरुवातीला दोन-तीन वर्षे ते लाटंंबार्से येथे लपवून ठेवण्यात आले होते. हिंदळे-नार्वे येथील ही गुफा पूर्ण आकाराची आहे व तिला काही दालनेही आहेत. ती मूळ मंदिराची नाही. ही गुफा पुरातन काळापासून अस्तित्वात आहे व तेथेच लिंग सुरक्षित राहील असे सरदेसाई कुटुंबीयांना वाटल्याने त्यांनी तेथेच लिंगाची स्थापना केली व त्यानंतर तेथेच पूजाअर्चा सुरू करण्यात आली.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी या गुफेला भेट देऊन तेथेच मंदिराची स्थापना करण्याचा आदेश दिला. जाणकारांच्या मते, त्यांनी बांधलेले मंदिर महाराष्ट्राच्या स्थापत्य शैलीत होते. या मंदिरासाठी वापरलेले कारागीर गोव्यातील होते असे म्हणणारा एक वर्ग आहे.
17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी (1668) मंदिर उभारले गेल्याच्या घटनेला आता 354 वर्षे झाल्याप्रीत्यर्थ तेथेच नव्या दिमाखात मंदिर उभारावे असे सरकारला वाटले. पोर्तुगीजांनी तोडलेल्या मंदिरांचे पुनर्निर्माण करण्याच्या योजनेचा या मंदिराच्या उभारणीशी काही संबंध नाही.
दुसऱ्या बाजूला दिवाडी बेटावर जेथे मंदिर असू शकते तेथे दोन तीर्थे आहेत. कोटीतीर्थ असलेल्या जागेत सरकार नवीन मंदिर बांधू पाहत असेल तर तेथे सप्तकोटेश्वराचे मंदिर होते की कृष्णाचे यासंदर्भात आज काहीच दस्तावेज उपलब्ध नाहीत. आज जेथे माधवतीर्थ आहे- आणि ती जागा मूळ मंदिराची असू शकते असे काही जाणकार मानतात- ती जागाही अन्य कोणा देवळाची असू शकते काय, यासंबंधी अद्याप कोणीही अभ्यास केलेला नाही.
सरकारच्या मते, दिवाडी बेटावर अत्यंत उच्चकोटीचे सप्तकोटेश्वर मंदिर उभारून पर्यटकांसाठीही ते आकर्षण ठरू शकते; परंतु मंदिरांचे अभ्यासक व इतिहासाचे तज्ज्ञ आणखी एक मंदिर गोव्यात का असावे याबाबत मतभेद व्यक्त करतात. लक्षात घेतले पाहिजे, गोव्यातच आज सप्तकोटेश्वरची किमान नऊ देवळे आहेत.
आणखी एक मंदिर सरकारी खर्चाने उभारण्यापेक्षा गोव्याचा पोर्तुगीजपूर्व इतिहास लोकांसमोर यावा. या भूमीवर हजारो वर्षे झालेल्या स्वाऱ्या, वेगवेगळ्या राजवटींनी भूमीचे तोडलेले लचके आणि या काळात अत्यंत हिकमतीने त्याविरोधात लढलेले लोक- मग ते कोणत्याही धर्माचे असोत
त्यांचे शौर्य, त्यांचा पराक्रम आपल्या वारशाबद्दलचा सार्थ अभिमान- त्यांचा वस्तुनिष्ठ इतिहास पुढे आणणारे वस्तुसंग्रहालय गोव्यात उभारले जावे, अशी लोकांची इच्छा आहे.देवळांच्या निर्माणापेक्षा एक वस्तुनिष्ठ वस्तुसंग्रहालय निश्चितच पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.